About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Tuesday, December 11, 2007

"नशा....."

"नशा....."

मी मावळलेला एक पिंड..
जगण्याचा दंड....शब्दांनी धिंड...
काळजात सल, अपमानाचं ओझं...
धूसर नजरेचं जीवनही खुजं...
एकेकाळी उगवतीवर नाव...
आब, मान-मुज-याचे गाव,
शब्दालाही भाव...
पायाखाली जग थोटकं....
हात जोडुन पुढे सुखही खोटं...
बोलणारा पैसा, डोळ्यावर झापडं...
फाटकच मन पण उंची कापडं..
ना कशाचे भान, ना कोणाचा मान...
ना सख्खा मित्र, जीवन स्वैर बेभान...
हम्म्म.....
यशाची नशा.......नशाच शेवटी...
उतरली की दिसते........
छिन्न-विछिन्न शरीरावर
मांसरहीत कवटी...
जाताना घेऊन जाते दिलेले सर्व...
तेव्हा कळते संपलेय पर्व..

ती जाते उगवतीकडे
नवीन सूर्याच्या शोधात...
तोही कदाचित बहकणार
नशिल्या धुन्दिच्या ओघात......
कदाचित तो सूर्य तूच असशील.....
म्हणून फक्त सांगावेसे वाटले...
ठीक आहे, जायचे तर जा...
नाहीतरी मावळणार्‍याचे
इथे कोणी ऐकले?

रेणुका @ एक झोका.....11/12/2007......10.20a.m.

"सल......."

"सल......."

पुन्हा सल तो मनी जागला रे
जन्माधीच अंकुर कसा खुडला रे

विसरू कशी पाऊलखुणा तिच्या?
अशा नीच वृत्तीस ईश लाजला रे

नऊमासही देऊ शकले न तिजला
पसा हा कसा मायचा माजला रे

गर्भात नाकारूनी सोय-यांनी
उगम का नसे आपला शोधला रे

चौकट ही अशी पूर्ण कारवण्या..
माणूस का असा नादला रे?????
माणूस का असा नादला रे?????

रेणुका @एक झोका..चुके काळजाचा ठोका...17/10/2007...11.30A.m.

"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."


"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."

मधुधुंद गंध, बेधुंद हवा
मोरपिसी स्पर्श नवा....
सोड ना हात साजणा....
मंद कर ना रात दिवा....

कीणकिणतॉ बघ चुडा
चांदण्यांचा शेज सडा...
नजरेचे भलतेच इशारे
श्वासांचा आवाज चढा...

शाश्वतीचे वरदान असे
या क्षणांना चढलेय पिसे...
बेभान मदमस्त निशेत
देहभान सांग का नसे??..

काजळ अलवार विखुरले
स्वप्न समीप अवतरले.....
चढत्या भावनांचे काहूर
बाहुपाशात तुझ्या निवळले...
बाहुपाशात तुझ्या निवळले.....

रेणुका @ एक झोका...15/11/2007...11.40p.m

"कवितेत माझ्या...."

"कवितेत माझ्या...."

बोच, सल, वेदना ही कविता असते?
प्रेम, प्रणय, प्रेमभंग ही कविता असते?
शब्दांत शब्द, यमके ही कविता असते?
वृत्त, विचार, कल्पना ही कविता असते?
देव, भक्ति, उपासना ही कविता असते?
काहीतरी याही पलीकडचे लिहायचेय...
शब्दांपलीकडले,क्षितीजापलीकडले...
मृत्यू पलीकडले, नि भावनांपलीकडले...
शब्द? ते अदुजे करीन..
मृत्यू? अनुभव रेषेला छेद देऊन,
कल्पना शक्तीने वेध घेईन.....
भावना? निगरगट्ट करीन...
पण भावना होत नाहीत निगरगट्ट..
धरून ठेवतात अगदी घट्टच घट्ट...
होत नाहीत दूर त्यांचे मानावरचे वर्ख..
लावले जरी कितीही तर्क....
त्यांना आस्मानाचं गाव,
समुद्र गहिरा ठाव...
आस्थेला वाव......
सगळं कसं एकमेवाद्वितीय....
ना बंध....ना कडे वृत्तीय...
आकस्मीत, आंदोलने कदाचित असंघिक...
अभंग, अतुलनीय, अभेद्य अन् अलौकिक...
म्हणून वरचे सर्व असेलच कवितेत....
अद्वितीय नसेल कदाचित..
पण उत्स्फूर्त तर असेल.......
कवितेत माझ्या 'मन' ढगाळ असेल....
कारूण्य भेगाळ असेल...
प्रेम, वृत्त, भक्ति...ओतप्रोतही असेल...
पण मी त्यापासून अनभिज्ञ नसेल.....
कविता माझ्या वेदना बोलतील....
प्रेमाचे गुपित खोलतील....
उपासनाही करतील....
पण, शब्दांकीत राहून...
क्षितिजरेषेवर वाहून....
मृत्यू अलीकडचीच पाखरे
निघतील भाव-पर्जन्यात न्हाऊन....

रेणुका @एक झोका...27/11/2007.......12.30a.m.

"रेषा धूसर....एकच उत्तर...."

"रेषा धूसर....एकच उत्तर...."

एक आशा, एक निराशा...
रेषा धूसर....जिद्द उत्तर....

एक हार, एक जीत...
रेषा धूसर...आत्मविश्वास उत्तर...

एक मानव, एक राक्षस...
रेषा धूसर....क्षमा कर....

एक सार, एक प्रहार...
रेषा धूसर.... शांती उत्तर...

एक वाद, एक संवाद....
रेषा धूसर....विचार सारासार कर..

एक चूक , एक बरोबर...
रेषा धूसर....'मी पण' विसर...

एक आत्मा, एक शरीर...
रेषा धूसर....प्रभुनाम् जप कर....

एक जीवन,एक मृत्यू...
रेषा धूसर....क्षणाचे अंतर....

एक प्रश्न, एक उत्तर....रेषा धूसर....
'जीवन' हे एकच उत्तर.....

रेणुका@एक झोका....26/11/2007....10.00a.m.

"मनात एक विचार आला..."

"मनात एक विचार आला..."

मनात एक विचार आला...
आपल्या मनात
किती विचार असतात नाही?
कधी खोल तर कधी
अगदीच काहीच्या बाही...
मग यावरच खूप विचार केला...
विचार खूप खूप खोलवर गेला...
अगदी मनाच्या तळाशी...
सर्व विचारांच्या मुळाशी....
अन् मग विचार ते तरल झाले...
हळू हळू वर येऊ लागले.....
हरेक विचारांचे एक-एक
फुलपाखरू होऊ लागले....
काही वेळातच झाला...
असंख्य फुलपाखरांचा थवा...
हवा होता त्यांना...
आकाशापर्यंतचा मार्ग नवा...
आनंदी तर कधी दुःखी होत होते..
या फुलपाखरांना रंग होते......
कधी गुलाबी कधी करडा.....
आणि जातही होती....
तीही "सरडा"....

रेणुका@एक झोका....13/11/2007....11.15p.m.

"सांग मी कोण रे?....."

"सांग मी कोण रे?....."

सांग मी कोण रे?
छुमछननन तुझेच मी बोल रे...
सांग मी कोण रे?
रुनझुननन तुझेच मी गीत रे...

पायात गिरकी घेऊनी
क्षणात खाली बसेन मी...
बसूनी दोन्ही करांनी
पाऊस उधळेन रे....

गारवा मस्त लेवूनी
अवखळ सर होईन मी...
सरसरसर बरसूनी
विश्वात मुरेन रे...

धुंद मृदगंध होऊनी
सर्वत्र दरवळेन मी.....
क्षणात तुजसी मंत्रूनी
तुझ्यातून चोरेन रे....

बेबन्द घुंगरू होऊनी
छंकारत नाचेन मी...
लयबध्द करूनी तुला
सृष्टीसही नाचवेन रे...

सनसननन पवन होऊनी
हातून निसटेन मी.....
एक उसासा देऊनी
माझ्यातच रमेन रे...

घनघोर पुन्हा होऊनी
आकाशी भरेन मी...
अंत तुझा पाहूनी
कधीतरीच बरसेन रे...

निथळणारी जलधार मी
हळवी हूर हूर मी....
ओंजळीत पानांच्या
हसूनी थिरकेन रे....

रेणुका @एक झोका....29/11/2007.....10.30p.m.

"आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता..."

"आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता..."

आज म्हटले चला, लिहू स्वतः वरच कविता...
कुठून सुरूवात करू? आणि काय गाऊ गाथा?..

स्वभावाबद्दल लिहू की लिहू केलेल्या चुकांवर...
सुखांवर भरभरून लिहू, की लिहू दुःखांवर?...

काय लिहावे कळेना, मन काही केल्या ऐकेना...
"मी ओळखलय मला खरच" हे काही पटेना....

कधी कधी मी कशी वागेन हे माहीत नसते...
इतरांसाठी कदाचित न पटलेलेही करत असते....

कधी कधी खूप वेडे-पिसे होते असे वागताना...
स्वतः च्या मनाचा गळा स्वतःच घोटताना....

असे मनाला समजावताना कित्ती हाल होतात...
आपलीच ही मने मग गेंड्याची साल ओढतात...

इतके सर्व करून स्वतःलाच शोधायचे असते....
जनसागरातून आपले वेगळेपण दाखवायचे असते....

पण हे जमते का सर्वांना?... कसले हो जमतेय...
स्वतःला सिद्ध करायला एका कवितेने काय होतेय?

रेणुका @ एक झोका....17/11/2007....1.40a.m.

"सुप्त इच्छा..."

"सुप्त इच्छा..."

सुप्त इच्छा..हिला सर्व असतं..
दहा हात, नाहीतर सहा पाय...
नाक डोळे, कान, मान..
जाणिवा आणि पंचप्राण....
नसतात ते शब्द, भाषा आणि तोंड...
काहीसे भाव उरफाटे
अन् विचार दुतोंड....
कधी तिला अमूर्त रूप...
कधी कीर्तीचे अप्रूप....
कधी आर्त धारदार पाती...
भ्याडाची छाती...
नि भावनांची माती...
मनाची गढूळ उलाढाल..
बधिर-मुजोर साल...
प्रचंड मानसिक हार...
स्वप्नाच्या आश्वावर स्वार...
ठिणगी दडीत गारगोटी...
रण बीज पोटी...
कधी ठरते कर्दनकाळ..
कधी गळ्यात माळ...
कधी कधी र्‍हास...
कधी स्व-शोधाचा प्रयास...
असते कधी अल्पयुषी...
तर कधी शतायुषी...
सदसदविवेकबुध्दीची ही दासी...
बहुरंगी बहुढन्गी खासी..
तरीही कोण कोणास पडेल भारी
सांगता येत नसते...
यावरच तर आयुष्याला
दिशा मिळत असते...

रेणुका @एक झोका..07/12/2007...3.15p.m.

"मौन........"

"मौन........"

अव्यक्तातूनही साधतं असं म्हणत होते..
न बोलताही समजतं असही म्हणत होते..

व्यक्त केल्याने कधी कधी अर्थ बदलतात...
बिघडलेले अर्थ कधीच जुळत नसतात...

थोडसं मनालाही बोलण्याची संधी द्यावी..
डोळ्यांनाही काम करण्याची कला यावी...

समजावून देण्याची एक निरागसता असावी...
अन् समजून घेण्याची उदारता का नसावी?

म्हणून वाटते, स्पष्ट बोलून साधतं नाही,
पण मौनातून साधतं बरेच काही...

हा मार्ग आहे भल्या भल्यांनी सुचवलेला..
अन् मी आपल्यासाठी परत इथे गिरवलेला...

रेणुका @एक झोका...11/2007....2.30 a.m.

"भारलेल्या चांदण्यांचा कवडसा.... "

"भारलेल्या चांदण्यांचा कवडसा.... "


काही भारलेल्या चांदण्यांचा कवडसा भग्न
स्वयं प्रकाशात मग्न?
गोठते सृष्टी प्रश्नात...
अहं,चंद्राच्या भाडोत्री उन्हात.....

चंद्र गिळलेली मध्यरात्र...
नि:शब्द गात्रं, स्तब्ध पात्रं...

आवसेच्या चन्द्राला अर्घ्य..
पण तिलांजली नव्हे...
भार खांद्यावरच
पण, ही तिरडी नव्हे...

रेणू @ एक झोका...03/12/2007...12.50 p.m.

अर्थ थोडक्यात सांगते.....
एक प्रयत्न केलाय... ....अर्थ थोडक्यात सांगते..... चांदण्या= लहान लहान स्वप्ने... जी कवडशासारखी फक्त.... भारून टाकतात आनि तरिहि.... आपल्याच नादात असतात, कधी भग्न होतात तरीही स्वत:च्यात नादात का असतात?? हा त्यातला प्रश्न....ज्य स्वप्नांत आपले विश्व समावलेय असे..... चंद्र म्हणजे एक आयुष्याचे मोठ्ठे स्वप्न....... पण दुसा-यावर विसंबलेले...... आणि असे स्वप्नही भग्न होते... नि झोप उडते....म्हणजे चंद्र गिळलेली मध्यरात्र....... मग आपल्याच आक्रोशात आपण निशब्द, आपल्या आयुष्यातले सर्व नातेवाईक, मित्रही स्तब्ध...अशा वेळी कोणीही येत नहि...आपणही निर्जीव असल्यासारखेच! आणि असे चंद्र (धेय) नसलेले जगणे.....त्या प्रमुखशा स्वप्नाकडे दुर्लक्ष केलेय...(अर्घ्य दिलय) पण मुळापासून नहि...म्हणजे तिलांजली दिली नाही....एक आशा आहेच कधीतरी कदाचित चमत्कार होईल आणि स्वप्न साकार होईल.... अशा बर्‍याच लहान मोठ्या स्वप्णनाचा भार आहे मनवर....पन ही तिरडी नाही.....


अशी माझ्या कुवतीप्रमाणे लिहिलेली (gudh) कविता...

"सखा...........हे जग स्वार्थी...."

"सखा...........हे जग स्वार्थी...."

वासनेचे हे जग स्वार्थी....
फक्त तुझाच तर स्पर्श निस्वार्थी....
तू भाषा बोलतोस विरक्तीची...
याच तुझ्या लोभसवाण्या खरेपणावर
वाढे भावना आसक्तीची....
पण छे!तू तर चक्क अमलात आणतोयस...
अशी अवेळी कात टाकून,
विरागी अवस्थेकडे धाव घेतोयस...
पण असे वैराग्य-भक्तीचे कातडे मागे सार..
मी सामान्यच रे...
तुझे हे असामन्यत्वाचे वलय कर पार...
हो, तू म्हणाला 'मादी कल्पना वाईट'...
मादी वैगेरे या कल्पना फोल ठरतात तुझ्यापुढे....
नीलाजरेपणा नाही हा...
आपण 'एकच' असण्याची ग्वाही देते तुझ्यपुढे...
ऊगाच नाही, ठेवलेत त्याने हे भेद...
नकोस ठेवूस मनात कोणताही खेद...
राहू दे सर्व आहे तसेच अगदी....नैसर्गिक....
त्यात आणू नकोस भक्ति वा जीवन वैरागिक....

रेणुका @ एक झोका...24/11/2007....1.20a.m.

"एक आस......."

ज्या क्रमाने मी लिहिलय त्याच क्रमाने देत आहे...विषय एकच फक्त 'व्ह्यू' वेगळे....

-----1-----
पंख छाटले जरी...
कळ दाबिली उरी...
झिडकारुनी गुलामी,
घेईन झेप अंबरी..

आयता तो घास...
उतरेना हमखास...
उघडेल केव्हातरी...
पिंज-याची कडी...

ही आस असे अंतरी...
बितेल जिवावर जरी...
आस असे जिंकण्याची....
एक उमेद जगण्याची....

-----2-----

मी फूल अबोलीचे...
घेतले ओझे लग्नाचे...
कोणास नसे किम्मत...
पण सोडली ना हिम्मत...

आई-बपाचा उध्दार...
होतसे वारंवार....
सर्वांचा अपमान....
कशी विसरू आत्मभान?

राहील स्वबळावर उभी..
आहे तीही खुबी...
ही आस असे जिंकण्याची
एक उमेद जगण्याची....

------3-----

झाला एक अपघात...
दैवाने केला घात...
पाय झाला निकामी...
येऊन गेली सुनामी....

आल्या कुबड्या हाती...
स्वप्नांची झाली माती...
हारली देवाची पूजा....
झालो जरी खुजा.....

करीन यावरही मात...
करीन कला आत्मसात...
ही आस असे जिंकण्याची
एक उमेद जगण्याची....

------4-----

तो गेला, आता अंधार...
कसा कुठे शोधू आधार?
जीवनाचे काटे रुततात...
आठवांच्या जखमा फुलतात...

रक्तहीन जखमा,धीर चेपतो..
जग बदलते, अश्रूही सुकतो....
कोणासाठी जगायचे?
भूतकाळी चाचपडायचे?

उजेडाला अंधाराचा
जडलाय शाप....
पण अंधराला?
पहाटेची स्वच्छ आस....

पोटाचा गोळा, जीव चोळामोळा...
करेन त्याच्यासाठी रणही..
ही आस असे जिंकण्याची
एक उमेद जगण्याची....

-----5-----

'मराठी कविता' हडपली..
एका शपिताने करपवली...
शब्दांशी झाला फितूर....
दाटते मनी काहूर...

संपले सर्व वाटले...
गेले ते तर गेलेच...
मागे काय उरले?
सारे जणू सरले....

पण छे,आस नसे रे मेली...
भावना नसे करपली....
मराठी मन पेटले....
जिद्दीने काव्य रचले....

परत सर्व उभारू....
काव्यांजली सवारू....
ही आस असे जिंकण्याची
उमेद कवी मनाची....

------6------

दुस्काळ यंदा पडला..
दाणाही नाही उरला...
कोरडी गिळवना भाकरी...
करतुया चाकरी....

घरधनीन खाय 'हाय'
आजारपण सरत न्हाय....
करज पण वाढतया...
ताण कमी व्हई ना...

आण देवाजीला..
पाणी दे बा शेतीला....
आयकल तो कवातरी...
जाण जागल अंतरी....

आस ही डोळ्यांमदी...
उमेद ही काळजामदी...
आस ही डोळ्यांमदी...
उमेद ही काळजामदी...

रेणुका @ एक झोका...24/11/2007....1.20a.m.

"भाऊबीज यंदाची कोरी राहते...."

"भाऊबीज यंदाची कोरी राहते...."

भाऊबीज यंदाची कोरी राहते....
एक 'निरंजन' पेटतच नाही....
मनाचे आभाळ भरून येते
पण सर आज बरसतच नाही....

उससा दीर्घ अन् थंड वाटे आज
मन आठवांच्या हरेक क्षणात...
चिडलो-भांडलो-तंडलो तरी आज
मन घुटमळे तुझ्याच अंगणात...

हे काय?
तुझेही मन माझ्याच अंगणात?
बघ दीप उजळाताहेत दहा दिशांत...
गधड्या चल, लवकर ये घरात
मनाची भाऊबीज साजरी करूयात...

रेणुका@ एक झोका...11/11/2007...9.00 a.m.

"विडंबन...."bhag 10.....पहाटे पहाटे

परत एकदा आदरणीय सुरेश भट यांची मी माफी मागतेय त्यांच्याच गाण्याचे हे विडंबन आहे....

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना...
कशी रात्र गेली कुणाला कळेना.
-तरीही नभाला पुरेशी न लाली!

गडे हे बहाणे,निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली!

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे,हालचाली!

तुला आण त्या वेचल्या तारकांची,
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची;
लपेटून घे तू मला भोवताली!
--------सुरेश भट------------------------------------

"विडंबन...."
पहाटे पहाटे

पहाटे पहाटे कुणा जाग आली
कुण्या श्वानाची ती जीभ सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना... (अरे हा तर आपलाच कुत्रा....)
कशी आवदसा आठवली कुणाला कळेना..
खाऊ घातले पुरेसे, तरी जाग आली?

गडे हा लाजतोय (चक्क) कुत्रा कशाला?
म्हणे राहू दे हात माझा उशाला...
आता मात्र झोपही पार उडाली...

कसा रामपारी सुटे तोल याचा....
म्हणे घे पोटाशी, तोवर चोराचा पोबारा...
आता राहू दे खाणे, कर हालचाली....

तुला आण त्या खालेल्या पावाची....
तुला आण त्या (चोरून) प्यायलेल्या दुधाची...
लपेटून घे चोराला भोवताली.....
(कुत्रा शेपूट हलवत त्याच्या डिशकडे पाहतोय)

रेणुका @ एक झोका...14/11/2007.....10.21a.m.

"पोलीस..."

नाण्याला बाजू दोन...."पोलीस..."

मी कर्माने पोलीस...
भावना ठेवतो ओलीस...
अपराध्यांचा द्वेष..
पण शरीरावरचा वेश?

जनता देते टोमणे....
अधिका-यांची बंधने...
ढवळाढवळ नेत्यांची...
सजा आम्हास फाशीची...

तुम्हीच आज सांगा..
लाच आम्हीच घेत असतो?
तुमच्यातलाच कोणी
उगाच देत नसतो...

सोडा हो हे सर्व...
नाण्याला बाजू दोन...
सत्य स्वीकारा की..
प्रांजळ इथे आहे कोण?...

रेणुका @एक झोका...17/11/2007....2.20a.m.

"मी चंद्र बोलतोय........."

"मी चंद्र बोलतोय........."

मी चंद्र बोलतोय.........
सल केव्हाचा सलतोय.......

बाळ-गोपाळांचा मामा झालो...
त्यांच्यासाठी खुद्कन हसलो....
चिमुकल्यांसाठी लिंबोणी मागे लपलो....
तुपात माशी, अजूनही उपाशीच राहिलो....

स्वप्नात मी प्रातिरूपही झालो....
वाट्टेल तसे रुपांतरित झालो.....
मधूचंद्राच्या दिवशी मलाच धरले....
करवा-चौथला चाळूनही काढले....

हे सर्व कमी होते की काय...
कोजागिरीला प्रतिबिंबाचेही सोडले नाहीत पाय....
एवढ्यानेच कसा बसा सावरत होतो...
तेवढ्यात कवीच्या हातात घावलो होतो...

मग तर विचारू नका माझी दैना..
राघू तर करतात कधी माझी मैना...
कधी देतात 'तिला' माझी उपमा...
नका का तिला 'रूप' हा शब्द पण बोलता येईना...

मी चंद्र बोलतोय....
ऐकतय का कोणी?
हो मस्तच......एक रेणुका भेटली....
पण तिनेही यावर एक कविता केली.....

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका...06/11/2007....11 p.m.

"दिवाळीची भेट,मनातून थेट......."

"दिवाळीची भेट,मनातून थेट......."

दिव्यांची ओळ...
पोरांचा घोळ...
किल्ला हमखास...
सण हा खास
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

सुखाची नांदी...
राळाची चांदी...
पोटोबाची मजा..
खिशाला सजा
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

मंत्रमुग्धा हवा...
साज नेहमी नवा...
रांगोळ्यांचा बहर....
फटाक्यांचा कहर
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

सुख-शांती लाभो...
अखंड वैभव नांदो...
हीच आमची भेट...
परदेशाहून थेट
.......................अशी दिवाळी
.............................आली दिवाळी

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका... 06/11/2007....11.50 p.m.

Sunday, November 18, 2007

"उंदीर मामा, उंदीर मामा आमच्या घरी याल का?..."

"उंदीर मामा, उंदीर मामा आमच्या घरी याल का?..."

उंदीर मामा, उंदीर मामा
आमच्या घरी याल का?...
हळूच दारामागून येऊन,
आजीला दर्शन द्याल का?...

आजी माझी आहे छान,
पणचुकल्यास धरते माझा कान...
मला मुळीच आवडत नाही,
कान पकडलेला खपत नाही...

तिला दाखवतो तुमची भीती,
गालात हसते, खोडील किती?...
मग तर मी खूपच चिडतो,
सगळीकडेच तुम्हाला शोधतो...

पण,
तुम्ही कुठल्याशा बीळात असता,
मित्रांनाही माझ्या ठाऊक नसता...
म्हणून तुम्हाला विनवतो आहे,
आजीला धडा शिकवायचा आहे...

मग चांगली तिची खोड जिरेल,
कान पकडणे नक्की विसरेल...
हो पण जास्त घाबरवायचे नाही,
नाहीतर ती खाऊ आणायची नाही...

तुमच्या न माझ्या दोस्तीचे,
मी तिला खोटेच संगितलेय...
हळूच तिला परत हसताना,
डोळ्यांच्या कोपर्‍यातून पहिलय...

ते काही नाही उंदीर मामा,
आता तर तुम्ही याच या...
आणि माझ्या त्या आजीला,
एकदा तरी दर्शन द्याच द्या....

मी ही बघतो..... मग,
ती कशी पकडते कान?...
तुमच्यासाठी सांगितलेत
तिला करायला मोदक छान...

मग या हं आता तुम्ही घरी
,दर्शन द्या फक्त तिला तरी...
मला दर्शन नसले तरी चालेन,
मी आपला मोदकांवरच ताव मारेन...

रेणुका @एक झोका...11/11/1007....10.45p.m.

Wednesday, October 24, 2007

"आमच्या चिमूची शाळा...."

"आमच्या चिमूची शाळा...."

चल ऊठ रे बाळा
आज तुझी शाळा...
ऊठा लवकर आटपा
उशीर झाला पळा....
...कारण आत्ता आहे आमच्या चिमूची शाळा...

मी निवांत झाले
चिमू शाळेत गेला...
चिमूने म्हणे शाळेत
उद्योग मोठा केला....
...आज आहे आमच्या चिमूची शाळा...

नव्हत्या बाई आल्या
फक्त खडू अन् फळा...
हा म्हणाला सर्वांना
चला - ऊठा - खेळा...
.....असा आमचा चिमू आणि अशी त्याची शाळा.....

आल्या, बाई आल्या
म्हण म्हटल्या पाढा...
बे चा पाढा म्हणताना
चिमूचा बसला म्हणे गळा....
...अशी कशी हो आहे ही आमच्या चिमूची शाळा...

इतक्यात चिमू आला
खूप खूप आनंद झाला...
हा गलका कसला झाला
मला लगेच पेच पडला....
...इतक्यात कशी सुटली आमच्या चिमूची शाळा...

हेडमास्तरिनपण आल्या
म्हणे कुठे तो गेला?...
काय केले विचारले
'बेल' वाजवून पळाला....
....अशी असते का वेंधळी मुलांची शाळा?

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका..23/10/2007....11.10 p.m.

Tuesday, October 23, 2007

*********"माझी आई...शोभाई......."*********

"माझी आई...शोभाई......."

शब्द फुले शोधते, शोभाई तुझ्याच ग साठी...
का सापडेना मला, अर्थ शब्दांच्याच ओठी....

तुझ्या मायेच्या उबेत, विश्व सारे विसावते....
चिन्तेस शांत झोप, तुझ्या कुशीत लागते....

अर्थ किती दडला ग, तुझ्या कोपाच्या कथेत....
धपाट्याची आधी लय, उठे तुझ्या अंतरात.....

रात्रं- दिन तू जागे, राहाशी उशाशी बसून....
दुखणे घेशी लेकराचे, अंगावर ग ओढून.....

वेळ येताच ग आई,........तू होशी खंबीरही...
लेकरासाठी आपल्या , तुझी नजर घार होई...

माझ्या आसवांचे तुला, मोत्याइतके ग मोल...
माझ्या एका सुखासाठी, जग ठरे कवडीमोल...

नको पूजा अन् मोक्ष, जन्म घ्यायचेत ग मला...
हरेक जन्मात तुझीच, लेक व्हायचे ग मला.....

तुझ्या मायेला ग आई, मी वर्तुळच म्हणणार...
आद्या-अंताचा ना शोध, कधी जगास लागणार...

शब्द फुले नाहीत ग, ओंजळ भरूनी मिळाली....
पाकळ्यांनीच ग आज, कथा तुझी गांधाळली...

ऋण नाही फेडायचे, त्यातच राहायचे ग मला....
शोभाई तुझ्यासारखीच, आई व्हायचे ग मला....

रेणुका@एक झोका चुके काळजाचा ठोका....21/10/2007....1.40...a.m.

वस्त्रहरण भाग=9 " सुन्या सुन्या............."

वस्त्रहरण भाग=9 " सुन्या सुन्या............."

हे गाणे लोकप्रिय........सुरेश भट यांचेच.."सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या......" माझे मराठीतील सर्वात आवडते गाणे...आधी त्यांची मी मनापासून खुपदा माफी मागते...या गाण्याचे विडंबन करायचे की नाही आणि केलेच तर पोस्ट करावे की नाही, या मधे खूप दिवस घालवले मी... पण शेवटी रसिकांसाठी येथे देत आहे.... सर्वांचीच परत एकदा क्षमा मागून....

प्रस्तावना नाही लिहीत आता.... कंटाळा आलाय...तुम्हाला नाही, मलाच!!!!!!! तुमची काळजी मी काय म्हणून करावी? तुम्ही करता का? माझी नाही हो इतर वाचकांची? मग?........वाचा....जमले तर हसा, नाहीही हसलात तरी मला काय? तुमचेच वय कमी होईल....मग बघा तुमचे तुम्ही ठरवा....

मूळ गाणे....
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
.....सुरेश भट.........................................

विडंबन......

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
माझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
येणार इथे मानवजात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
का नसे रे चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
चपराशी का हशात आहे

सांगा तुम्हा भेटतील कोठे
असे मधुर (बे)सूर अनोळखीचे
उभी एकटीच अंगणी स्वरांच्या
खुर्च्याही मम गीत गात आहे....

उगीच सर्वांना आणण्याची
कशास केलीस आश्वासने तू
दिलेस का (फुकट) तिकीट तू कुणाला
तुही दडला का कोपर्‍यात आहे

रेणुका @ एक झोका... चुके काळजाचा ठोका...23/10/2007....12.05 a.m.

Friday, October 19, 2007

वस्त्रहरण भाग =8 " तुझे नि माझे..."

वस्त्रहरण भाग =8 " तुझे नि माझे..."

आनंदाने आमच्यावर वार केलाय,अर्थ नाही कळला का? आनंद माने यानी .....आणि आमच्यावर म्हणजे घाबरू नका, कधी कधी मी स्वत:ला आदरार्थी बोलावते....का? माहीत नाही...प्रथम त्याची माफी मागते,त्याच्या कवितेचे विडंबन आणत आहे इथे म्हणून, हो, तो लहानच आणि भाऊही त्यातून, मग त्याची माफी का मागायची हा प्रश्न खूप वेळ सतावत होता मला... पण एक पद्धत आहे ना ही..म्हणून.हो, आपण खूपशा जुन्या पद्धती का पाळतो? हे आपल्याला समजत जरी नसले तरी पाळतोच ना? म्हणून...

प्रस्तावना जरा जास्तच असते ना माझी? जुनी म्हण आठवली... ऐका ना प्लीज...प्लीज्ज... "चाराण्याची कोंबडी अन् रूपायाचा मसाला........" पण मसल्या शिवाय कोणी कोंबडी खाणार का? समझनेवलो को..अहो थांबा, थांबा...नाही जास्त बोलत....वाचा.ही मूळ कविता....


तुझे नि माझे...

तुझे नि माझे जीवन सरले
अता कुठे हे प्राण ही उरले

सरली होती द्वाड ती संध्या
चंद्र-सूर्य ही मागे फिरले...

वेचत आहे मी शब्द तुझे हे
मौनातूनी जे उरले-सुरले...

सोड सखे तु आज हा रूसवा
ओंजळीतून या काही न उरले..

कोण निघावे पहिले येथून
सांग तुझे मग काय गं ठरले..

@आनंद माने
-------------------------------------------------------------------------------------------------------------

तुझे नि माझे... (आनंद आणि आनंदी........)

तुझे नि माझे वय हे सरले
अता कुठे ग दातही उरले?

विसर की आता द्वाड ती संध्या
चंदया-सूर्यालाही तिने मागे फिरवले...
(मग माझी काय बिशाद?...ते दोघे पहिलवन होते ना........)

वेचले होते मी रुमाल तिचे ते
चंदया-सूर्याकडून जे उरले सुरले...

सोड संध्ये...(ऊप्स, सॉरी... )आनंदे, तू आज हा रुसवा...
आता कुठे ग वयही उरले? (काSSSSSशश.........)

कोण निघावे पहिले येथून
( तू गेलिस तरी चालेल मला........चालेल कशाने, पळेल ही)
सांग तुझे मग काय गं ठरले..

रेणुका@ एक झोका..........चुके काळजाचा ठोका.......19/10/2007........12.40 p.m.

"गारुड...."

"गारुड...."

आरं, बस कर तुझं पवाडं
अन् थांबव तुझं ते भारुड....
मायावी तुझ्या दुनियेतलं
थांबव ते नजरंचं गारुड...

त्या तुझ्या गारुडावर
अश्शी डुलाया लागलेय...
आज माझ्या इरोधात मीच
बंड पुकाराया लागलेय...

माहिते मधाळ बोलण्याला
मन माझं भुलतय....पण,
काय करू कळना
'गारुड' वर चढून बोलतय...

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका....07/10/2007...11.45 p.m....

Monday, October 15, 2007

वस्त्रहरण भाग=7,"तरुण आहे ....."

वस्त्रहरण भाग=7,"तरुण आहे ....."

सर्वप्रथम सुरेश भट यांची मी हजारदा माफी मागते...मनापासून.कारण त्यांचे चर्चित गाणे...'तरुण आहे....'याचे बिडंबन करण्याचे धारिष्ठ दाखवले आहे...माफी असावी.वाचकांचीही माफी मागतेय.. कारण आपल्या आवडत्या गाण्याला धक्का बसला तर मज मूढ आणि अल्पमती असलेलीला माफ करावे....हुशश!!! औपचारिक बोलणे भलतेच जड असते नाही? जमेल हळू हळू मलाही.... चला, आपण लगेच विडंबन .....हेय कुठे निघालात? नाही, ते तुमच्या जागेवरूनच वाचायचे आहे..चला म्हटले की लगेच उठलात का? कोण आहे रे तो..'उठलोच नाही मी', असे कोण म्हणतोय? असो! तर मग वाचा.....'आलिया भोगासी.....' आता हे आणि कोण म्हटले? असो सोडा त्यांचे, आपण आपले विडंबन वाचूयात.......

ही मूळ कविता....

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे

बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे

उसळती ट्टदयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे

ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे
...........Suresh B..........................................................................................................

तरुण आहे तू अजुनी, राजसा विसरलास का रे
एवढ्यातच त्या जागेवर, तू असा (तीनदा) पडलास का रे...

अजूनही बुझली न जखम ती, पायाच्या गुडघ्याची
(मलम) लावूनी मी थकले कुठे रे, हाय तू थकलास का रे
(पड ना अजून दहादा......)

सांग या कोजागीरीच्या चांदण्यांची काय चुकी
चालायचे मतच तुझे, आणि तू धड-पडलास की रे...

बघ तुला पुसतोच आहे, शेजारचा तो म्हातारा
(तो म्हातारा तसा पडलेल्या पेक्षा लहानच हो...)
(म्हणतोय) गटारीच्या त्या पाण्याचा गंध तू लुटलास का रे...

उसळाती हृदयात तुझ्या रागाच्या बेधुन्द लाटा...
तू कोरड्यासारखा, पण तो हसलाच की रे...

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मंद-मंद का रे
बोलावा रुग्णवाहिकेला, तू असा चाललास का रे....
(मघाचाच म्हातारा....बोलवायला)

रेणुका@एक झोका...15/10/2007, 11p.m

"स्त्री शक्तिचा एक थेंब मी........."

"स्त्री शक्तिचा एक थेंब मी........."

नमस्कार मित्रांनो!!!!! माझी कविता, विषय वेगळा, कविता वेगळी........तरीही 'कविता' म्हणूनच फक्त पहा ही नम्र आणि आग्रहाची विनंती.......चूकले वा काही न आवडल्यास आधीच आपली क्षमा मागते.एक कविता म्हणून आनंद घ्याल अशी अपेक्षा...

मी लेक, मायेत वाढून तेच बीज अंगिकारलेली...
जन्माने सुख, तर निरोपाने दुःख देणारी....

एक बहीण नाजूक, रक्षणाचे कवच मागणारी....
नि तुमच्या अश्रूंचे दान स्वतःसाठी मागणारी...

मी अल्लड प्रेयसीही, निरव्याज प्रेम करणारी...
इंद्रधनूचे रंग आयुष्यात अलगद अचूक भरणारी...

मी एक पत्नी, स्वयंपूर्ण, तरी संसारासाठी वेचलेली...
सुख-दुःखाचे पारडे समर्थ, तोल सांभाळत पेलणारी...

माता मी, कठोर तर कधी मातृत्वाने गाते अंगाई...
वकदृष्टीस आडवा वार, वाघालाही पाणी पाजणारी....

मी अबला, कधी सबला, हारते, हरून जिंकावयासी...
बुद्धी, रूप तर कधी तलवारीने रण गाजवणारी...

मी शाप, बाजार मांडूनही स्व-जातीला तारणारी...
निर्लज्जपणे का असेना पण समाज सुधारवणारीच..

मी सकारात्मक कधी नकारात्मक भूमिकेतलीही..
थांबा,.............. इथे तुम्ही सर्वही आहातच की...

मी बळीही, पण ठिणगीच मी, जरी थंड असले तरी....
धग मी अफाट, विध्वंस कणा कणात गोठवलेली....

मी एक दिशा, आशा, उषा, निशा, आणि नशाही...
मी दृढ, गूढ, सूड, मी मंथनातले अमृत नि विषही...

मी कुरूप, सुरूप, स्व-रूप, आणि अ-रूपही कधी...
मी सरस्वती, दुर्गा, रेणुका, तर रणचंडीकाही कधी...

या स्त्री शक्तिचा एक थेंब मी, माझ्यामुळे हा सागर...
कशाला? हा स्त्रीशक्तिचा थांग नसलेला सागरच मी....

आता शिवालाही न पचणारे विष मी....
जरी पार्वती, तरी आता फक्त 'नारी' मी...

पण खबरदर!!!!!! लक्षात राहू द्या मंथनाचे,
आणि हो, हे मंथनही मीच......विचारांचे......

तरीही मी संस्कृती... जाणणारी, जपणारी, रुजवणारी...
थेंबातली ठिणगी, पण चौकटीच्या आतच अजूनही मी...

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका....15/10/2007.....12.45 a.m.

(शेवटच्या ओळीचा अर्थ, अजूनही चौकट ओलांडली नाहीए आम्ही.......)

"पण म्हणून काय असे करायचे?......"

"पण म्हणून काय असे करायचे?......"

दाद्याछी छगला खेल छेअल कलतो...
एकदा नाई कलावा वातला..
त्यानी माज्या नावाचा बॅन्द
छाल्या गावात ज्याऊन वाज्यवला...

स्पर्धेत श्लोकांच्या भाग घेतला...
गर्दी तिथली देखूनी तोबा...
ग्रहण लागले मम वाचेला...
तदपश्चात मातावाचाळतेने मज पिडला....

बाईंनी पाढे सांगितले पढायला...
21 चा पाढा नाहीच मुळी आठवला...
सार्‍या वर्गासमोर त्यानी माझा
शिस्तीत कोंबडा की हो बनवला...

एकदाच..(?)
चार विषयांत नापास झालो...
बाबांनी असा काय धोपटला...
चांगला मिसरूड फुटेपर्यंत मला
तिरस्कराने डोस पाजला....

बेब च्या तालावर कायम नाचलो...
एक दिवस जरा लेट पोहोचलो...
क्षणात, चल जा उडत, म्हणत
पत्ता आमचा 'कट' केला....

बायकोचे 5-6 वाढदिवस...(5 की 6?...)
कॅण्डल-लाइट मधे साजरे केले...
सातवा चुकून खरच विसरलो....
पण 'टोमणा' अजून नाही चुकला...

मुलांना नेहमी प्रोमीस करतो...
मीटिंग मुळे एखाद वेळी रद्द केला...
पण 'चीटर' म्हणून त्यांनी
परमनंट स्टॅम्प माथी मारला...

नाही, तसे हे सर्व फक्त
एक-दोनदा रिपीट झालेही असेल...
पण म्हणून काय असे करायचे?
सर्वांनी असे वाळीत टाकायचे??

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका....14/7/2007.....12.15 a.m.

एक ओळ काल वाचनात आली होती..."आपण केलेल्या अनेक गोष्टी लोक विसरतात, पण एखादी क्षुल्लक चूक लक्षात ठेवतात..." खूपच आवडली.म्हटले या वर काहीतरी लिहावे....पण डोक्याला वाचणा-याच्या जास्त ताण पडू द्यायचा नाही.. म्हणून असे लिहिले.......

Friday, October 12, 2007

"एक 'माणूस' भेटतो....."

एक 'माणूस' भेटतो.....

रात्रीची वेळ, बस फेल, घरी कसे जायचे?...
चेह-यावरची काळजी,नि भीती ड्रायव्हर ओळखतो...
अग, सोडतो मी डेपॉपर्यंत, तो सहज बोलतो...
मग तिथे एक 'माणूस' भेटतो.....

जेव्हा सारकारी खात्यात काही काम नडते....
एखादा कर्मचारी दुसर्‍याच्या टेबलचेही काम करतो...
अहो आम्ही तुमच्याचसाठी इथे, असे म्हणतो...
तेव्हा तिथे एक 'माणूस' भेटतो.....

फोनचे कार्ड संपते आपण कुठेतरी अडकतो...
तेव्हा एखादी स्त्री स्वतःचा फोन न मागताच देते.....
आणि कर ग फोन यावरून, हसत म्हणते...
तिथेही एक 'माणूस' भेटतो.....

रस्त्याने चालताना कधी कधी सहज दिसते...
गरीब मुलाला कोणी लाडाने काही देत असते...
त्याच्या चेह-यावरच्या भावात काय नसते?....
तेव्हा तिथेही एक 'माणूस' भेटतो.....

अनोळखी ठिकाणी जेव्हा आपण असतो
भाषा येत नसली तरी एकमेकांकडे पाहून हसतो...
अपरिचित लोक, मदत घेतो आणि करतो....
कारण हसणारा एक 'माणूस' च असतो...

माणसाची माणूसकी आपण जगतो....
आपण अडचणीत असताना
कधी सहज एखादा माणूस भेटतो,
तेव्हा त्यामाणसात आपल्याला 'देव'ही भासतो....

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका...12/10/2007.....3.10 p.m.

गझल......"पावसाळी थेंब...."

गझल......"पावसाळी थेंब...."
(वृत्त =गालगागा गालगागा गालगागा गालगागा)

आस सजने चातकासम, का अशी प्रश्नात आहे...
मी असा तव "पावसाळी थेंब," उत्तरात आहे...

ये अशी तू ठिणगीसम काळजातच धगधगूनी...
तीच धग मी पेरण्यासी आज तव श्वासात आहे...

विझवूनी दिन सजने, सांजवाती लाव ना गं...
तू तरीही उजळलेली, 'सांज' स्वप्नात आहे...

मंदशा गंधात तुझ्या व्हायचे बेधुंद मजला...
बघ मत्सरी रातराणी, दूर त्या रानात आहे...

धुंद मी आता ग, रात्र ही सप्तरंगात भासे...
तुज रूपाने उतरली, तारका साक्षात आहे....

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका....0/10/2007...12.30 a.m.

त्या एका राक्षसी क्षणाला आवर घालता येणार नाही का???

त्या एका राक्षसी क्षणाला आवर घालता येणार नाही का???

त्या एका राक्षसी क्षणाला
आवर घालता येणार नाही का?
माणसातल्या माणूसकीला तेव्हा
एक साद घालता येणार नाही का?

त्या एका वासनाभरल्या क्षणात
एक आयुष्य उध्वस्त होत नाही का?
क्षणिक सुखासाठी मनासकट तिला
विटंबने सोडता येणार नाही का?

वखवखलेल्या नजरांचे वार नेहमीचेच
पण, पुढचा हा खेळ थांबवता येणार नाही का?
शब्दांमधला आदरच फक्त काय कामाचा
भोगवस्तू म्हणून पहाणे सोडता येणार नाही का?

फक्त एक क्षण...
फक्त एक क्षण विचार करा
क्षणाचा आहे हा खेळ सारा...

एका क्षणाची वासना..
एका मनाचा रोग..
एका मनाचा संभोग...
एका मनाला तो भोग....

एक क्षण संपत असतो...
वनवास कायम उरत असतो...

दुःख, अवहेलना, मानहानी बळी गेलेल्याची
आणि त्या बरोबर त्याच्या घरच्यांचीही....
आणि कदाचित न-निर्ढावलेल्या बळी घेणार्‍याची
आणि नक्कीच त्याच्या घरच्यांचीही....

मग,फक्त त्या एका राक्षसी क्षणाला
आवर घालता येणार नाही का???

रेणुका @एक झोका...चुके काळजाचा ठोका...09/10/2007....3.15 p.m.

Wednesday, October 3, 2007

"माझी पहिली गझल.........रुपगर्वीता....."

माझी पहिली गझल.........

"रुपगर्वीता....."

चांदण्यांचा गजरा माळूनी आली...
क्षणात रवितेज ते हिरावूनी आली....

तमाची पर्वा उगाळूनी शशीची...
उजाळाही त्याचा झीजवूनी आली...

काळजांना धुंदीत उधळूनी अशी...
हलकेच उसासे पेरवूनी आली...

भुंग्यांची आसक्ती पिऊनी कशी....
प्राणासक्त फुलराणी होऊनी आली...

कैकांची स्वप्ने लेऊनी अशी...
मदमस्त चांदणी होऊनी आली...

रुपगर्वीते, आग लावूनी जनी...
क्षणात चंद्रास विझवूनी आली...

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका...03/10/2007.....10.35p.m.

"निळाईतला चंद्र तो........."

"निळाईतला चंद्र तो........."

मनातली हूरहूर, तयाची आसक्ती...
तयाचीच पूजा नि तयाचीच भक्ति....

निळाईतला चंद्र तो,नाती दुरावा...
स्वयंभू नसल्याचा हवाय पुरावा?...

अहंकाराला स्वाभिमानाचे नाव इथे...
प्राजक्ती प्रेमाला नाही माळी इथे...

अबोल मी आणि माझ्या दिशा...
जिवंत तरीही मनीच्या आशा....

शब्दांची होळी पेटली कोपर्‍यात...
राख विखुरली मन गाभा-यात...

शेवटच्या शब्दांचा तो निखारा...
धुमसतोय मनी अनामिक गाभारा...

तरीही गाभा-याचा स्वामी तो फक्त...
देव्हारा हा आता कायमचा रिक्त.....

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका...2/10/2007........12.35 p.m.

वस्त्रहरण भाग=6"जगणं गांडुळावाणी........."

वस्त्रहरण भाग=6"जगणं गांडुळावाणी........."

mul kavita Artichi aahe..........

जगणे बांडगूळापरी !!

तिची स्वप्ने,तिच्या कल्पना...
जाणिले न् कुणी तिच्या मना.
अस्तित्वाची लढाई लढवेना.....
जगणे बांडगूळापरी !!

पिता,पती आणि पुत्र...
म्हणायला ही नाती मात्र
स्त्रि-जन्माचे भाग्य ठरतसे....
या तिन पुरुषांवरी !!

वाढेन का ती वटवृक्षाजैशी?
आकाशि झेपवाया....
कि लतिकेचेच भाग्य नशिबी
हुरहुर हि दाटे उरी !!

जगणे बांडगूळापरी !!
जगणे बांडगूळापरी !!

-----Arti...

------------------------------------------------------------
tyache vidamban......"जगणं गांडुळावाणी........."

माही स्वप्नं, माह्या कल्पना
न् म्हणायचं जाणीतो तुमच्या मना....
खुर्चीसाठी लढाई लढतोया
(म्हणू नका) जगणं गांडुळावाणी....

टीवी, पैका, आन् मोबाईल
म्हणायचं फकस्त, हे देईल...
पुढं तुमचं भाग्य ठरतया
आम्हाच गांडुळांवारी....(oops)

वडल कावं मी पैका खोर्‍यानी?
मतं द्या जिंकावया....
का (फकस्त) समाजसेवेचं भाग्य नशिबी
भीती ही माझ्या मनी....

(म्हणू नका)... जगणं गांडुळावाणी....
बरं म्हणा.... जगणं गांडुळावाणी....

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका......1/10/2007.......4.40p.m.

"मोगराही बहरला होता...."

"मोगराही बहरला होता...."

आज त्याचा निरोप आला
नि मन हरखून गेले....
गत आठवणींच्या पावसात
चिंब चिंब भिजून गेले....

भिजताना मज सवे,
अंगणीमोगराही बहरला होता....
भाव आतले उलघडायला
मनीचा रावा बोलला होता...

राग मारवा गायला आज
निसर्ग आतुरला होता...
तोच गारवा आता जणू
सर्वांगात शहारला होता....

ते शहारणे निशब्दपणे
कोणीतरी टीपत होते...
खोडकर पाण्याचे थेंब
उष्ण होऊन बोलत होते...

रेणुका@एक झोका.....चुके काळजाचा ठोका...30/9/2007.....11.45p.m.

Thursday, September 27, 2007

वस्त्रहरण भाग=5"पळून लावला, घाव त्याने जिव्हारी.."

वस्त्रहरण भाग=5"पळून लावला, घाव त्याने जिव्हारी.."
माझ्या मते विडंबन म्हणजे मूळ कवितेच्या मूळाला हात घालून ती विनोदी बनवणे.... यात मूळ कवितेचा अर्थ आणि गांभीर्य राहत नाही हे नक्की... पण त्या कवितेला उजाळा नक्कीच मिळतो....मूळ कविता आहे योगेश जोशीजी यांची... सर्व प्रथम त्यांची माफी मागते......आता हे इतके औपचारिक आणि गंभीर मी कसे बोलले? हे मलाही कळेना... जाउ द्या,कधी कधी झटके आले की असेच बोलते मी...(झटके आले की लागले ?...)जाउ द्या, आपण विडंबन वाचूयात...नाहीतर एक मोठे लेक्चर देईन.देऊ का?माहितेय तुम्ही "नाही....नको" म्हणताय....म्हणूनच म्हणतेय तुम्ही वाचा....कारण,"वाचाल, तरच वाचाल....."


mul kavita....
"शस्त्रास लागलेला, घाव तो जिव्हारी..."

फेकावयास निघालो,दु:खे झाडुनि सारी,
मनाची दलाली, वेदनांच्या बाजारी.

कोंडलेला श्वास, मोकळा फुटु पाह्तो,
आकाश थकलेले,घेऊ कशी भरारी?

ओहोटला सागर, भय किनार्यांचे,
लागु आता कसा मी,अन कुठल्या किनारी?

युध्दाची मज का खबरबात नव्हती,
स्वप्राणे फुंकलेली,आजारी तुतारी.

टेकावयास माथा,तुज आळवावयासी आलो,
बंद दारे , झोपलेले पुजारी.

युध्दात मज दिसल्या,जखमा माझ्या उरीच्या,
शस्त्रास लागलेला, घाव तो जिव्हारी.

मुखवटा टाकुनि,आता स्वत:लाच पाहावे,
प्रतिबिंबाने दिली,आरश्याला सुपारी.

मोजलेही असते,मी नभांगणातील तारे,
जगण्यातच सारी,अडकली हुशारी.

अम्रुताच्या प्यालात, विष संमिश्रलेले,
पिणे ना-पिणे, होईना मनाची तयारी.

पाहुनि त्याला,दु:खे माझी लाजली,
फिरताना पाहीला मी,अश्वत्थामा नर्मदेकिनारी.

चिताग्नीतही आज,मी पोळलो न जरासा,
म्रुत्युच्या दारी,जीवनाची लाचारी.

पाश ही इथले, असे मोहमयी,
पुन:पुन्हा आलो,इथे मी माघारी.
----योगेश जोशी

बिडंबनाचे नाव आहे.......
"पळून लावला, घाव त्याने जिव्हारी....."

विकावयास निघाले, रद्दी झाडूनी सारी
कविता-पाने घेणारा,शोधतेय बाजारी....

कॉंडलेला हुंदका, मोकळा फुटू पहातो
वेदना थकलेल्या, नी शब्दांचीच भरारी...

ओहोटलाय का सागर? रद्दी घेणार्‍याचा
विकू रद्दी कशी मी, अन् कुठल्या किनारी....

रद्दी-दलालही मिळेना, खबरबात नव्हती
स्वप्राणे फुंकलेली, रद्दी सारी आजारी....

टेकवेल माथा तुज आळवावयासी आले...
बंद का दारे? पळाला दलाल ही....

नाही का दिसल्या, जखमा माझ्या उरीच्या
पळून लावला, घाव त्याने जिव्हारी....

मुखवटा टाकुनी आता स्वतःला पहाते
कवी मनास दिली, माझी मीच सुपारी....

मोजलेत अक्षरशः मी नभांगणातील तारे
(पण नवरा म्हणतो....)
कमवण्यात अडकवा, आपली हुशारी....

प्रकाशकाकडे गेलेले घेऊन भाव संमिश्रलेले
छापू- न छापू? होईना (त्याच्या) मनाची तयारी...

पाहूनी त्याला, लाज मला वाटली....(इतक्यात),
फिरताना पहिली मी ,रद्दिवाली, त्याच किनारी....

(एकवून तिला एखादी कविता रद्दी विकावी सारी...असे वाटले आणि...)

चेहर्यावर तिच्या, भाव उठला ना जरासा
घे म्हटले रद्दी, न संपव लाचारी...

म्हणे, घाल ती पाने चूलीत सारी....
असल्या पत्रावळ्या आणू नकोस माघारी.....

रेणुका @ एक झोका... चुके काळजाचा ठोका... 27/9/2007........11 a.m.

"शब्दांतून एकमेकांचं अस्तित्व पुसलय...."

"शब्दांतून एकमेकांचं अस्तित्व पुसलय...."

शब्दांतून एकमेकांचं अस्तित्व पुसलय....
पण मनातून कसं पुसता येईल?

अश्रूंसकट त्याला डोळ्यात कोंडलय....
पण झुरणं कसं थांबवता येईल?

आठवणींचं जग माझ्या नावावर केलय...
त्याचं साम्राज्य कसं नाकारता येईल?

नजरेआड, शब्दांआड नियतीनं केलय....
पण व्यथेतलं सामर्थ्य लेखणीत कसं येईल?

रेणुका @एक झोका....चुके काळजाचा ठोका...25/9/2007....1.20 a.m.

डोळे जादुगार" भाग=5....मन्मनीची भाषा....."

डोळे जादुगार" भाग=5....मन्मनीची भाषा....."

मन्मनीची भाषा
सखयाला कळेल का?
न बोलताच, हे
नाते जुळेल का?

वेड सखयाचे
मनास लागले असे...
भान हरपले
मन हे वेडेपिसे....

सुरेल तराणे
छेडण्याचे वेध लागले...
स्वप्न भरारीचे
मग वेड लागले...

ओठ पाकळ्यांना
जरी मिटून ठेवले.....
नयनीच्या भावाने
भेद हे खोलले...

बोलले ग बोलले
मन हे आज डोलले...
भेद खोलूनी गडे
नयन आज लाजले...

रेणुका @एक झोका...चुके काळजाचा ठोका...25/9/2007.....1.15 p.m.

Monday, September 24, 2007

"पापण्यांच्या काठावर स्वप्न मागे ठाव...."

एक मनातले नाव
आठवणींचा गाव....
पापण्यांच्या काठावर
स्वप्न मागे ठाव....

निद्रा दूर गावी
त्याची वाट पाही....
हास्याला कुलूप
का त्याकडे चावी?

एक उष्ण उसासा
मन रडे ढसासा...
विरह का असा?
जीव व्हावा नकोसा....

जीव जीवात गुंतला
पाय 'माये'त रूतला...
वर्मी घाव घातला
सभार्या परतला.....

एक हास्य लकेर
मग एक शिरच्छेद....
थरथरता कबन्ध
तो चितेमधे बंद....

थंड झाली गात्रं
तरी इच्छा एकमात्र....
नसानसातला बदला
आत्म्यामधे साचला....

एक किर्र रात्रं....
एक भेसूर हास्य....
जीवन मागे दास्य
तरीही एक भेसूर हास्य....

हा हा हा हा हा.....
पुन्हा एक शिरच्छेद

पुन्हा एक शिरच्छेद
थरथरता कबन्ध.....
पुन्हा चितेमधे बंद
आत्मा आता बेबन्द...

रेणुका @ एक झोका ..... चुके काळजाचा ठोका.....23/9/2007......11.05 a.m.

वस्त्रहरण भाग = 4"कुठंवर असं फरफटत नेशील........?????

वस्त्रहरण भाग = 4 "कुठंवर असं फरफटत नेशील?????"

चला तर मंडळी अजून एक विडंबन घेऊन आलेय....आता हे आहे सनिदांच्याच एका गझलचे विडंबन.....मी त्यांच्याच मागे का लागलेय हात धुवून? कारण ते माझे मोठे भाऊ आणि मी त्यांच्या पाठची आहे ना? मग पाठीमागेच लागणार.....माहितेय bad joke आहे हा, पण मी करणारच.....माझा हक़क़ आहे तो...मी घेतलेला....तर हेही विडंबन नवीन प्रकारचेच!
नवीन काय त्यात, हा सवयी प्रमाणे तुमचा प्रश्न! आता उत्तर......

1.पहा, पहिले विडंबन करणे हा प्रकार माझ्यासाठी 'नवीन' होता...
2.दुसर्या विडंबनात...'विनोदी कवितेचे विडंबन' ह्या 'नवीन' प्रकारचा मी शोध लावला (हो, तो शोध मीच लावलाय.....स्वतिनेही मान्यता दिलीये त्याला....)3.तिसर्या विडंबनात....गझल युक्त पझल, की पझल युक्त गझल असा 'नवीन' शोध लावला.......(आला की नाही तिन्हित 'नवीन' हा शब्द....)
4.आता या चौथ्या विडंबनात 'नवीन' असे काही नाहीच....आहे की नाही यात पण 'नवीन' हा शब्द........मग?तर हेच नवीन यातले की काहीच नवीन नाही........

hi ahe original gazal....mala vidamban type karayachey ajun..tovar hi vachayachi asate...

"कुठवर जिवना तू मला, असं फरफटत नेशील?????......"

कुठवर जिवना तू मला, असं फरफटत नेशील
निखाऱ्यां वरून कापसाला, असं खरचटत नेशील

नाही ईच्छा पावलांची, मखमलावर चालण्याची
मृत्यू तूही का मला, असचं बरबटत नेशील

आलो कोरड्या दूनियेत, मी माझेचं अश्रूं पुसाया
कोणा एकाच्या तरी, आठवणीत जगवत नेशील

खाली रुतलो चिखलात, वर फेकून दे नर्कात
स्वर्ग कसा असतो, तो तरी दाखवत नेशील

कधी मागितला तुझ्याकडे, सहा मिटर कापड
खिशातून काढून रुमाल, चेहरा झाकत नेशील

डिवसलं वेदनांनी सदा, जगलो तोवर
जाताना तरी त्याचा, डोळा चुकवत नेशील

चंदनाच्या लाकडासवे, जळण्याची नाही मनिषा
अग्नीची सोय करून, धर्माने सजवत नेशील

हजारो सजीवां मधून, एका निर्जीवाने का जावं
चार खांद्याच्या तरी, पालकीतून गाजवत नेशील

वस्त्र माझे धुतलं, डाग जे त्यांचे होते
माझ्या चरीत्र्यावरचे डाग, पुसत नेशील

का असंख्य डोळ्यातून, मी थेंब थेंब गळावं
तीच्या दोनच अश्रूंत, मला भिजवत नेशील

@सनिल पांगे

विडंबन आहे, बाळ्या आणि शालीच्या लग्नानंतर जी वरात निघते, त्याचे,हा प्रकार इथे सर्वाणाच माहीत असेल,आणि नसला तर माहीत पडेल....आपल्याकडे वेग वेगळ्या type ची 'वरात' असते....ह्या वरातीत पुढे एकच घोडी आहे....लांबन लावत नाही आता.....वाचा!!!!!

कुठंवर ग घोडे तू मला असं फरफटत नेशील?
शेना मातीतूनच का मला असं घसरवत नेशील?
(बरं झालं, बाळ्याने धोतर घातले नव्हते...)

आहे इच्छा मधूचंद्राची, मखमलीवर चालण्याची...
वाटल्यास मला नंतर कुठेही ने, मी कसाही येशील

आग थांब! खाली रुतलोय चिखलात मी......गधडे
(आता घोडीला राग आला, बरं का.....)
चुकलो, चुकलो! लाथा मारणे आता तरी थांबवशील?

नको मला इतक्यात नरक वा स्वर्ग दाखऊस....
शालीचा photo तरी at least घेऊ देशील?
(एव्हढ विंग्रजी बाळ्याला येते हो.........)

मागितला नाहीस जरी तू मला 6 वार कपडा...
(घोडी विचारात.....कशाला कपडा?)
तरी तुला साडी चोळीचा आहेर मी देशील.....
(घोडी परत विचारात.....आहेर कशाला? बाळ्याचा आपला म्हस्का हो....)

मेल्यावर मला जळण्याची जाम आहे मनीषा.....
(हे ऐकून तरी घोडीला दया येईल असे वाटले त्याला.........पण घोडीला परत प्रश्न! आता ही मनीषा कोण? घोडी जास्त डोके वापरायच्या फंदात पडत नाही......)कड्यवरून ढकलून न देता परत स्मशाणात आणशिल?
(आता घ्या, म्हणजे न्या तर न्या आणि याला परत पण आणा!!!!!!!!)

हजारो सजीवांसमोरून फरफटत आणलेस मला...
(आला का कोणी वाचवायला?.....)
पण चार खांदे द्यायला बघ सर्व धावून येतील.......

आता एव्हढ बरबटल्यावर, डाग किती धुवावे?
ही कापडं फेकून द्यायला शालीला तू सांगशील?
(घरात surf excel नाहीए ना........)

माहितेय मला माझ्या लग्नात तुला घोडा दुरावाला....
पण बये, सोड्लेस तर तुझा टाका मी जुळवूनही देशील.....
(बाळ्या आपला तिचे mind, change करायच्या प्रयत्नात......)

(घोडीने नीट वरचे ऐकले नसावे....नाहीतर लगेच थांबली असती.......)
बाळ्या तरीही प्रयत्नानातच.....

मी असं का असंख्य अश्रुतुन थेंब थेंब गाळावं....?????
शालीचे दोनच अश्रू पाहण्यासाठी तरी जिवंत सोडशिल?
(घोडी झाली हो emotionally blackmail......... सोडले तिने.....)

रेणुका @ एक झोका.........चुके काळजाचा ठोका........22/9/2007......1.40 a.m.

वस्त्रहरण भाग=3..."येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.........."

वस्त्रहरण भाग=3..."येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.........."

आता नावावरून कळलेच असेल कोणाच्या गझलचे वस्त्रहरण आहे हे......... [ज्यांना नसेल कळले त्यांच्य साठी...सोनालीची गझल आहे हो ही........."येणार त्या क्षणांची तकदीर वक्त आहे......"]गझलचे विडंबन करता येते हे मात्र मला नक्की माहीत आहे....[विनोदी कवितेचे होते की नाही हे माहीत नव्हते ना, म्हणून सांगितले....बाकी काही नाही....]तर मंडळी, हसायचे नाही........पेश आहे माझी 'पझल' .....पेश हा शब्द यासाठी की सोनाली ताईनि गझल मधे हिंदी शब्द आडवे तीडवे खुपसलेत ना? म्हणून हो.... ही आपली माझी सवय, बाकी काही नाही....आता पझल हा शब्द का वापरला? ह्याचा शोध मलाही लागायचाय....ते जाऊ द्या, तुम्ही मंडळी खूपच चौकस हा, मला आवडत नाही हे..... वाचा हो, जे काही मी लिखेल ते.....(ही माझी सवय हो, संगितलेय ना आधीच....)
ही सोनाली ची मूळ गझल.....

येणार त्या क्षणांचे तकदीर वक्त आहे
आहेत त्या क्षणांना आयुष्य फ़क्त आहे

स्पर्शात हिरे पाचु, मोतीच चुंबनात
अनुभुतीचे सुवर्णी धन, येथ गुप्त आहे

मज आजवर शिकायत त्यांच्या खिलाफ़ होती
ही आज खंत, त्यांच्या विना मी मुक्त आहे

शोधित राजरस्ता ती शापभ्रष्ट मंजिल
वरदान काजव्यांचे घाटात लुप्त आहे

आशा उभारणीच्या विसरुन आण-भाका
आपल्याच पडझडीच्या चिंतेत व्यस्त आहे

विमनस्क बाज होता भरोशातल्या नशेला
इल्जाम भोगुनी हा इतिहास नष्ट आहे

कुठल्याच मस्तकी ना सरताज शाश्वतीचा
बेघर सलामतीचे बेताज तख्त आहे.

-सोनाली

ani he tya kaviteche vatole......... i mean vidamban....
"येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.........."

येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.....
मला भेटला तो, तो एक मख्ख आहे....

स्पर्शातले हिरे पाचू त्या मख्खाला कळेना.....
अनुभूतीचे की हो त्याला, जगच लुप्त आहे.....

आजवर शिकायत त्याच्या खिलाफ होती.....[donada mhana hi line.....]
पण आता गाढवाला देणार मी वक्त आहे.....

शोधते राजरस्ता, त्याला द्याया मन्झिल....
वरदान मख्खपनाचे त्यालाच का फक्त आहे?

विसरायला, कुठे हो घेतल्यात आणा भाका
त्याला सुधारविण्याच्या चिंतेत व्यस्त आहे....

ताज तख्त डोंबलाचे, अन् गुमशुदा होता तो....
इल्जाम देऊ कुणाला? म्हणून मी त्रस्त आहे....

बेघर, आणि कमालीचा भावना शून्य होता.....
पागलखाण्यातून पळालेला तो एक 'पागल' होता....

[ata kalale asel mi 'puzzle' ka mhatale te........]

रेणुका @ एक झोका.... चुके काळजाचा ठोका....20/9/2007.....1.45 p.m.