About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Tuesday, December 11, 2007

"नशा....."

"नशा....."

मी मावळलेला एक पिंड..
जगण्याचा दंड....शब्दांनी धिंड...
काळजात सल, अपमानाचं ओझं...
धूसर नजरेचं जीवनही खुजं...
एकेकाळी उगवतीवर नाव...
आब, मान-मुज-याचे गाव,
शब्दालाही भाव...
पायाखाली जग थोटकं....
हात जोडुन पुढे सुखही खोटं...
बोलणारा पैसा, डोळ्यावर झापडं...
फाटकच मन पण उंची कापडं..
ना कशाचे भान, ना कोणाचा मान...
ना सख्खा मित्र, जीवन स्वैर बेभान...
हम्म्म.....
यशाची नशा.......नशाच शेवटी...
उतरली की दिसते........
छिन्न-विछिन्न शरीरावर
मांसरहीत कवटी...
जाताना घेऊन जाते दिलेले सर्व...
तेव्हा कळते संपलेय पर्व..

ती जाते उगवतीकडे
नवीन सूर्याच्या शोधात...
तोही कदाचित बहकणार
नशिल्या धुन्दिच्या ओघात......
कदाचित तो सूर्य तूच असशील.....
म्हणून फक्त सांगावेसे वाटले...
ठीक आहे, जायचे तर जा...
नाहीतरी मावळणार्‍याचे
इथे कोणी ऐकले?

रेणुका @ एक झोका.....11/12/2007......10.20a.m.

"सल......."

"सल......."

पुन्हा सल तो मनी जागला रे
जन्माधीच अंकुर कसा खुडला रे

विसरू कशी पाऊलखुणा तिच्या?
अशा नीच वृत्तीस ईश लाजला रे

नऊमासही देऊ शकले न तिजला
पसा हा कसा मायचा माजला रे

गर्भात नाकारूनी सोय-यांनी
उगम का नसे आपला शोधला रे

चौकट ही अशी पूर्ण कारवण्या..
माणूस का असा नादला रे?????
माणूस का असा नादला रे?????

रेणुका @एक झोका..चुके काळजाचा ठोका...17/10/2007...11.30A.m.

"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."


"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."

मधुधुंद गंध, बेधुंद हवा
मोरपिसी स्पर्श नवा....
सोड ना हात साजणा....
मंद कर ना रात दिवा....

कीणकिणतॉ बघ चुडा
चांदण्यांचा शेज सडा...
नजरेचे भलतेच इशारे
श्वासांचा आवाज चढा...

शाश्वतीचे वरदान असे
या क्षणांना चढलेय पिसे...
बेभान मदमस्त निशेत
देहभान सांग का नसे??..

काजळ अलवार विखुरले
स्वप्न समीप अवतरले.....
चढत्या भावनांचे काहूर
बाहुपाशात तुझ्या निवळले...
बाहुपाशात तुझ्या निवळले.....

रेणुका @ एक झोका...15/11/2007...11.40p.m

"कवितेत माझ्या...."

"कवितेत माझ्या...."

बोच, सल, वेदना ही कविता असते?
प्रेम, प्रणय, प्रेमभंग ही कविता असते?
शब्दांत शब्द, यमके ही कविता असते?
वृत्त, विचार, कल्पना ही कविता असते?
देव, भक्ति, उपासना ही कविता असते?
काहीतरी याही पलीकडचे लिहायचेय...
शब्दांपलीकडले,क्षितीजापलीकडले...
मृत्यू पलीकडले, नि भावनांपलीकडले...
शब्द? ते अदुजे करीन..
मृत्यू? अनुभव रेषेला छेद देऊन,
कल्पना शक्तीने वेध घेईन.....
भावना? निगरगट्ट करीन...
पण भावना होत नाहीत निगरगट्ट..
धरून ठेवतात अगदी घट्टच घट्ट...
होत नाहीत दूर त्यांचे मानावरचे वर्ख..
लावले जरी कितीही तर्क....
त्यांना आस्मानाचं गाव,
समुद्र गहिरा ठाव...
आस्थेला वाव......
सगळं कसं एकमेवाद्वितीय....
ना बंध....ना कडे वृत्तीय...
आकस्मीत, आंदोलने कदाचित असंघिक...
अभंग, अतुलनीय, अभेद्य अन् अलौकिक...
म्हणून वरचे सर्व असेलच कवितेत....
अद्वितीय नसेल कदाचित..
पण उत्स्फूर्त तर असेल.......
कवितेत माझ्या 'मन' ढगाळ असेल....
कारूण्य भेगाळ असेल...
प्रेम, वृत्त, भक्ति...ओतप्रोतही असेल...
पण मी त्यापासून अनभिज्ञ नसेल.....
कविता माझ्या वेदना बोलतील....
प्रेमाचे गुपित खोलतील....
उपासनाही करतील....
पण, शब्दांकीत राहून...
क्षितिजरेषेवर वाहून....
मृत्यू अलीकडचीच पाखरे
निघतील भाव-पर्जन्यात न्हाऊन....

रेणुका @एक झोका...27/11/2007.......12.30a.m.

"रेषा धूसर....एकच उत्तर...."

"रेषा धूसर....एकच उत्तर...."

एक आशा, एक निराशा...
रेषा धूसर....जिद्द उत्तर....

एक हार, एक जीत...
रेषा धूसर...आत्मविश्वास उत्तर...

एक मानव, एक राक्षस...
रेषा धूसर....क्षमा कर....

एक सार, एक प्रहार...
रेषा धूसर.... शांती उत्तर...

एक वाद, एक संवाद....
रेषा धूसर....विचार सारासार कर..

एक चूक , एक बरोबर...
रेषा धूसर....'मी पण' विसर...

एक आत्मा, एक शरीर...
रेषा धूसर....प्रभुनाम् जप कर....

एक जीवन,एक मृत्यू...
रेषा धूसर....क्षणाचे अंतर....

एक प्रश्न, एक उत्तर....रेषा धूसर....
'जीवन' हे एकच उत्तर.....

रेणुका@एक झोका....26/11/2007....10.00a.m.

"मनात एक विचार आला..."

"मनात एक विचार आला..."

मनात एक विचार आला...
आपल्या मनात
किती विचार असतात नाही?
कधी खोल तर कधी
अगदीच काहीच्या बाही...
मग यावरच खूप विचार केला...
विचार खूप खूप खोलवर गेला...
अगदी मनाच्या तळाशी...
सर्व विचारांच्या मुळाशी....
अन् मग विचार ते तरल झाले...
हळू हळू वर येऊ लागले.....
हरेक विचारांचे एक-एक
फुलपाखरू होऊ लागले....
काही वेळातच झाला...
असंख्य फुलपाखरांचा थवा...
हवा होता त्यांना...
आकाशापर्यंतचा मार्ग नवा...
आनंदी तर कधी दुःखी होत होते..
या फुलपाखरांना रंग होते......
कधी गुलाबी कधी करडा.....
आणि जातही होती....
तीही "सरडा"....

रेणुका@एक झोका....13/11/2007....11.15p.m.

"सांग मी कोण रे?....."

"सांग मी कोण रे?....."

सांग मी कोण रे?
छुमछननन तुझेच मी बोल रे...
सांग मी कोण रे?
रुनझुननन तुझेच मी गीत रे...

पायात गिरकी घेऊनी
क्षणात खाली बसेन मी...
बसूनी दोन्ही करांनी
पाऊस उधळेन रे....

गारवा मस्त लेवूनी
अवखळ सर होईन मी...
सरसरसर बरसूनी
विश्वात मुरेन रे...

धुंद मृदगंध होऊनी
सर्वत्र दरवळेन मी.....
क्षणात तुजसी मंत्रूनी
तुझ्यातून चोरेन रे....

बेबन्द घुंगरू होऊनी
छंकारत नाचेन मी...
लयबध्द करूनी तुला
सृष्टीसही नाचवेन रे...

सनसननन पवन होऊनी
हातून निसटेन मी.....
एक उसासा देऊनी
माझ्यातच रमेन रे...

घनघोर पुन्हा होऊनी
आकाशी भरेन मी...
अंत तुझा पाहूनी
कधीतरीच बरसेन रे...

निथळणारी जलधार मी
हळवी हूर हूर मी....
ओंजळीत पानांच्या
हसूनी थिरकेन रे....

रेणुका @एक झोका....29/11/2007.....10.30p.m.

"आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता..."

"आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता..."

आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता...
कुठून सुरूवात करू? आणि काय गाऊ गाथा?..

स्वभावाबद्दल लिहू की लिहू केलेल्या चुकांवर...
सुखांवर भरभरून लिहू, की लिहू दुःखांवर?...

काय लिहावे कळेना, मन काही केल्या ऐकेना...
"मी ओळखलय मला खरच" हे काही पटेना....

कधी कधी मी कशी वागेन हे माहीत नसते...
इतरांसाठी कदाचित न पटलेलेही करत असते....

कधी कधी खूप वेडे-पिसे होते असे वागताना...
स्वतः च्या मनाचा गळा स्वतःच घोटताना....

असे मनाला समजावताना कित्ती हाल होतात...
आपलीच ही मने मग गेंड्याची साल ओढतात...

इतके सर्व करून स्वतःलाच शोधायचे असते....
जनसागरातून आपले वेगळेपण दाखवायचे असते....

पण हे जमते का सर्वांना?... कसले हो जमतेय...
स्वतःला सिद्ध करायला एका कवितेने काय होतेय?

रेणुका @ एक झोका....17/11/2007....1.40a.m.

"सुप्त इच्छा..."

"सुप्त इच्छा..."

सुप्त इच्छा..हिला सर्व असतं..
दहा हात, नाहीतर सहा पाय...
नाक डोळे, कान, मान..
जाणिवा आणि पंचप्राण....
नसतात ते शब्द, भाषा आणि तोंड...
काहीसे भाव उरफाटे
अन् विचार दुतोंड....
कधी तिला अमूर्त रूप...
कधी कीर्तीचे अप्रूप....
कधी आर्त धारदार पाती...
भ्याडाची छाती...
नि भावनांची माती...
मनाची गढूळ उलाढाल..
बधिर-मुजोर साल...
प्रचंड मानसिक हार...
स्वप्नाच्या आश्वावर स्वार...
ठिणगी दडीत गारगोटी...
रण बीज पोटी...
कधी ठरते कर्दनकाळ..
कधी गळ्यात माळ...
कधी कधी र्‍हास...
कधी स्व-शोधाचा प्रयास...
असते कधी अल्पयुषी...
तर कधी शतायुषी...
सदसदविवेकबुध्दीची ही दासी...
बहुरंगी बहुढन्गी खासी..
तरीही कोण कोणास पडेल भारी
सांगता येत नसते...
यावरच तर आयुष्याला
दिशा मिळत असते...

रेणुका @एक झोका..07/12/2007...3.15p.m.

"मौन........"

"मौन........"

अव्यक्तातूनही साधतं असं म्हणत होते..
न बोलताही समजतं असही म्हणत होते..

व्यक्त केल्याने कधी कधी अर्थ बदलतात...
बिघडलेले अर्थ कधीच जुळत नसतात...

थोडसं मनालाही बोलण्याची संधी द्यावी..
डोळ्यांनाही काम करण्याची कला यावी...

समजावून देण्याची एक निरागसता असावी...
अन् समजून घेण्याची उदारता का नसावी?

म्हणून वाटते, स्पष्ट बोलून साधतं नाही,
पण मौनातून साधतं बरेच काही...

हा मार्ग आहे भल्या भल्यांनी सुचवलेला..
अन् मी आपल्यासाठी परत इथे गिरवलेला...

रेणुका @एक झोका...11/2007....2.30 a.m.

"भारलेल्या चांदण्यांचा कवडसा.... "

"भारलेल्या चांदण्यांचा कवडसा.... "


काही भारलेल्या चांदण्यांचा कवडसा भग्न
स्वयं प्रकाशात मग्न?
गोठते सृष्टी प्रश्नात...
अहं,चंद्राच्या भाडोत्री उन्हात.....

चंद्र गिळलेली मध्यरात्र...
नि:शब्द गात्रं, स्तब्ध पात्रं...

आवसेच्या चन्द्राला अर्घ्य..
पण तिलांजली नव्हे...
भार खांद्यावरच
पण, ही तिरडी नव्हे...

रेणू @ एक झोका...03/12/2007...12.50 p.m.

अर्थ थोडक्यात सांगते.....
एक प्रयत्न केलाय... ....अर्थ थोडक्यात सांगते..... चांदण्या= लहान लहान स्वप्ने... जी कवडशासारखी फक्त.... भारून टाकतात आनि तरिहि.... आपल्याच नादात असतात, कधी भग्न होतात तरीही स्वत:च्यात नादात का असतात?? हा त्यातला प्रश्न....ज्य स्वप्नांत आपले विश्व समावलेय असे..... चंद्र म्हणजे एक आयुष्याचे मोठ्ठे स्वप्न....... पण दुसा-यावर विसंबलेले...... आणि असे स्वप्नही भग्न होते... नि झोप उडते....म्हणजे चंद्र गिळलेली मध्यरात्र....... मग आपल्याच आक्रोशात आपण निशब्द, आपल्या आयुष्यातले सर्व नातेवाईक, मित्रही स्तब्ध...अशा वेळी कोणीही येत नहि...आपणही निर्जीव असल्यासारखेच! आणि असे चंद्र (धेय) नसलेले जगणे.....त्या प्रमुखशा स्वप्नाकडे दुर्लक्ष केलेय...(अर्घ्य दिलय) पण मुळापासून नहि...म्हणजे तिलांजली दिली नाही....एक आशा आहेच कधीतरी कदाचित चमत्कार होईल आणि स्वप्न साकार होईल.... अशा बर्‍याच लहान मोठ्या स्वप्णनाचा भार आहे मनवर....पन ही तिरडी नाही.....


अशी माझ्या कुवतीप्रमाणे लिहिलेली (gudh) कविता...

"सखा...........हे जग स्वार्थी...."

"सखा...........हे जग स्वार्थी...."

वासनेचे हे जग स्वार्थी....
फक्त तुझाच तर स्पर्श निस्वार्थी....
तू भाषा बोलतोस विरक्तीची...
याच तुझ्या लोभसवाण्या खरेपणावर
वाढे भावना आसक्तीची....
पण छे!तू तर चक्क अमलात आणतोयस...
अशी अवेळी कात टाकून,
विरागी अवस्थेकडे धाव घेतोयस...
पण असे वैराग्य-भक्तीचे कातडे मागे सार..
मी सामान्यच रे...
तुझे हे असामन्यत्वाचे वलय कर पार...
हो, तू म्हणाला 'मादी कल्पना वाईट'...
मादी वैगेरे या कल्पना फोल ठरतात तुझ्यापुढे....
नीलाजरेपणा नाही हा...
आपण 'एकच' असण्याची ग्वाही देते तुझ्यपुढे...
ऊगाच नाही, ठेवलेत त्याने हे भेद...
नकोस ठेवूस मनात कोणताही खेद...
राहू दे सर्व आहे तसेच अगदी....नैसर्गिक....
त्यात आणू नकोस भक्ति वा जीवन वैरागिक....

रेणुका @ एक झोका...24/11/2007....1.20a.m.

"एक आस......."

ज्या क्रमाने मी लिहिलय त्याच क्रमाने देत आहे...विषय एकच फक्त 'व्ह्यू' वेगळे....

-----1-----
पंख छाटले जरी...
कळ दाबिली उरी...
झिडकारुनी गुलामी,
घेईन झेप अंबरी..

आयता तो घास...
उतरेना हमखास...
उघडेल केव्हातरी...
पिंज-याची कडी...

ही आस असे अंतरी...
बितेल जिवावर जरी...
आस असे जिंकण्याची....
एक उमेद जगण्याची....

-----2-----

मी फूल अबोलीचे...
घेतले ओझे लग्नाचे...
कोणास नसे किम्मत...
पण सोडली ना हिम्मत...

आई-बपाचा उध्दार...
होतसे वारंवार....
सर्वांचा अपमान....
कशी विसरू आत्मभान?

राहील स्वबळावर उभी..
आहे तीही खुबी...
ही आस असे जिंकण्याची
एक उमेद जगण्याची....

------3-----

झाला एक अपघात...
दैवाने केला घात...
पाय झाला निकामी...
येऊन गेली सुनामी....

आल्या कुबड्या हाती...
स्वप्नांची झाली माती...
हारली देवाची पूजा....
झालो जरी खुजा.....

करीन यावरही मात...
करीन कला आत्मसात...
ही आस असे जिंकण्याची
एक उमेद जगण्याची....

------4-----

तो गेला, आता अंधार...
कसा कुठे शोधू आधार?
जीवनाचे काटे रुततात...
आठवांच्या जखमा फुलतात...

रक्तहीन जखमा,धीर चेपतो..
जग बदलते, अश्रूही सुकतो....
कोणासाठी जगायचे?
भूतकाळी चाचपडायचे?

उजेडाला अंधाराचा
जडलाय शाप....
पण अंधराला?
पहाटेची स्वच्छ आस....

पोटाचा गोळा, जीव चोळामोळा...
करेन त्याच्यासाठी रणही..
ही आस असे जिंकण्याची
एक उमेद जगण्याची....

-----5-----

'मराठी कविता' हडपली..
एका शपिताने करपवली...
शब्दांशी झाला फितूर....
दाटते मनी काहूर...

संपले सर्व वाटले...
गेले ते तर गेलेच...
मागे काय उरले?
सारे जणू सरले....

पण छे,आस नसे रे मेली...
भावना नसे करपली....
मराठी मन पेटले....
जिद्दीने काव्य रचले....

परत सर्व उभारू....
काव्यांजली सवारू....
ही आस असे जिंकण्याची
उमेद कवी मनाची....

------6------

दुस्काळ यंदा पडला..
दाणाही नाही उरला...
कोरडी गिळवना भाकरी...
करतुया चाकरी....

घरधनीन खाय 'हाय'
आजारपण सरत न्हाय....
करज पण वाढतया...
ताण कमी व्हई ना...

आण देवाजीला..
पाणी दे बा शेतीला....
आयकल तो कवातरी...
जाण जागल अंतरी....

आस ही डोळ्यांमदी...
उमेद ही काळजामदी...
आस ही डोळ्यांमदी...
उमेद ही काळजामदी...

रेणुका @ एक झोका...24/11/2007....1.20a.m.

"भाऊबीज यंदाची कोरी राहते...."

"भाऊबीज यंदाची कोरी राहते...."

भाऊबीज यंदाची कोरी राहते....
एक 'निरंजन' पेटतच नाही....
मनाचे आभाळ भरून येते
पण सर आज बरसतच नाही....

उससा दीर्घ अन् थंड वाटे आज
मन आठवांच्या हरेक क्षणात...
चिडलो-भांडलो-तंडलो तरी आज
मन घुटमळे तुझ्याच अंगणात...

हे काय?
तुझेही मन माझ्याच अंगणात?
बघ दीप उजळाताहेत दहा दिशांत...
गधड्या चल, लवकर ये घरात
मनाची भाऊबीज साजरी करूयात...

रेणुका@ एक झोका...11/11/2007...9.00 a.m.

"विडंबन...."bhag 10.....पहाटे पहाटे

परत एकदा आदरणीय सुरेश भट यांची मी माफी मागतेय त्यांच्याच गाण्याचे हे विडंबन आहे....

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना...
कशी रात्र गेली कुणाला कळेना.
-तरीही नभाला पुरेशी न लाली!

गडे हे बहाणे,निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली!

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे,हालचाली!

तुला आण त्या वेचल्या तारकांची,
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची;
लपेटून घे तू मला भोवताली!
--------सुरेश भट------------------------------------

"विडंबन...."
पहाटे पहाटे

पहाटे पहाटे कुणा जाग आली
कुण्या श्वानाची ती जीभ सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना... (अरे हा तर आपलाच कुत्रा....)
कशी आवदसा आठवली कुणाला कळेना..
खाऊ घातले पुरेसे, तरी जाग आली?

गडे हा लाजतोय (चक्क) कुत्रा कशाला?
म्हणे राहू दे हात माझा उशाला...
आता मात्र झोपही पार उडाली...

कसा रामपारी सुटे तोल याचा....
म्हणे घे पोटाशी, तोवर चोराचा पोबारा...
आता राहू दे खाणे, कर हालचाली....

तुला आण त्या खालेल्या पावाची....
तुला आण त्या (चोरून) प्यायलेल्या दुधाची...
लपेटून घे चोराला भोवताली.....
(कुत्रा शेपूट हलवत त्याच्या डिशकडे पाहतोय)

रेणुका @ एक झोका...14/11/2007.....10.21a.m.

"पोलीस..."

नाण्याला बाजू दोन...."पोलीस..."

मी कर्माने पोलीस...
भावना ठेवतो ओलीस...
अपराध्यांचा द्वेष..
पण शरीरावरचा वेश?

जनता देते टोमणे....
अधिका-यांची बंधने...
ढवळाढवळ नेत्यांची...
सजा आम्हास फाशीची...

तुम्हीच आज सांगा..
लाच आम्हीच घेत असतो?
तुमच्यातलाच कोणी
उगाच देत नसतो...

सोडा हो हे सर्व...
नाण्याला बाजू दोन...
सत्य स्वीकारा की..
प्रांजळ इथे आहे कोण?...

रेणुका @एक झोका...17/11/2007....2.20a.m.

"मी चंद्र बोलतोय........."

"मी चंद्र बोलतोय........."

मी चंद्र बोलतोय.........
सल केव्हाचा सलतोय.......

बाळ-गोपाळांचा मामा झालो...
त्यांच्यासाठी खुद्कन हसलो....
चिमुकल्यांसाठी लिंबोणी मागे लपलो....
तुपात माशी, अजूनही उपाशीच राहिलो....

स्वप्नात मी प्रातिरूपही झालो....
वाट्टेल तसे रुपांतरित झालो.....
मधूचंद्राच्या दिवशी मलाच धरले....
करवा-चौथला चाळूनही काढले....

हे सर्व कमी होते की काय...
कोजागिरीला प्रतिबिंबाचेही सोडले नाहीत पाय....
एवढ्यानेच कसा बसा सावरत होतो...
तेवढ्यात कवीच्या हातात घावलो होतो...

मग तर विचारू नका माझी दैना..
राघू तर करतात कधी माझी मैना...
कधी देतात 'तिला' माझी उपमा...
नका का तिला 'रूप' हा शब्द पण बोलता येईना...

मी चंद्र बोलतोय....
ऐकतय का कोणी?
हो मस्तच......एक रेणुका भेटली....
पण तिनेही यावर एक कविता केली.....

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका...06/11/2007....11 p.m.

"दिवाळीची भेट,मनातून थेट......."

"दिवाळीची भेट,मनातून थेट......."

दिव्यांची ओळ...
पोरांचा घोळ...
किल्ला हमखास...
सण हा खास
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

सुखाची नांदी...
राळाची चांदी...
पोटोबाची मजा..
खिशाला सजा
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

मंत्रमुग्धा हवा...
साज नेहमी नवा...
रांगोळ्यांचा बहर....
फटाक्यांचा कहर
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

सुख-शांती लाभो...
अखंड वैभव नांदो...
हीच आमची भेट...
परदेशाहून थेट
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका... 06/11/2007....11.50 p.m.