About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Wednesday, October 24, 2007

"आमच्या चिमूची शाळा...."

"आमच्या चिमूची शाळा...."

चल ऊठ रे बाळा
आज तुझी शाळा...
ऊठा लवकर आटपा
उशीर झाला पळा....
...कारण आत्ता आहे आमच्या चिमूची शाळा...

मी निवांत झाले
चिमू शाळेत गेला...
चिमूने म्हणे शाळेत
उद्योग मोठा केला....
...आज आहे आमच्या चिमूची शाळा...

नव्हत्या बाई आल्या
फक्त खडू अन् फळा...
हा म्हणाला सर्वांना
चला - ऊठा - खेळा...
.....असा आमचा चिमू आणि अशी त्याची शाळा.....

आल्या, बाई आल्या
म्हण म्हटल्या पाढा...
बे चा पाढा म्हणताना
चिमूचा बसला म्हणे गळा....
...अशी कशी हो आहे ही आमच्या चिमूची शाळा...

इतक्यात चिमू आला
खूप खूप आनंद झाला...
हा गलका कसला झाला
मला लगेच पेच पडला....
...इतक्यात कशी सुटली आमच्या चिमूची शाळा...

हेडमास्तरिनपण आल्या
म्हणे कुठे तो गेला?...
काय केले विचारले
'बेल' वाजवून पळाला....
....अशी असते का वेंधळी मुलांची शाळा?

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका..23/10/2007....11.10 p.m.

Tuesday, October 23, 2007

*********"माझी आई...शोभाई......."*********

"माझी आई...शोभाई......."

शब्द फुले शोधते, शोभाई तुझ्याच ग साठी...
का सापडेना मला, अर्थ शब्दांच्याच ओठी....

तुझ्या मायेच्या उबेत, विश्व सारे विसावते....
चिन्तेस शांत झोप, तुझ्या कुशीत लागते....

अर्थ किती दडला ग, तुझ्या कोपाच्या कथेत....
धपाट्याची आधी लय, उठे तुझ्या अंतरात.....

रात्रं- दिन तू जागे, राहाशी उशाशी बसून....
दुखणे घेशी लेकराचे, अंगावर ग ओढून.....

वेळ येताच ग आई,........तू होशी खंबीरही...
लेकरासाठी आपल्या , तुझी नजर घार होई...

माझ्या आसवांचे तुला, मोत्याइतके ग मोल...
माझ्या एका सुखासाठी, जग ठरे कवडीमोल...

नको पूजा अन् मोक्ष, जन्म घ्यायचेत ग मला...
हरेक जन्मात तुझीच, लेक व्हायचे ग मला.....

तुझ्या मायेला ग आई, मी वर्तुळच म्हणणार...
आद्या-अंताचा ना शोध, कधी जगास लागणार...

शब्द फुले नाहीत ग, ओंजळ भरूनी मिळाली....
पाकळ्यांनीच ग आज, कथा तुझी गांधाळली...

ऋण नाही फेडायचे, त्यातच राहायचे ग मला....
शोभाई तुझ्यासारखीच, आई व्हायचे ग मला....

रेणुका@एक झोका चुके काळजाचा ठोका....21/10/2007....1.40...a.m.

वस्त्रहरण भाग=9 " सुन्या सुन्या............."

वस्त्रहरण भाग=9 " सुन्या सुन्या............."

हे गाणे लोकप्रिय........सुरेश भट यांचेच.."सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या......" माझे मराठीतील सर्वात आवडते गाणे...आधी त्यांची मी मनापासून खुपदा माफी मागते...या गाण्याचे विडंबन करायचे की नाही आणि केलेच तर पोस्ट करावे की नाही, या मधे खूप दिवस घालवले मी... पण शेवटी रसिकांसाठी येथे देत आहे.... सर्वांचीच परत एकदा क्षमा मागून....

प्रस्तावना नाही लिहीत आता.... कंटाळा आलाय...तुम्हाला नाही, मलाच!!!!!!! तुमची काळजी मी काय म्हणून करावी? तुम्ही करता का? माझी नाही हो इतर वाचकांची? मग?........वाचा....जमले तर हसा, नाहीही हसलात तरी मला काय? तुमचेच वय कमी होईल....मग बघा तुमचे तुम्ही ठरवा....

मूळ गाणे....
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
.....सुरेश भट.........................................

विडंबन......

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
माझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
येणार इथे मानवजात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
का नसे रे चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
चपराशी का हशात आहे

सांगा तुम्हा भेटतील कोठे
असे मधुर (बे)सूर अनोळखीचे
उभी एकटीच अंगणी स्वरांच्या
खुर्च्याही मम गीत गात आहे....

उगीच सर्वांना आणण्याची
कशास केलीस आश्वासने तू
दिलेस का (फुकट) तिकीट तू कुणाला
तुही दडला का कोपर्‍यात आहे

रेणुका @ एक झोका... चुके काळजाचा ठोका...23/10/2007....12.05 a.m.

Friday, October 19, 2007

वस्त्रहरण भाग =8 " तुझे नि माझे..."

वस्त्रहरण भाग =8 " तुझे नि माझे..."

आनंदाने आमच्यावर वार केलाय,अर्थ नाही कळला का? आनंद माने यानी .....आणि आमच्यावर म्हणजे घाबरू नका, कधी कधी मी स्वत:ला आदरार्थी बोलावते....का? माहीत नाही...प्रथम त्याची माफी मागते,त्याच्या कवितेचे विडंबन आणत आहे इथे म्हणून, हो, तो लहानच आणि भाऊही त्यातून, मग त्याची माफी का मागायची हा प्रश्न खूप वेळ सतावत होता मला... पण एक पद्धत आहे ना ही..म्हणून.हो, आपण खूपशा जुन्या पद्धती का पाळतो? हे आपल्याला समजत जरी नसले तरी पाळतोच ना? म्हणून...

प्रस्तावना जरा जास्तच असते ना माझी? जुनी म्हण आठवली... ऐका ना प्लीज...प्लीज्ज... "चाराण्याची कोंबडी अन् रूपायाचा मसाला........" पण मसल्या शिवाय कोणी कोंबडी खाणार का? समझनेवलो को..अहो थांबा, थांबा...नाही जास्त बोलत....वाचा.ही मूळ कविता....


तुझे नि माझे...

तुझे नि माझे जीवन सरले
अता कुठे हे प्राण ही उरले

सरली होती द्वाड ती संध्या
चंद्र-सूर्य ही मागे फिरले...

वेचत आहे मी शब्द तुझे हे
मौनातूनी जे उरले-सुरले...

सोड सखे तु आज हा रूसवा
ओंजळीतून या काही न उरले..

कोण निघावे पहिले येथून
सांग तुझे मग काय गं ठरले..

@आनंद माने
-------------------------------------------------------------------------------------------------------------

तुझे नि माझे... (आनंद आणि आनंदी........)

तुझे नि माझे वय हे सरले
अता कुठे ग दातही उरले?

विसर की आता द्वाड ती संध्या
चंदया-सूर्यालाही तिने मागे फिरवले...
(मग माझी काय बिशाद?...ते दोघे पहिलवन होते ना........)

वेचले होते मी रुमाल तिचे ते
चंदया-सूर्याकडून जे उरले सुरले...

सोड संध्ये...(ऊप्स, सॉरी... )आनंदे, तू आज हा रुसवा...
आता कुठे ग वयही उरले? (काSSSSSशश.........)

कोण निघावे पहिले येथून
( तू गेलिस तरी चालेल मला........चालेल कशाने, पळेल ही)
सांग तुझे मग काय गं ठरले..

रेणुका@ एक झोका..........चुके काळजाचा ठोका.......19/10/2007........12.40 p.m.

"गारुड...."

"गारुड...."

आरं, बस कर तुझं पवाडं
अन् थांबव तुझं ते भारुड....
मायावी तुझ्या दुनियेतलं
थांबव ते नजरंचं गारुड...

त्या तुझ्या गारुडावर
अश्शी डुलाया लागलेय...
आज माझ्या इरोधात मीच
बंड पुकाराया लागलेय...

माहिते मधाळ बोलण्याला
मन माझं भुलतय....पण,
काय करू कळना
'गारुड' वर चढून बोलतय...

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका....07/10/2007...11.45 p.m....

Monday, October 15, 2007

वस्त्रहरण भाग=7,"तरुण आहे ....."

वस्त्रहरण भाग=7,"तरुण आहे ....."

सर्वप्रथम सुरेश भट यांची मी हजारदा माफी मागते...मनापासून.कारण त्यांचे चर्चित गाणे...'तरुण आहे....'याचे बिडंबन करण्याचे धारिष्ठ दाखवले आहे...माफी असावी.वाचकांचीही माफी मागतेय.. कारण आपल्या आवडत्या गाण्याला धक्का बसला तर मज मूढ आणि अल्पमती असलेलीला माफ करावे....हुशश!!! औपचारिक बोलणे भलतेच जड असते नाही? जमेल हळू हळू मलाही.... चला, आपण लगेच विडंबन .....हेय कुठे निघालात? नाही, ते तुमच्या जागेवरूनच वाचायचे आहे..चला म्हटले की लगेच उठलात का? कोण आहे रे तो..'उठलोच नाही मी', असे कोण म्हणतोय? असो! तर मग वाचा.....'आलिया भोगासी.....' आता हे आणि कोण म्हटले? असो सोडा त्यांचे, आपण आपले विडंबन वाचूयात.......

ही मूळ कविता....

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे

बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे

उसळती ट्टदयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे

ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे
...........Suresh B..........................................................................................................

तरुण आहे तू अजुनी, राजसा विसरलास का रे
एवढ्यातच त्या जागेवर, तू असा (तीनदा) पडलास का रे...

अजूनही बुझली न जखम ती, पायाच्या गुडघ्याची
(मलम) लावूनी मी थकले कुठे रे, हाय तू थकलास का रे
(पड ना अजून दहादा......)

सांग या कोजागीरीच्या चांदण्यांची काय चुकी
चालायचे मतच तुझे, आणि तू धड-पडलास की रे...

बघ तुला पुसतोच आहे, शेजारचा तो म्हातारा
(तो म्हातारा तसा पडलेल्या पेक्षा लहानच हो...)
(म्हणतोय) गटारीच्या त्या पाण्याचा गंध तू लुटलास का रे...

उसळाती हृदयात तुझ्या रागाच्या बेधुन्द लाटा...
तू कोरड्यासारखा, पण तो हसलाच की रे...

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मंद-मंद का रे
बोलावा रुग्णवाहिकेला, तू असा चाललास का रे....
(मघाचाच म्हातारा....बोलवायला)

रेणुका@एक झोका...15/10/2007, 11p.m

"स्त्री शक्तिचा एक थेंब मी........."

"स्त्री शक्तिचा एक थेंब मी........."

नमस्कार मित्रांनो!!!!! माझी कविता, विषय वेगळा, कविता वेगळी........तरीही 'कविता' म्हणूनच फक्त पहा ही नम्र आणि आग्रहाची विनंती.......चूकले वा काही न आवडल्यास आधीच आपली क्षमा मागते.एक कविता म्हणून आनंद घ्याल अशी अपेक्षा...

मी लेक, मायेत वाढून तेच बीज अंगिकारलेली...
जन्माने सुख, तर निरोपाने दुःख देणारी....

एक बहीण नाजूक, रक्षणाचे कवच मागणारी....
नि तुमच्या अश्रूंचे दान स्वतःसाठी मागणारी...

मी अल्लड प्रेयसीही, निरव्याज प्रेम करणारी...
इंद्रधनूचे रंग आयुष्यात अलगद अचूक भरणारी...

मी एक पत्नी, स्वयंपूर्ण, तरी संसारासाठी वेचलेली...
सुख-दुःखाचे पारडे समर्थ, तोल सांभाळत पेलणारी...

माता मी, कठोर तर कधी मातृत्वाने गाते अंगाई...
वकदृष्टीस आडवा वार, वाघालाही पाणी पाजणारी....

मी अबला, कधी सबला, हारते, हरून जिंकावयासी...
बुद्धी, रूप तर कधी तलवारीने रण गाजवणारी...

मी शाप, बाजार मांडूनही स्व-जातीला तारणारी...
निर्लज्जपणे का असेना पण समाज सुधारवणारीच..

मी सकारात्मक कधी नकारात्मक भूमिकेतलीही..
थांबा,.............. इथे तुम्ही सर्वही आहातच की...

मी बळीही, पण ठिणगीच मी, जरी थंड असले तरी....
धग मी अफाट, विध्वंस कणा कणात गोठवलेली....

मी एक दिशा, आशा, उषा, निशा, आणि नशाही...
मी दृढ, गूढ, सूड, मी मंथनातले अमृत नि विषही...

मी कुरूप, सुरूप, स्व-रूप, आणि अ-रूपही कधी...
मी सरस्वती, दुर्गा, रेणुका, तर रणचंडीकाही कधी...

या स्त्री शक्तिचा एक थेंब मी, माझ्यामुळे हा सागर...
कशाला? हा स्त्रीशक्तिचा थांग नसलेला सागरच मी....

आता शिवालाही न पचणारे विष मी....
जरी पार्वती, तरी आता फक्त 'नारी' मी...

पण खबरदर!!!!!! लक्षात राहू द्या मंथनाचे,
आणि हो, हे मंथनही मीच......विचारांचे......

तरीही मी संस्कृती... जाणणारी, जपणारी, रुजवणारी...
थेंबातली ठिणगी, पण चौकटीच्या आतच अजूनही मी...

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका....15/10/2007.....12.45 a.m.

(शेवटच्या ओळीचा अर्थ, अजूनही चौकट ओलांडली नाहीए आम्ही.......)

"पण म्हणून काय असे करायचे?......"

"पण म्हणून काय असे करायचे?......"

दाद्याछी छगला खेल छेअल कलतो...
एकदा नाई कलावा वातला..
त्यानी माज्या नावाचा बॅन्द
छाल्या गावात ज्याऊन वाज्यवला...

स्पर्धेत श्लोकांच्या भाग घेतला...
गर्दी तिथली देखूनी तोबा...
ग्रहण लागले मम वाचेला...
तदपश्चात मातावाचाळतेने मज पिडला....

बाईंनी पाढे सांगितले पढायला...
21 चा पाढा नाहीच मुळी आठवला...
सार्‍या वर्गासमोर त्यानी माझा
शिस्तीत कोंबडा की हो बनवला...

एकदाच..(?)
चार विषयांत नापास झालो...
बाबांनी असा काय धोपटला...
चांगला मिसरूड फुटेपर्यंत मला
तिरस्कराने डोस पाजला....

बेब च्या तालावर कायम नाचलो...
एक दिवस जरा लेट पोहोचलो...
क्षणात, चल जा उडत, म्हणत
पत्ता आमचा 'कट' केला....

बायकोचे 5-6 वाढदिवस...(5 की 6?...)
कॅण्डल-लाइट मधे साजरे केले...
सातवा चुकून खरच विसरलो....
पण 'टोमणा' अजून नाही चुकला...

मुलांना नेहमी प्रोमीस करतो...
मीटिंग मुळे एखाद वेळी रद्द केला...
पण 'चीटर' म्हणून त्यांनी
परमनंट स्टॅम्प माथी मारला...

नाही, तसे हे सर्व फक्त
एक-दोनदा रिपीट झालेही असेल...
पण म्हणून काय असे करायचे?
सर्वांनी असे वाळीत टाकायचे??

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका....14/7/2007.....12.15 a.m.

एक ओळ काल वाचनात आली होती..."आपण केलेल्या अनेक गोष्टी लोक विसरतात, पण एखादी क्षुल्लक चूक लक्षात ठेवतात..." खूपच आवडली.म्हटले या वर काहीतरी लिहावे....पण डोक्याला वाचणा-याच्या जास्त ताण पडू द्यायचा नाही.. म्हणून असे लिहिले.......

Friday, October 12, 2007

"एक 'माणूस' भेटतो....."

एक 'माणूस' भेटतो.....

रात्रीची वेळ, बस फेल, घरी कसे जायचे?...
चेह-यावरची काळजी,नि भीती ड्रायव्हर ओळखतो...
अग, सोडतो मी डेपॉपर्यंत, तो सहज बोलतो...
मग तिथे एक 'माणूस' भेटतो.....

जेव्हा सारकारी खात्यात काही काम नडते....
एखादा कर्मचारी दुसर्‍याच्या टेबलचेही काम करतो...
अहो आम्ही तुमच्याचसाठी इथे, असे म्हणतो...
तेव्हा तिथे एक 'माणूस' भेटतो.....

फोनचे कार्ड संपते आपण कुठेतरी अडकतो...
तेव्हा एखादी स्त्री स्वतःचा फोन न मागताच देते.....
आणि कर ग फोन यावरून, हसत म्हणते...
तिथेही एक 'माणूस' भेटतो.....

रस्त्याने चालताना कधी कधी सहज दिसते...
गरीब मुलाला कोणी लाडाने काही देत असते...
त्याच्या चेह-यावरच्या भावात काय नसते?....
तेव्हा तिथेही एक 'माणूस' भेटतो.....

अनोळखी ठिकाणी जेव्हा आपण असतो
भाषा येत नसली तरी एकमेकांकडे पाहून हसतो...
अपरिचित लोक, मदत घेतो आणि करतो....
कारण हसणारा एक 'माणूस' च असतो...

माणसाची माणूसकी आपण जगतो....
आपण अडचणीत असताना
कधी सहज एखादा माणूस भेटतो,
तेव्हा त्यामाणसात आपल्याला 'देव'ही भासतो....

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका...12/10/2007.....3.10 p.m.

गझल......"पावसाळी थेंब...."

गझल......"पावसाळी थेंब...."
(वृत्त =गालगागा गालगागा गालगागा गालगागा)

आस सजने चातकासम, का अशी प्रश्नात आहे...
मी असा तव "पावसाळी थेंब," उत्तरात आहे...

ये अशी तू ठिणगीसम काळजातच धगधगूनी...
तीच धग मी पेरण्यासी आज तव श्वासात आहे...

विझवूनी दिन सजने, सांजवाती लाव ना गं...
तू तरीही उजळलेली, 'सांज' स्वप्नात आहे...

मंदशा गंधात तुझ्या व्हायचे बेधुंद मजला...
बघ मत्सरी रातराणी, दूर त्या रानात आहे...

धुंद मी आता ग, रात्र ही सप्तरंगात भासे...
तुज रूपाने उतरली, तारका साक्षात आहे....

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका....0/10/2007...12.30 a.m.

त्या एका राक्षसी क्षणाला आवर घालता येणार नाही का???

त्या एका राक्षसी क्षणाला आवर घालता येणार नाही का???

त्या एका राक्षसी क्षणाला
आवर घालता येणार नाही का?
माणसातल्या माणूसकीला तेव्हा
एक साद घालता येणार नाही का?

त्या एका वासनाभरल्या क्षणात
एक आयुष्य उध्वस्त होत नाही का?
क्षणिक सुखासाठी मनासकट तिला
विटंबने सोडता येणार नाही का?

वखवखलेल्या नजरांचे वार नेहमीचेच
पण, पुढचा हा खेळ थांबवता येणार नाही का?
शब्दांमधला आदरच फक्त काय कामाचा
भोगवस्तू म्हणून पहाणे सोडता येणार नाही का?

फक्त एक क्षण...
फक्त एक क्षण विचार करा
क्षणाचा आहे हा खेळ सारा...

एका क्षणाची वासना..
एका मनाचा रोग..
एका मनाचा संभोग...
एका मनाला तो भोग....

एक क्षण संपत असतो...
वनवास कायम उरत असतो...

दुःख, अवहेलना, मानहानी बळी गेलेल्याची
आणि त्या बरोबर त्याच्या घरच्यांचीही....
आणि कदाचित न-निर्ढावलेल्या बळी घेणार्‍याची
आणि नक्कीच त्याच्या घरच्यांचीही....

मग,फक्त त्या एका राक्षसी क्षणाला
आवर घालता येणार नाही का???

रेणुका @एक झोका...चुके काळजाचा ठोका...09/10/2007....3.15 p.m.

Wednesday, October 3, 2007

"माझी पहिली गझल.........रुपगर्वीता....."

माझी पहिली गझल.........

"रुपगर्वीता....."

चांदण्यांचा गजरा माळूनी आली...
क्षणात रवितेज ते हिरावूनी आली....

तमाची पर्वा उगाळूनी शशीची...
उजाळाही त्याचा झीजवूनी आली...

काळजांना धुंदीत उधळूनी अशी...
हलकेच उसासे पेरवूनी आली...

भुंग्यांची आसक्ती पिऊनी कशी....
प्राणासक्त फुलराणी होऊनी आली...

कैकांची स्वप्ने लेऊनी अशी...
मदमस्त चांदणी होऊनी आली...

रुपगर्वीते, आग लावूनी जनी...
क्षणात चंद्रास विझवूनी आली...

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका...03/10/2007.....10.35p.m.

"निळाईतला चंद्र तो........."

"निळाईतला चंद्र तो........."

मनातली हूरहूर, तयाची आसक्ती...
तयाचीच पूजा नि तयाचीच भक्ति....

निळाईतला चंद्र तो,नाती दुरावा...
स्वयंभू नसल्याचा हवाय पुरावा?...

अहंकाराला स्वाभिमानाचे नाव इथे...
प्राजक्ती प्रेमाला नाही माळी इथे...

अबोल मी आणि माझ्या दिशा...
जिवंत तरीही मनीच्या आशा....

शब्दांची होळी पेटली कोपर्‍यात...
राख विखुरली मन गाभा-यात...

शेवटच्या शब्दांचा तो निखारा...
धुमसतोय मनी अनामिक गाभारा...

तरीही गाभा-याचा स्वामी तो फक्त...
देव्हारा हा आता कायमचा रिक्त.....

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका...2/10/2007........12.35 p.m.

वस्त्रहरण भाग=6"जगणं गांडुळावाणी........."

वस्त्रहरण भाग=6"जगणं गांडुळावाणी........."

mul kavita Artichi aahe..........

जगणे बांडगूळापरी !!

तिची स्वप्ने,तिच्या कल्पना...
जाणिले न् कुणी तिच्या मना.
अस्तित्वाची लढाई लढवेना.....
जगणे बांडगूळापरी !!

पिता,पती आणि पुत्र...
म्हणायला ही नाती मात्र
स्त्रि-जन्माचे भाग्य ठरतसे....
या तिन पुरुषांवरी !!

वाढेन का ती वटवृक्षाजैशी?
आकाशि झेपवाया....
कि लतिकेचेच भाग्य नशिबी
हुरहुर हि दाटे उरी !!

जगणे बांडगूळापरी !!
जगणे बांडगूळापरी !!

-----Arti...

------------------------------------------------------------
tyache vidamban......"जगणं गांडुळावाणी........."

माही स्वप्नं, माह्या कल्पना
न् म्हणायचं जाणीतो तुमच्या मना....
खुर्चीसाठी लढाई लढतोया
(म्हणू नका) जगणं गांडुळावाणी....

टीवी, पैका, आन् मोबाईल
म्हणायचं फकस्त, हे देईल...
पुढं तुमचं भाग्य ठरतया
आम्हाच गांडुळांवारी....(oops)

वडल कावं मी पैका खोर्‍यानी?
मतं द्या जिंकावया....
का (फकस्त) समाजसेवेचं भाग्य नशिबी
भीती ही माझ्या मनी....

(म्हणू नका)... जगणं गांडुळावाणी....
बरं म्हणा.... जगणं गांडुळावाणी....

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका......1/10/2007.......4.40p.m.

"मोगराही बहरला होता...."

"मोगराही बहरला होता...."

आज त्याचा निरोप आला
नि मन हरखून गेले....
गत आठवणींच्या पावसात
चिंब चिंब भिजून गेले....

भिजताना मज सवे,
अंगणीमोगराही बहरला होता....
भाव आतले उलघडायला
मनीचा रावा बोलला होता...

राग मारवा गायला आज
निसर्ग आतुरला होता...
तोच गारवा आता जणू
सर्वांगात शहारला होता....

ते शहारणे निशब्दपणे
कोणीतरी टीपत होते...
खोडकर पाण्याचे थेंब
उष्ण होऊन बोलत होते...

रेणुका@एक झोका.....चुके काळजाचा ठोका...30/9/2007.....11.45p.m.