About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Tuesday, June 3, 2008

"पाठमोरा... "

होऊ साजणे, कसा पाठमोरा...
करूनी भावनांचा परिपाठ कोरा धृ

उसासे-वेदना ही मनाच्या कुपित...
जगावे कसे होऊनी अभिशापित...
वीर मी निहत्ता, दोष ना कुणाचा...
नियतीची सत्ता, रोष ना कुणाचा 1

कशी जीवघेणी जगाची ग रित
सोसावे कसे होऊनी आगतिक
पापण्यांत साचे,पाऊस आसवांचा
कोराडाच भासे, कोपरा मनाचा..2

चुकती ना घटती, अमीट लेख
चढते-उतरते, नशीबाचे आलेख
ती वाट ओली, दगा का आठवांचा...
तू दूर जाता, दगा का श्वासांचा 3

Renu@ek jhoka..20/11/2007....4.30 p.m.

"नियतीचे रिंगण..."

नियतीचे रिंगण...
परिस्थितीची छडी...
नि स्वप्नांचे इवलेस्से अंगण....
मात्र तिचे राज्य,
हाती सूत्र...
नि तिचेच गतिमान सत्र...
निर्विवाद साम्राज्य तिचे
यत्र तत्र नि सर्वत्र..

रेणू @ एक झोका...19/12/2007..9.50 a.m.

"शब्द......"

शब्द मन
शब्द रण
शब्द घन
शब्द सनसन पवन...

शब्द पूजा
शब्द अर्चा
शब्द साधना
शब्द शब्दफुलांची उपासना...

शब्द अतित
शब्द कथित
शब्द गतीत
शब्द शब्दाने व्यतित....

शब्द गंध
शब्द मंद
शब्द रंग
शब्द शब्दबध्द व्यासंग...

शब्द क्रूर
शब्द सूर
शब्द सूड?
शब्द शब्दांवरचे आसूड?....

शब्द खंत
शब्द तंत्र
शब्द मंत्र
'शब्द' 'शब्द' स्वतंत्र.....

शब्द रान
शब्द दान
शब्द मान
शब्द शब्दांचा प्राण....

शब्द क्रुध्द
शब्द लुब्ध
शब्द स्तब्ध
शब्द तरी नि: शब्द....

शब्द भक्ति
शब्द उक्ती
शब्द आसक्ती
शब्द शब्दांकीत विरक्ती....

शब्द वासना
शब्द बाजार
शब्द जुगार
शब्द भग्न ओसाड लाचार....

शब्द वार
शब्द धार
शब्द हार
शब्द शब्दवीन ओंकार...

रेणू.... 02/02/2008....10.21a.m.

"वेग-धुंद.....निरागस....."

खळाळणार्‍या झर्‍यासारखी....
वेग-धुंद.....निरागस.....
लाजणारी.....सतत हसणारी......
पावसात मनसोक्त भिजणारी....
.मुक्त अल्लड बागडणारी......
कायम रानोमाळी हिंडायची.....
फुलपाखरांमागे धावायची....
सांज-सावल्या विसरायची.....
श्वापद!
श्वापद होतं पाळतीवर....
नशीबचा फेरा फिरला...
एक आक्रोश हवेतच विरला...
स्वप्नं टराटरा फाटली....
अश्रूंची धार आटली....
श्वापद लावून गेलं
कायमचा बट्टा...
नि चटकपण.........

जीवघेण्या खेळाची.............

रेणू@ एक झोका....११/४/२००८....१२.१७p.m.

"नको......................."

एका उदास मनाची अवस्था....

"नको...."

आज रंग नको...
तरंग नको....
'व्यक्त' ओझे नको...
सशक्त खांदे नको...

शब्दांची धार नको...
अश्रूंची ढाल नको...
दैवाचे घाव नको....
त्यालाही वाव नको....

हवाय फक्त
एक प्रांत....
शांत-निवांत-
चीर् एकांत...

रेणू@ एक झोका...11/02/2008 1.45 a.m.

"जिद्दीचा संधीप्रकाश......"

भिरभिरते आत्मविश्वासाचे पंख...
आपल्या स्वप्नांचे आकाश.....
तडजोडी करून सुध्दा
साठवलेला जिद्दीचा संधीप्रकाश....
त्याच धुगधुगीत कुठेतरी
जिवंत असणारं आपलं अस्तित्व....
इतर गाजवत असतात
आपल्यावर स्वामित्व....
मग कधीतरी ही जिद्दच
त्या ज्योतीला देते हवा....
भिरभीरणार्‍या पंखांना मग
मिळते दिशा, नि मार्ग हवा....
आपण उडत असतो
उंच उंच आपल्याच नभात....
इतकं की,
गुदमरायला होतं....
वास्तवाचं भान आलं की
धड-धडायला होतं.....
आपल्या आकाशासाठी
आपण खूप काही गमावलेलं असतं....
कदाचित,...... क-दा-चि-त....
पायाखालची जमीन....

नि आता वेळ असते
अजून काहीतरी गमावण्याची

ओह नो, आपलं आकाशही....

.रेणू @ एक झोका....06/06/2008...11.51a.m.

"कर्तुत्वशून्य......"

कर्तुत्वशून्य....Its a fact!


एखाद्याला नेस्तनाबूत करायचं
अन् त्याला लढ म्हणायचं.....
उठत असता आधार ओढूनवर
कर्तुत्वशून्य म्हणायचं.....

हीच का रे रित तुझ्या जगाची?
अपेक्षा का नेमही त्यागाची?

वारावर वार.... प्रहार
असं संपवत जायचं...
जाळत जाळत परत
भरभरुनही द्यायचं....

हीच का रे रित तुझ्या जगाची?
जिथे कातडी जाळतात वाघाची....

सावरू लागताच परत पाडायचं
आत्मविश्वासाचं घर भुईसपाट करायचं....
आता कितीही क्षितिजं उभारलीस
तरी हवीत कोणाला?

तुझ्या असण्या-नसण्याने
फरक पडत नाही मनाला...

.रेणू @ एक झोका...15/02/2007......12.30p.m.

"बेताल-मुक्त गीत गायचय...."

तुला मनात साठवत
एकटक शून्यात पहायचय....

जरा चौकटी मोडून
बेताल-मुक्त गीत गायचय....

सुगंधासारखं मनात
हलकेच घर करून पहायचय....

हिम वर्षाव झेलत
उबदार मिठीतपण न्हायचय.........

पण नाहीच जमले तर,

फुलपाखरासारखं हातावर
रंग सोडून तरी जायचय.....

----------------------------------------------------रेणू.... ०२/०४/२००८.....११.०९p.m.

"अजूनही..."

अजूनही तुझाच मी...
अजूनही स्वप्नात मी?
अजूनही छळतेस तू....
अजूनही वरतेस तू....
अजूनही श्वास गुंतलेला...
अजूनही जीव खन्तलेला...

अजूनही त्याच रिती...
त्यात जळतेच प्रीती...
त्यात जळतेच प्रीती....

अजूनही सांजवात तू....
अजूनही पापण्यांत तू....
अजूनही डायरीत तू....
अजूनही शायरीत तू....
अजूनही सुकया फुलात तू...
अजूनही त्या रंगात तू..
अजूनही त्या गंधात तू...
अजूनही श्वासात तू...

श्वासातल्या भासात तू...
भासातल्या श्वासात तू...
अजूनही...

अजूनही माझ्यातच हरवतेस?
अजूनही माझ्यातच गिरवतेस?
अजूनही हा वेडेपणा का?
अजूनही हा वेंधळेपणा का?
सोड ना ध्यास वेडा....
सोड ना प्रयास वेडा....
सोड ना आभास वेडा....
सोड ना हा र्‍हास वेडा....

रेणू... 4/2/2008

"माझी ती त्याची होताना...."


माझी ती त्याची होताना....
आभाळ तुटत होतं...
अश्रू हसताना पुसत
काळीज फाटत होतं....

माझी ती त्याची होताना....
आठवणी साठल्या होत्या...
आस्मानी देव देवतांच्या
रांगा दाटल्या होत्या...

माझी ती त्याची होताना....
कन्यादान घडत होतं....
'दिल्या घरी सुखी रहा' म्हणत
मन दृष्ट काढत होतं....

रेणुका....१५/५/२००८....४.२०p.m.

"क्षितिज: हाती येण्यासारखं...."

ही एक दीर्घ कविता आहे....... वाचायला सुरूवात केली तर पूर्ण वाचा.......

"क्षितिज: हाती येण्यासारखं...."

क्षितिज असं आवाक्यात असतं...
अगदी हाती येण्यासारखं...
मायाजालात गोल गोल फिरतो आपण...
आणि ते क्षणात होतं पारखं...
बेड्या पडतात पायात...स्त्री असल्याच्याच...
न जाणो कसल्याशाच....
तसं इथं पर्यंत येणंही
अवघडच करून ठेवलेलं...
पण आलते गाठत...
एकेका पायरीत माझी मीच साठत...
म्हटलं गाठावे हळू हळू जमेल तसे
टाकावेत आपल्याला हवे ते फासे....
पण लक्षात आले मग....
संसार आणि career यातच आपण पळतो...
सुवर्णमध्य गाठावा म्हटलं तर
तोल एकीकडेच ढळतो.....
कारण quality जातेच ना अशावेळी?
quality आणि quantity एकाच वेळी?
नेहमीच तर असते त्यांचे प्रमाण व्यस्त..
सम प्रमाण करण्यात आपण मात्र उगाच त्रस्त....
एकी कडे तोल गेला की
दुसरीकडून ओरड होणारच होणार......
नि वर 'त्याग-बिग'
असलं काहीसं माथी थोपणार..

ह्ंम्म्म्म,...शेवटी...
शेवटी काहीतरी एकच मिळतं...
क्षितिज तरी नाहीतर,संसार तरी....
दोन्ही म्हटलं तर मिळतं
थोडं थोडं आत्म्सन्मानला ठेच लागून...
यशस्वीपण- अयशस्वीपण
मिळते ना अर्धवट....
फाजील स्त्रीत्वावर
रचलेला कट....
कितीही काहीही झाले तरी
या चक्रव्यूहातून सुटका नाही....
शेवटी चक्रव्यूहच ना ते...
जीव घेतल्याशिवाय थोडीच सोडते?

नाही, 'त्या' अभिमन्यूसाठी सारी दुनिया हळहळेल....
आपल्या so called त्यागावर एकतरी अश्रू ढळेल?
अश्रू तर सोडा...
पण 'त्याग' म्हटले तरी
आठ्या पडतील....

जाउ द्या झोपा!
क्षितिज नाहीतर
त्याची स्वप्न तरी गाठी पडतील.....

रेणू @ एक झोका...22/01/2008....4.15p.m.....

"कारण मी 'सत्य' मांडतो......"

काही लोक 'सत्य' समजून जे चुकीचे विचार समाजापुढे मांडतात आणि आपला समाज बर्‍याच लोकांचे अंधानुकरण करतो... अशी बीजे पेरणार्‍यांना वेळेवर आवरले पाहिजे...

"मी सत्य मांडतो..."

भोगले त्या अन्यायाला
मी वाचा फोडतो...
सत्याचे कपडे फाडून त्यास
उघडा नाचवतो...
कारण,.... कारण मी 'सत्य' मांडतो....

गरीबीचा शाप मी
आजही भोगातो...
माझ्याच जुन्या जखमा मी
रोज खुरेदतो...
कारण,.... कारण मी 'सत्य' मांडतो....

ज्याने केला आध:पात
त्यास मोकळा सोडतो..
सत्याच्या नावाखाली मी
कोणास फितवतो?
ते काहीही असो, पण मी 'सत्य' मांडतो....

आपला न मानणार्‍या
समाजास चिरडतो....
'बळी' मी, इतरांच्या
मनास 'लक्ष' बनवतो...
कारण,.....कारण मी 'सत्य' मांडतो....

'जळे त्यास कळे'
वर हा शेराही मारतो....
विकृत बीजे नकळत मी
कोवळ्या मातीत रोवतो....
पण, .....पण मी 'सत्यच' मांडतो.... .
.
.
.
.
.
.
.
खरच का मी सत्य मांडतो?
खरच का मी 'पूर्ण सत्य' मांडतो??????

रेणू @एक झोका....09/01/2008......12.05p.m.

"सरोगेट मदर...भाग-2" ( भावी यशोदा..........)

--------------1-------------

वास्तव स्वीकारलय मी
पण आई व्हायचे आहे....
परिस्थितीशी तडजोड केली
पण अंगाई गायची आहे...

नको जगाची सारी सुखे
फक्त चिमुकले वाण हवे...
त्याच्या लीला बघण्याचे
फक्त मला दान हवे....

किती रे तिष्ठत ठेवशील?
ये कुठल्याही मार्गाने...
तुझ्या पावली यावे
माझ्या घरी स्वर्गाने....

स्वामी तिन्ही जगाचा
म्हणे आईविना भिकारी...
पण,प्रत्येक बाई असते,
बाळा वीना अपुरी....

प्रत्येक आई असते,
बाळा वीना अपुरी....
बाळा वीना अपुरी....


--------------2-------------

अल्लड मोरपंखी स्वप्नांसह
नव्या घरात पाऊल ठेवते....
नव्याची नवलाई सरताच
पाळण्याची गोष्ट बोलली जाते....

लाजत हसत, स्वप्न सजवत
एक आस मनात फुलते....
वास्तवरूपी निखा-याने
गर्भाशयही क्षणात उलते...

आप्तान्च्या वागणुकीचे
लवकरच मग चक्र फिरते....
रंगीत माझ्या संसारचे
क्षणात चित्र कोरे होते....

डॉक्टर्स-वैद्य, साधू-संत
औषध-अंगारे सर्व थकते....
'दत्तक घेणे' विचार मंथनी
अमृत-विष संभ्रमी पडते...

सरोगेट मदरच्या पर्यायाने
एक नवे द्वार उघडते....
चिंता-धाकधुक-आनंदाने
काळीज काठोकाठ भरते...

शेवटी विचारांच्या झुंजीत
मातृत्वाचीच जीत होते....
तिच्या भावनांचा आदर करून
ही आई 'आई' होते....
ही आई त्या 'आईची' ऋणी होते....

रेणू @ एक झोका....09/01/2007...2.52p.m.

"सरोगेट मदर...."

सरोगेट मदर....ह्या विषयी आपण सर्वांनी ऐकलेच असेल, आता कायद्यानेही ह्याला मंजुरी दिलेली आहे...पण जी अशी 'आई' होते तिच्या मनाची अवस्था कशी असेल ते मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे......विचार करता या विषयाला खूप फाटे-धुमारे असतील-आहेत...तूर्तास फक्त त्या आईचा विचार करूयात........

----------1-----------

प्वटासाठी प्वट भाड्यानं
द्यायचं ठरवलय..
आता जगायचच ठरलय
तवा ह्याच वाढलय....

इचार येतो मनात
आपण ठीवायचं नौ मास
अन कसं बा द्यायचा
आपलाच गोळा दुसर्‍यास?

न्हाई म्हनलं तरी
जीव तुटायचाच....
त्याच्या डोळ्यात
संसार आटायचाच....

न्हाई बा असलं इपरीत
जमायचं न्हाय...
पैक्‍यासाठी प्वाटाचा गोळा
इकायचा न्हाय....

पण...पण,
असल्या इचारांना
आता तरी थारा न्हाय..
न्हाय तर स्वासालाबी
आता वारा न्हाय.....


----------2-----------

मी प्रॅक्टिकल मुलगी
21 व्या शतकातली....
मान्य मला भाषा
या नव्या युगातली....

काही कमावण्यासाठी
काही गमवावेच लागते...
या हाताने देऊनच..
त्या हाताने घ्यावे लागते....

पण,पण... हा ठोका??
हूरहूर लावतो मनाला....
नकळत मन गुंतत जाते
श्वासा-श्वासाला....

ही जाणीव मतृत्वाची
कित्ती कित्ती अनमोल...
त्यासमोर विरते नाही?
कागदी पैशांचे मोल....

पण छे! असले फुटकळ विचार
मनात आणून कसे चालेल?
प्रॅक्टिकलीच जगायला हवं....
मायेच्या दुनियेत मायेला त्यागायला हवं....


----------3-----------

नाळ तुटली तरी
नाती तुटत नसतात...
अंगा-प्रत्यन्गातून
आईची रूपे बोलत असतात...

परिस्थितीशी केलेली
ही एक तडजोड....
समजू नका ही
वृत्ती धर-सोड....

म्हणा निर्लज्ज,
वा लालची.....
द्या हव्या तर शिव्या,
वा द्या पातळी खालची....

पण असा
फास कसू नका...
माझ्या मतृत्त्वाला
कृपया हसू नका....

रेणू@एक झोका..07/01/2008...1.15p.m.

"ना लक्ष्य भेदले..."

ना लक्ष्य भेदले...
ना कक्ष छेदले...
ना कधी कोणते भक्ष वेधले....

ना रात जागीली....
ना प्रभात साहिली....
ना कधी कुणाची प्रीत वाहिली....

ना नाकर्ते पोसले...
ना करविते सोसले....
ना कधी कुणाला व्यर्थ कोसले.....

ना मोह पडवला....
ना दाह घडवला...
ना कधी कशातच राम अडवला.....

ना आद्य घावला...
ना अंत धावला.....
कधी जीवनाचा अर्थ मावला?

Renuka Khatavkar... ०७/०५/२००८....११.१० a.m.

"तत्वं-श्रध्दा-आदर्श .............."

तत्वं-श्रध्दा-आदर्श
दिवसेंदिवस येतात विश्वासात.....
त्यांची मूळं विस्तीर्ण होतात.....
फैलावत जातात.....
आपल्या सर्व आयुष्यात.....
अन् काही प्रसंग
या सर्व विश्वासाला हादरवून टाकतात....
अगदी मुळापासून.....
त्या आदर्श-तत्वांच्या कुळापासून....
काहीजण रडतात...
काही सोसतात- हसतात...
काही हसतच सुटतात.....
काहीजण तुटतात, फुटतात....
काही कुढतच बसतात......
असेच तर असते...
व्यक्ती तितक्या प्रकृती.....
नि प्रकृती तश्या स्विकृती.....
काहीजण यातून उठतच नाहीत......
असं पायाखालची जमीन
सहजासहजी गेल्यावर कसं उठायचं???????......
अन् जग म्हणतं...जगायचं असेल....
जगायच'च' असेल तर नाचायचं......
असं मुळान्ना ठेच लागली की,
भला थोरला वृक्षही धुळीत मिळतो....
माणसाचं काय?... उठतात परत...
इतरही असतं ना मागे उरत.....
पण काही तरी गमावलेलं असतं.....
आणि थोडं फार कमावलेलंही असतं....
तत्वांची टरफलं....
आदर्शांच्या चिंधड्या.....
नि श्रध्देची तुटकी मुळं....
सगळच ठिस्सूळ.... ढासळणारं.....
विचारांचं मंथन मात्र फेसाळणारं....

हं त्यात नीट बघा....
नक्की काहीतरी मिळेल...मिळालं???....
अनुभव!
अनुभव चिरडून टाकतो अभिमान-गर्व.....
नि सांगून जातो आयुष्याचा अर्थगर्भ.......
पण आपण यातून तडजोडी करायला शिकतो.....
तत्व-श्रध्दा-आदर्श कदाचित थोडी थोडी विकतो....

हेच सर्व तर असतं त्रिकालाबाधित....
सर्वाची राख करणारं....
तरीही राखेतूनच जन्म देणारं अबाधित......

रेणू@एक झोका...26/02/2008......10.50a.m.

"घाव........"

तप उलटले, घाव माझा थिजलेला
दिस पलटले, गाव माझा भिजलेला धृ

मोजतो आताही, तारे त्या नभीचे
रोखतो आताही, वारे त्या सदीचे
सखे ग कसा, भाव माझा फसलेला 1

पोसतो आताही, बंध या जगाचे
सॉसतो आताही, द्वंद्व या मनाचे
मन बरसले, डाव त्याचा हसलेला 2

Renuka Khatavkar.
21/02/2008,12.07a.m.