About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Wednesday, August 29, 2007

My Introduction......

ए सर्किट,अपून्के बारेमे आपून्कोही बोलना पड़ेगा क्या?
अरे यार क्या मामू लोग है,'अपून्को' पेहचानते नही क्या?

गाँधीजीने बोला था, किसीने पूछा तो, नाम बोल देने का....
इसलिए बोलती हूँ, नाम अपूनका 'रेणू', बोले तो 'रेणुका'....

नाम पे मत जाना,आपून थोड़ी हटेली, और बिनधास्त है...
थोड़ी मुहफ़ट, खिसकेली, ग़ुस्सेवाली और दिलखुलास है....

बड़ोंका आदर, छोटोंका लिहाज़ अपनी तो ऐसी आदत है....
ग़लती को माफ़ी नही, ये भी अपून्का बोले तो "रूल" है....

दोस्ती करनी है तो संभलके और सोचकेही करना मामू....
दोस्ती टूटीतो, पलटके देखना नही, येभी अपनी आदत है.....

परदेसी लिबास, बम्बय्या टोन,और बोले तो पुणेरी ठेका.....
मी, रेणुका@ एक झोका.......चुकला का,काळजाचा ठोका ?[:D]

-------रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

"'सत्य' बोलले की, समोरच्यांचे रंग उडतात...."

"'सत्य' बोलले की, समोरच्यांचे रंग उडतात...."

'सत्य' बोलले की, समोरच्यांचे रंग उडतात....
बेछूट वारू सारखे, शब्द बेलगाम सुटतात....

मग हवे ते बोलणार, हवे तसे वाहणार....
आत्मविश्वास नाही,नि तालहि सोडणार....

कधी कधी वाटतें मला, सत्य बोलूच नये.....
समोरच्यांचे मन आपण, कधी तोडूच नये....

पण पटत नाही हे, त्यांच्या रंगात रंगायाचे....
त्यांना बरे वाटण्यासाठी, त्यांचेच शब्द बोलायचे...

म्हणून आज सत्य बोलले,वाटले तसेच झाले...
नाते संपायचे ते संपले, नि वर आरोपही घेतले...

त्यांच्या पातळीवरचे बोलणे मला जमले नाही....
अश्रू नि हृदयी वार, घावावर घाव पेलले नाही....

सत्याचे फळ असे अश्रूत भिजूनच मिळते का?
समोरच्यांना आपले म्हणणे पटतच नसते का?

कळून सुद्धा न कळण्याचे आव आणत असतात....
सत्यापासून ते, पाय नसूनही पळतच असतात....

या भीतीने गळून, आपल्याला चालणर नाही....
सत्याची कास आपण मूळीच सोडायची नाही....

फळाची अपेक्षाही, मी म्हणेन, ठेवायची नसते....
जे होईल होवो ते, शेवटी ...."सत्यमेव जयते !"....

(पाय नसूनही पळतच असतात.... असे मुद्दाम लिहिलेय.. असत्य म्हणजे पाय नसतात, आणि सत्य लंगडे नसते.......... असे सुचवायचे आहे.... )

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...
24/8/2007.....2.00 a.m.

"मूड"......नक्की मूड बदलेल कविता वाचून........

"मूड"......नक्की मूड बदलेल कविता वाचून........
काल मला राम काकांचा एक scrap होता, तो खाली देत आहे.......त्यवारून काही लिहिलेय....ते राम काकांनाच अर्पण!!!!!!!!!
"Renu,Blog sundar aahe and tyachyaa saundaryaat tuzyaa mast mast kavitaani khup jaan aanali aahe...Renu, manapaasoon haloo haloo vachen kavita & comments dein...mood is also most imp part ..ho na Renu ? " Ram kaka.....

काही कविता वाचल्या तरी,
कधी 'कवितेचा' मूडच समजत नाही....
तर कधी 'कवीचा' मूड समजत नाही....

कधी 'कवीचा' मूड समजला तर.....
'कवितेचा' मूड गळी उतरत नाही....

कधी 'कविता' समजलीच तर.....
कधी कवीचा मूड उकलत नाही.....

बरे यात दोष फक्त 'त्यांचाच' नसावा...
आपल्यालाही वाचायचा मूड हवा.....

मूड असूनही उपयोग नाही नुसता....
समजून घ्यायचाही 'मूड' हवाच.....

काय? कविता वाचून बदलला का मूड?
Reply देताना मात्र घेऊ नका सूड....

हो हो, वैतागु नका,पळते मी आता,
एक सांगा,
कविता समजून घ्यायचा मूड होता?

पळाले.............तुम्ही चिडायच्या आत...
नव्हे नव्हे,तुमचा मूड बदलायच्या आत...

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका......
23/8/2007......1.45 a.m.

Tuesday, August 21, 2007

"हल्ली मला आवडत नाही तो...."

काहीतरी विनोदी लिहीण्याचा प्रयत्न....
"हल्ली मला आवडत नाही तो...."

त्याचं काय आहे, प्रेम बीम करतो खूप...
पण प्रेमाने नुसत्या काय होणारेय??????

"राजा"ला हेच कसं काळत नाही? म्हणे
प्रेमाची भाजी अन् प्रेमाची भाकरी खाऊ..

कसं शक्य आहे?? सांगा ना तुम्हीच आता
त्याला काय चायणीजची सर येणारेय??????

नाही,.. म्हणजे पहिले आवडायचे मलाही
त्याचे बोलणे,त्याच्या आवडी नि निवडी..

पण हल्ली खपत नाही मला सर्व हे...
तेच तेच बोलणं, अन् नको त्या आवडी..

म्हणे कविता लिहितो तुझ्यावर प्रेमाने..
आता लोणचे तरी होणारेय का कवीतेने??

ठीक आहे म्हणा, वेळ आलीच तर तो....
जीवाचीही पर्वा करणार नाही माझ्यासाठी..

पण त्याचा 'जीव' माझ्या, खरचं सांगते
काही म्हणजे काहीच उपयोगाचा नाही...

समजावून सांगते, विसरून जा मला..
तर म्हणतो,तू माझा प्राण आहेस जसा..

आता सांगा, प्राण असा देहाबाहेर असेल
तर हा जिवंत तरी राहील का असा?????

जाऊ दे, त्याला म्हणाले, जा आता बास
डोळ्यात पाणी आणून म्हणतो मला की,

तुझ्यासाठीच माझा जन्म आहे खास..
त्याचं असलं बोलणं, खरच समजत नाही..

एक माहितेय मला पैश्याशिवाय काही नाही..
तुम्हाला म्हणून सांगते,सांगू नका कुणाला..

त्याच्या पेक्षा मला समोरचा "विन्या" आवडतो
चकणा असला तरी गॉगलणे कुठे कळतो??????

रोज नवी जीन्स,नि जॅकेट रोज नवं घालतो..
मस्त मस्त बाइक वर केस उडवत फिरतो..

एट त्याची काही औरच आहे, विचारू नका
त्या राजाला याची सर कधी येणारेय का???

याच्याकडे आहे मस्त बंगला आणि गाडी
राजाकडे त्या सायकलही नाही हो साधी...

विन्या तसा सगळ्या पोरिंवर लाईन मारतो
त्याच्या या अदेवर पण आपण खुषीने मरतो..

नाही म्हटलं बघू आता कसे काय जमतेय..
पण हल्ली तो आवडत नाही असं मी म्हणते...

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका.....

"पण तुमच्या आतल्या ठिणगीला फुंकर घालायचीये....."

मला कुणाच्याही ही भावना अगर श्रध्दा याना दुखवायचे नाही... एक प्रयत्न सत्य मांडायचा..... असे काही झाल्यास कृपया माफी असावी....

"पण तुमच्या आतल्या ठिणगीला फुंकर घालायचीये....."

माझ्यातल्या 'मला' एकदा जागं करायचं आहे ..
तुम्हाला एकदा मुळापासून हलवायचे आहे...

न्यायाने वागा असे मनातून सांगायचे तर आहेच...
पण अन्याया विरूध्द लढा हेही सुचवायचे आहे...

रामातल्या 'राजा'ला थांब म्हणायचे आहे...
सीतेच्या अग्णिपरीक्षेला आता विझवयाचे आहे..

भीष्माचार्यांच्या मुखी शब्द द्यायचे आहेत....
द्रौपदिचा बाजार आता बंद करायचा आहे...

श्रीकृष्णाच्या चातुर्याला मुजरा माझा पण ...
कर्नाच्या दानशुरपणालाही थांबवायचे आहे...

तुम्ही राम, भीष्माचार्य, आणि कृष्ण होऊ नका..
त्या आधी सीता, द्रौपदी आणि कर्नही होऊ नका...

कुणावरच्याही अन्याया विरूध्द वाचा फोडा..
तुमच्यातल्या माणसाला जागा करा थोडा...

माहितेय नुसत्या कवीतेने काही होणार नाहिए...
पण तुमच्या आतल्या ठिणगीला फुंकर घालायचीये..

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका.....

"प्रेमापेक्षा.....'संशय' श्रेष्ठ कसा?"

"प्रेमापेक्षा.....'संशय' श्रेष्ठ कसा?"

मन तडपणारे विचारतेय आज,....... सांग ना...
प्रेमापेक्षा 'संशय' श्रेष्ठ कसा? ते, .......सांग ना...
काळीज ओतले,तरी माझे शब्द अर्थहीन होते....
तुझ्या शब्दांचे वार, काळीज आज चिरत होते....

सीता आणि अहिल्याही..... जिथे हारल्या....
तिथे मी माझ्या वेदनाच कशा कुरवाळल्या?...
त्यांनाही उद्धारायला धरणी नि राम आले होते....
संशयाच्या भूताने मला तर दत्तकच घेतले इथे....

ज्या भूताने आपली 'झोप' गिळली होती....
नियतीला मात्र शांत झोप मिळली होती....
'विश्वास' आता रिक्त होऊन मनात उरला....
'संशय' या शब्दाने त्याचा अर्थ आज विरला...

असा काय गुन्हा केला? मलाच कळेना आज....
माझ्यातल्या मलाच, 'माझी' वाटतेय लाज....
इतक्या जिवापाड प्रेमाला फक्त एक शब्द गिळतो....
जीवनाचे सार म्हणवणार्‍या प्रेमाला फक्त एक संशय छळतो?

रेणुका @एक झोका...चुके काळजाचा ठोका...
20/8/2007.....1.40 p.m.

""रक्षाबंधन",...... बंधन आहे हे रक्षेचे...."

"रक्षाबंधन",...... बंधन आहे हे रक्षेचे....

"रक्षाबंधन",...बंधन आहे हे रक्षेचे...
भाऊ बहिणीच्या नात्याच्या कक्षेचे...

ज्याला गरज नसते, व्यक्त होण्याची....
गरज नसते, लाखात देखील नहायची...

गरज असलीच तर, ती फक्त प्रेमाची...
नांदी असते, दृढ अतूट विश्वासाची...

त्याची दुःखे, तिच्या डोळ्यांतून बोलतात...
आणि तिची स्वप्ने, त्याचे 'पंख' पेलतात...

गरज नाही, ही नाती असावीत फक्त रक्ताचीच...
ताकत तितकीच, जन्माच्या नात्या इतकीच....

म्हणून म्हणते,
"रक्षाबंधन",...बंधन आहे हे रक्षेचे...
भाऊ बहिणीच्या नात्याच्या कक्षेचे...

रेणुका @ एक झोका.....चुके काळजाचा ठोका.....
20/08/2007.....10 a.m.

"प्रेमाचं गुपित हळू हळू उकलत चाललय..."

"प्रेमाचं गुपित हळू हळू उकलत चाललय..."

प्रेमाचं गुपित हळू हळू उकलत चाललय...
कारण, मलाही आता प्रेम होत चाललय...

विनापंख उडतेय, विनाकारण लाजतेय....
गर्दीत असूनही मी, एकट्यानेच हसतेय...

आज काळे पांढरे जग, सप्तरंगी वाटतेय...
बेसुर आवाजात माझ्या, सप्तसुरात गातेय....

त्याचा हरेक शब्द, आज शतदा आठवतेय...
सहवासाचे ते क्षण, परत परत कोरतेय....

त्याच्या हसण्यावर, नि, बोलण्यावर फिदा...
त्याच्या प्रत्येक अदेवर, डोळे झाकून फिदा...

'प्रेम' तसे आजवर, एकीवात माझ्या होते...
'हे असे होत असते',..हे पण माहीत होते...

पण, तरीही प्रेम म्हणजे एक 'गुपितच' होतं...
त्याचं गूढ 'उकलायचं' अजूनही बाकी होतं....

पण आज,
प्रेमाचं गुपित हळू हळू उकलत चाललय...
कारण, मलाही आता प्रेम होत चाललय...

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका.....

"निस्त्या जिद्दीनं, काय व्हतं गरिबीला...."

"निस्त्या जिद्दीनं, काय व्हतं गरिबीला.... "

आमचं बालपण तसं कडकी तच गेलं
दोनचार कापड व्हती काशीबशी घालायला...
डोईवर छप्पर व्हतं की, नाही म्हणायला
चटणी-भाकरी व्हती तशी रोज खायला...

डोळ्यांत आसवं व्हती रोज सोबतीला
आन् मराण व्हतं रोज-रोज जगायला...
मायला जिद्द व्हती शिकवायची मला
बाप वस्ताद, काळजीच न्हवती त्याला...

मायच्या मजुरीच्या पैक्žयावर लई डोळा
मारुन हाणून मायची जिद्द तो प्याला...
एक दिस पुलीसांनी धरूण नेला त्याला
मग तर मायचा कूबडा आधारपण गेला...

जिद्द डोळ्यात साठवून ती बघायची मला
निस्त्या जिद्दीनं, काय व्हतं गरिबीला....
दिस सरलं, आता मीच बघते मायला
चार घरची धुनी-भांडी करते या पोटाला...

तिच्या डोळ्यात लाचरपणा हाये साठलेला
त्योच डसतो सारखा माह्या या कळजाला...
पण गरीबी ही एक चिजचं अशी हाय
की जीत कशाचा आवच आणता येत न्हाय...

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका.....

माझे "मी" पण....

माझे "मी" पण.....

"मी" असे म्हणताना
मलाच शोधावे लागेल...
अस्तित्व मला माझे
पुन्हा चाळावे लागेल...

अमक्याची ती लेक
तमक्याची ती बायको..
त्याची ती आई यातून
वेगळे व्हावे लागेल...

मला माझं 'स्व'त्व
पुन्हा जाणून घ्यायचे आहे...
माझा आवडीचा पदार्थ
आवर्जून बनवायचा आहे...

माझे छंद आठवणिना
उजाळा द्यायचा आहे....
दिषाहीन जीवनाला या
दिशा द्यायची आहे...

नव्या उमेदीने मला
परत उठायचे आहे...
कारण मला आता माझे
अस्तित्व शोधायचे आहे...

हे सर्व इतरांसाठी
शुल्लक असले जरी....
पण आता मला माझे
"मी"पण खोदायचे आहे....

रेणुका @एक झोका...चुके काळजाचा ठोका...

Thursday, August 16, 2007

"तुमच्या काळजाचा ठोका चूकवायचा आहे......."

तिची कथा.... तशी सामान्यच आपल्यासाठी...
वेगळे असे काही नाही, जे पोटी तेच ओठी..

आनंदाने अशीच ती एकदा घराबाहेर पडली...
सर्वांबरोबर मग ती अशीच बाजारात शिरली...

डोळ्यांसमोरच, 'तिच्या' कुटुंबाचा बळी गेला..
बाजारात गुंडाच्या चकमकित तिचा संसार उधळला...

नवरा, लेक नि तिची सासू पण धक्क्याने गेली..
अन् ही सर्व बघायला की काय जिवंत राहिली (?)...

या एव्हढ्यनेच की काय बहुतेक भागले नव्हते...
म्हणून तिला पोलिसात जायचे सुचले होते...

मनातून पूर्ण खचलेली आणि कण्यातून मोडलेली
पण माहीत नाही कोणत्या जिद्दीने पेटून उठलेली...

गेली पोलिसात, तिचे एकायलाही कुणी तयार नव्हते..
कारण त्यांच्या वरखर्चाचे गणित तेथे कोलमडत होते..

शेवटी तिने वरपर्यंत जाण्याची निग्रहाची धमकी दिली..
तर तिला 'कुणी साक्ष देईल का?" अशी विचारणा झाली..

स्मशाणात जाळले सर्वाना, नि तिने प्रयत्न तोही केला
सांत्वन करून सागळयांनी तिथेच मग राम राम केला...

वरच्या अधिकार्र्यांचे उंबरे तिने वेळोवेळी झीजवले..
हतबलपणे पुढार्यांचे तिने अखेर पायसुद्धा पकडले...

नजरेतून त्यांच्या तिला 'वासना' भरलेली दिसत होती..
आणि जळालेल्या काळजाला परत भोके पडत होती...

पण आता तिला 'काहीतरी' तर अखेर टिकवायचे होते..
मग हातपाय गाळुन सारे प्रयत्न तिने थांबवले होते....

कायद्यापुढे हात आपसूकच नाइलाजाने टेकले होते...
गुंडागिरीविरुद्ध तिने आवाजाला आता दाबले होते...

मग ही सगळी घुसमट अखेर तिला जगू देईना..
मरण्याचा सर्वात सोप्पा मार्ग तिने स्वीकारला...

हीच कथा परत घडतेच आहे, घडणारही आहे...
तुम्ही,आम्ही, न्याय सगळे असेच असणार आहे..

ही कथा तशी आपल्यासाठी "सामन्य" होती..
नेहमीचीच गाडलेली मढी कोणी उकरायची होती....

लेखनाचा प्रपंच माझा हा एव्हढ्याच साठी होता
तुमच्या काळजाचा फक्त एक ठोका चूकवायचा होता....

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

"कर्ण आहे हा कलियुगातला......."

'करण' म्हणजे आपला महाभारतातला 'कर्ण'......

"कर्ण आहे हा कलियुगातला......."

व्हय ना,
'करण'... जरा आंधीपासून जवळचा वाटतो मला...
कारण सुरवातीची आमची कथा जरा सारखी व्हती....

त्याला आईनं जसा टाकला, तसा मलाबी टाकला
बरं टाकला त टाकला,पण उकिर्डयावर का टाकला???

असू दे,मला वाटतं तिचीपण कायतरी मजबुरीच आसलं
काय म्हणता, त्याशिवाय का ती आसं काय करलं???

ते दुख न्हाय वो, पण रोजची वड वड सोसत न्हाय..
असाच कुणाच्यातरी हाताखाली कसापण म्या वाढलो..

रोज रोज या दुनियचं श्यांचं जेवण खात हाय...
आन् आगीचं घूट ईशासारखं रात्रंदीस म्या पीत हाय...

तिरस्कार डोळ्यातला सहन कधी कधी व्हत न्हाय
पण आता म्या तरी कोणा कोणाला संगणार काय???

अशीच कुणाकडून तरी त्या करणाची कथा एकली....
तवा पासून त्याची न माझी भावकीच जणू जाली...

पण त्याला म्या म्हणतो बापाचा आधार तरी व्हता....
कवच-कुण्डल की काय म्हणं त्येच्या बराबार व्हता...

आमाला निधड्या उघड्या छातीनं इथं जगायचय...
नि बापाचा नावाशीवाय रोज रोजचं युध लढायचय..

जाऊ द्या...हे असच चालायचचं तुमि का थांबलाय...
टायमाची खोटी माहयापायी काह्यला राव करताय???

जा काम करा आपलं रोजचं, म्या बी जरा जातो....
काम काय मिळतं का दगाड फोडायचं त्या बघतो..

आवं मला अशीच बडबड करायची आदत हाय....
कारण ह्येच आमा सारख्यांचं कवच कुण्डल हाय.....

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

"रात्र एक मॉहरलेली.......नि बहरलेली......"

आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहीत आहे....

"रात्र एक मॉहरलेली.......नि बहरलेली................"

आभाळातल्या चांदन्यांनी टप टप बरसावं
जेव्हा तू मला प्रेमाने न्याहळत असशील...
अन् मी शरमेने नजर झुकवली असेल....

त्या चंद्राला आपला मनातून हेवा वाटावा...
जेव्हा तू मला अलगदपणे स्पर्श करशील....
अन् मी शहारून अंग चोरत असेल....

थंडगार हवेची झुळुक जळून मधे यावी....
ज्यावेळी तू मला मिठीत घेत असशील...
अन् मी लाजून चूर चूर झाली असेल...

श्वासांनीही एकरूप होऊन मग श्वास घ्यावा...
ज्यावेळी तू माझे चुंबन घेत असशील..
नि मी त्यासाठी आतुर झालेली असेल...

अशीच एक मोहरलेली रात्र बहरून यावी....
ज्यावेळी अबोलीच्या कळ्या उमलत असतील...
नि तुझ्या प्रेमाने जेव्हा मी चिंब भिजत असेल...

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

"असा कसा तू सोडून गेलास ?"

असा कसा तू सोडून गेलास ?

हात हातात धरून माझा
प्रेमाच्या गावात तूच नेलेस ना...
ज्या गावाचा रस्ता माहीत न्हवता
त्या वाटेवर मधेच फसवून...
....................असा कसा तू सोडून गेलास ?

कावरिबावरी होऊन चालताना
नजर तुला शोधत होती....
पुन्हा मागे वळूनही न पाहता
मलाच वेडी ठरवून आता....
.....................असा कसा तू सोडून गेलास ?

मागे तुझ्या धावत होते
चिखल काटे तुडवित होते....
प्राणांतीक साद घालत होते
पण प्रतिसादही न देता....
......................असा कसा तू सोडून गेलास ?

हृदयाच्या पेटीत, बंद कुलपात
असलेल्या कडू आठवणी या.....
एकांतात हलकेच स्मरु लागतात
माझ्यातल्या 'मलाच' कूरतडू लागतात...
..........मग वाटते, असा कसा तू सोडून गेलास ?

वाटते तुला विचारायला हवे होते
पण तेच मरण परत मारायची....
तुझी माझ्यातली 'छबी' बिघडवायची
तयारी मनाची होत नव्हती.....
.......मग वाटते असा कसा तू सोडून गेलास ?

मी विचारले नव्हते तुला जरी
पण कारणही न देताच असा...
अश्वत्थाम्याची जखम देऊन
मला शून्यात ढकलून देऊन...
........................ असा कसा तू सोडून गेलास ?

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

"मागितलेलं नेहमी मिळतच का नसतं..?"

"मागितलेलं नेहमी मिळतच का नसतं..?"

असं सर्वांच्या बाबतीत का होत असतं?
मागितलेलं नेहमी मिळतच का नसतं..?

साधी पाण्याची तहान असली तरी
ताक मिळूनही उपयोगच का असतो....
पाणीच हवे असेल तर त्यावेळी
विहीर खोदूनही उपयोग नसतो...
म्हणून म्हणते.....मागितलेलं नेहमी मिळतच का नसतं..?

साधी अपेक्षा एक असते की
वेळ काढून वाचावे काहीतरी....
पण पाहुण्यांना त्याचवेळी
यायची झालेली असते घाई....
म्हणून म्हणते.....मागितलेलं नेहमी मिळतच का नसतं..?

अगदी चंद्र तारेच मिळावेत
अशी अपेक्षा नसते माणसाची....
चन्द्रप्रकाशात साथ हवी असते 'त्याची'
त्याचवेळी त्याला काम कसं निघतं?
म्हणून म्हणते.....मागितलेलं नेहमी मिळतच का नसतं..?

पण शम्भरात एक असाही येतो दिवस,
मागितलेले मिळण्याचा....
पण त्या दिवशी आपण निश्चय करतो
काहीही न मागण्याचा....
म्हणून म्हणते.....नेहमी हे असच घडतं,
............................. मागितलेलं नेहमी मिळतच नसतं.......

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

"बालपण पाहायचं राहून गेलं................"

"बालपण पाहायचं राहून गेलं................"

काय सांगू तुम्हाला, काहीतरी काळजात सलतय
माझ्या 'चिम्याचं' बालपण पाहायचं राहून गेलय...

नोकरीच्या व्यापात, त्याला घरीच होते सोडत
आणि मी बाहेर पडे, पण मनातून धडधडत...

इवल्याशा हातांच्या स्पर्शाला मन तडफडायचं
त्याच्या नजरेतील शोधाला, होत न्हवत फसवयचं...

बोबडे बोल, मनापासून कौतुकाने होते एकायचे
नि काळजावर कोरून, गॉदून होते ठेवायचे....

पहिली पावलं मलाच पाहायची होती कौतुकाने
नि घट्ट मिठी मारायची होती त्याला प्रेमाने....

क्षणोक्षणि, लाडाने भरवून, हट्ट पूरवायचे होते
लाडे लाडेच त्याला नखर्याने रागवायचेही होते..

'हे' नाही असे नाही, पण थोडेच वाट्याला होते
काळजातल्या 'आई'चे समाधान कुठे होत होते?...

त्याने हात धरला की, बाहेर पाऊल पडत नसे
लेकरासाठी माय त्याची मना ने घरातच असे...

ही कथा एकटीची नाही, प्रत्येक काम करणार्‍या आईची
एक व्यथा आईच्या 'मना'तली, नि मनातल्या 'आई'ची...

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

Tuesday, August 14, 2007

"स्वातंत्र्यदिनी आम्हाला आठवण्यापेक्षा...."

"स्वातंत्र्यदिनी आम्हाला आठवण्यापेक्षा...."

'त्यांच्या' रक्ताचा प्रत्येक थेंब,
आज मातीतूनही ओरडत आहे.....
फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी लाच
आम्हाला 'आठवणार' का?असा जाब विचारत आहे....

माहीत असते आम्हाला,
प्राणांची किंमत,अशी मिळणार आहे...
तर आम्हीही प्राण गमावले नसते...
घरात तोंड लपवून जिणे आम्हीही जगले असते....

'जगले' कसले म्हणा ? पण तेही मंजूर....
कारण याहून ते नक्कीच 'बरे' असले असते....
लोकशाहीच्या नावाखाली दडपशाही सुरू आहे....
म्हणून थेंब न थेंब 'इथे' मातीतही जळत आहे...

कुपोषण, मोर्चे, उपोषण नि आंदोलन....
सर्व सामान्यांनी चालवलेले हे मूक संमेलन...
लढा कशासाठीही, वक्ता तर तोच आहेच आहे...
पण नीट पहा, 'श्रॉताही' फक्त तोच आहे....

या सर्वाचा कळस म्हणजे 'बलात्कार'...
देहाचा असो वा मनाचा हा त्या रक्तवरचा अत्याचार...
पण वाटते, बरे झाले आम्ही मेलो...
हे पाहण्यापेक्षा देशप्रेमासाठी विलीन झालो....

स्वातंत्र्यदिनी आम्हाला आठवण्यापेक्षा,
नि वरवर तिरंगा फडकवण्यापेक्षा....
एक प्रतिज़ा स्वतः शीच करा...
'मी माणूस होईल' हे मिटल्या डोळ्याने एकदाच म्हणा...

रेणुका@ एक झोका...चुके काळजाचा ठोका....
14/8/2007....9.40a.m.

"आम्ही, आजची पिढी, स्वतंत्र विचारसरणीचे..."

"आम्ही, आजची पिढी, स्वतंत्र विचारसरणीचे..."

आम्ही, आजची पिढी, स्वतंत्र विचारसरणीचे...
आभाळासही झुकवून आम्हास पाऊल टाकायचे...

ताकद नि धमक नसानसात साठलेली आहे...
नजरेत स्वप्न साकारण्याची जिद्द पेटली आहे...

आम्हांस बेफिकीर, नि बेजबाबदार म्हणू नये....
समर्थपणे जबबदारी पेलनेहि आम्ही जमवले आहे....

मान्य, असतील आमच्यातही बेपरवा काही...
पण आम्ही सर्वच जण काही त्यातले नाही....

स्व- तंत्र चालवुन आम्ही राज्य करणार आहोत...
मात्र, स्व- तंत्राचा गैरवापरही टळणार आहोत...

एकदाच,आम्हाला थोडा विश्वास नि मोकळीक द्या...
स्वतःला सिद्ध करण्याचे फक्त एकदा स्वातंत्र्य द्या...
द्याल का?.....

रेणुका @ एक झोका....चुके काळजाचा ठोका...
14/8/2007.....5.20 a.m.

Sunday, August 12, 2007

"शब्द......."

"शब्द......."

देता येणारे 'शब्द'...
विसरता येणारेही 'शब्द'...

घडवणारे 'शब्द'...
बिघडवणारेही 'शब्द'...

अर्थपूर्ण 'शब्द'....
अर्थहीनही 'शब्द'...

हरवणारे 'शब्द'....
जिंकवणारेही 'शब्द'...

मुके असणारे 'शब्द'...
बोलणारेही 'शब्द'...

तारणारेही 'शब्द'....
मारणारेही 'शब्दच'....

'शब्द' नुसते 'शब्द'....
'शब्द' फक्त 'शब्द'....
'शब्द' हेच 'शब्द'...
वेळ नि काळानुरूप बदलणारे 'शब्द'....

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका....13 /8/2007....1.37 a.m.

"मला स्वतंत्र व्हायचय........"

"मला स्वतंत्र व्हायचय........"(15 औगस्ट)

मला स्वतंत्र व्हायचय...कशापासून काय म्हणताय?
खरतर मलाही कळत नाहीय, कशापासून व्हायचय....
पण व्हायचय,.... ते जाउ द्या.......

15 औगस्ट आला ना, म्हणून म्हणतेय हो मी....
काय?...... जवानांचे काही म्हणलात का तुम्ही?

त्यांचं काय? त्यांना जाऊन 50 वर्षे उलटलीत....
मग? मला काय त्यांचं? माझं कोणीच नव्हतं...

त्यांचं घर कसे का चालेना........मी काय करणार?
सरकार मदत करो, ना करो,मी कोण विचारणार?

स्वातंत्र्य मिळवून दिले तर....... मग काय झाले?
आपण थोडेच त्याना संगितले होते, "करा असे"...

एव्हढे करून काय? इंग्रजांच्या तावडीतून सुटलो....
नि चक्क आपल्याच दातांखाली येऊन अडकलो....

भ्रष्टाचारी, शिक्षकी, जहाली, मवाळी इथे राजकारण....
होरपळेनात.. कोणीही, कसेही, कधीही विनाकारण....

मला काय त्याचे?..........मी अन माझं काम आहे....
कुणी अडला की.... मग मी पण, त्यांचा बाप आहे....

पण, हे सर्व खटकतं कुठेतरी, मलाच कधीतरी....
सदसदविवेक बुध्दी झोपु देत नाही कधीकधी....

म्हणून म्हणते, मला स्वतंत्र व्हायचय.......
या जीवघेण्या नि झोप उडवणर्या विचरांपासून.....

या सर्व राजकारणांपासून, रक्त पिपासू वृत्तीपासून...
भ्रष्टाचारापासून,.....केसाने गळा कापणार्‍यांपासून...

आणि, सर्वात आधी........
माझ्यातल्या भ्रष्टाचार्यापासून,माझ्यातल्या परालांबित्वापासून....
अहंकरा पासून, नि माझ्यातल्याच पांढर पेशी माणसापासून.....

तुम्ही म्हणाल हे सर्व जरा जास्त होतय....हो ना?
reply द्या (वाटल्यास), back to topic करा आणि स्वतंत्र व्हा.....

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका....26/7/2007...12.50 a.m.

"फक्त एकदा पुकारशील का?....."

"फक्त एकदा पुकारशील का?....."

सख्या पुकार मजला फक्त एकदा.....
येईल वार्‍यावर बसून अनेकदा......

मनापासून साद घालशील का?
कवेत तू एकदाच घेशिल का?

कडा ओलावल्यात डोळ्यांच्याही...
रडका पाऊस मनीचा थांबवशील का?

फक्त एकदा पुकारशील का?
सख्या मला बोलावशील का?

श्वासांनी साथ सोडली जरी....
तुजसाठी मी जन्मेन फिरुनी....

तेव्हा तरी हात धरशील का?
एकदाच तुझी म्हणशील का?

उभी भेटेल मी याच वळणावर...
फक्त एका हाकेच्या अंतरावर....

पण,"फक्त एकदा पुकारशील का?....."
तू........"फक्त एकदा पुकारशील का?....."

"मागून काही मिळत नसते....."

"मागून काही मिळत नसते....."

स्वप्नांचे जग....हे नेहमीच सुंदर असते,
वास्तवाच्या चटक्याने मन भानावर येते...

स्वप्न पहावे, पण पुरते हरवू नये त्यात,
पाय जमिनीवर नि आकाशी असावेत हात...

आत्मविश्वास नि कष्टाच्या जोडीने 'मिळवावे',
मागून काही मिळत नसते हे ध्यानी असावे...

स्वप्न पहावीत उज्ज्वल भविष्याची फक्त,
पुरी करण्यासाठी...आटावा वाटल्यास रक्त....

' दे रे हरी, अन् पालंगावारी 'असे होत नसते,
हरी ने दिले जरी, वसुली मात्र नक्कीच असते...

" 'ती' माझ्या नसा नसात समावत गेली..."

"ती माझ्या नसा नसात समावत गेली..."

जेव्हापासून मला जरा समजायला लागलय..
तेव्हा पासून आमची प्रेमकाहाणी सुरू झाली..
दिवसें दिवस फुलासारखे प्रेम खुलतच गेले..
नि 'ती' माझ्या नसा नसात समावत गेली...

बालपणी ती खूप निखळ नि निरागस होती..
दुनियादारीने आता राठ नि परखड होत गेली..
आणि मग तिची ही जादू ची नशा हलकेच...
माझ्यावर बेधुंद होऊन मस्तीने चढतच गेली...

तिच्या त्या दिसण्यावर, असन्यावेर, नसण्यावर...
रुसन्यावर, रडण्यावर, हसण्यावरही मी प्रेम करतो...
तिच्या सवे कधी धरेवर, तर कधी गगनी राहतो..
क्शीतिजालाही गवसणी घालून, जगालाही झुकवीतो...

पण माझ्या बायकोला आवडत नाही बिलकुल
ती म्हणते चिडून "जरा घरात पण लक्ष घाला की"...
खरच तिच्यशिवाय मला दुसरे काही सुचत नाही
अन्नाचा दानाही अजिबात गोड लागत नाही...

मन तिच्या मधे अजून अजूनच अडकत जाते..
मग माझी नेहमीच द्विधा मनस्थिती होत असते..
तिच्या कडे, वैतागून जावे सर्व सोडून ठरवले तर...
"रवि" जिथे पोहचत नाही तिथे ही प्रेयसी रहाते...

(रवि जिथे पोहचत नाही तिथे कवी पोहचतात असे म्हटले जाते......तिथे ही प्रेयसी "कविता" रहाते....)
भाग = 2, "औदा लगीन करायचं हाय...." '

आत्याचा बाळ्या न्हाई न्हाई म्हणत व्हता..
मी म्हणते आत्ता तयार ह्यो झालाच कसा?
मला काही केल्या काहीच सुचत न्हाई आता...
ह्याला आठवलीच कुठून न्हाई ती आवदसा....
.......त्याचं मारू द्या, पण मला औदा लगीन करायचं हाय.

आकलेचा कांदा आन् डोक्यात बटाटं हाय...
तोंडाचं टकसाळ कधी बंदच व्हत न्हाय...
सालेत हा जायचा आवसेला न पूनवेला
गुर्जिन बी ह्याला राम राम केलेला हाय... .
...........त्याचं सोडा, पण मला औदा लगीन करायचं हाय.

काम ना धंदा आन् बोम्बालत गावभर फिरतो...
मायचं न बाचं रोजच जोडं, ह्यो पोटभर खातो..
एवढ्यावर बी त्याचं भागत न्हाय की काय ?
पोरींच्या श्या बी खाण्यात हा पटाईत हाय... .
......पण करावं काय? मला तर औदा लगीन करायचच हाय.

चार भनींकड बघून, मायचं डोळ आटतच न्हाय..
आन् बाचं काही केल्या कराज पण मिटत न्हाय...
आत्याशिवाय घराचं आमच्या पान बी हालत न्हाय
ह्याच्या शिवाय मला आता दुसरा पर्यायच न्हाय...
..............................म्हणून औदा लगीन करायचं हाय....

भाग = 1 औंदा लगीन करायच न्हाय ...

भाग = 1 औंदा लगीन करायच न्हाय ...

कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात...
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय...
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
....................................औंदा लगीन करायच न्हाय.

कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता...
रोज रोजची कटकट न वटवट, आयला...
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय...
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय...
...........................म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.

म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली...
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय...
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय... .
.........................म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.

बस का, यावर थोड च भगणाराय सगळं..
त्यानंतरच 'लचांड' मग मागचकी लगतय...
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय...
..............आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.

झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव....
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
.....................इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?

नाय, तसं न्हाय...तिचं नखरं सोशीन म्हणतो....
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो....
गावच्या पोरिमधी.... नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
...जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय.....

"कापरासारखे अस्तित्व आमचे सर्वांसाठी असते......."

"कापरासारखे अस्तित्व आमचे सर्वांसाठी असते......."

माझ्या एका मैत्रिणिने मला प्रश्न विचारला की....नेहमी मुलीनिच का तडजोड करायची नी त्यानाच का कमी लेखतात..आणि त्या नंतर हा विषय डोक्यात घोळत होता...त्यावर एक कविता लिहिलीये.... तरी कृपया या कवितेस वादाचे स्वरुप न देता कविते सारखी वाचावी...एक सत्य मांडण्याचा एक साधा प्रमाणिक प्रयत्न...

"कापरासारखे अस्तित्व आमचे सर्वांसाठी असते...."

गर्भातून च होते आम्हाला नाकारण्यास सुरूवात...
नि तिथेच सुरू होतो आमच्या जीवनाचा प्रवास....
तूच्छतेने बघनार्यांच्या नजरा आम्हावर रोखतात...
नि हवाही घुटमळते मग द्यायला मोकळा श्वास....

समजू लागताच, तडजोडीचा पाया घातला जातो...
घरकामाचे धडेही मग लवकरच गिरवले जातात...
भावानकडची खेळणी अधाशी नजरेत रहातात...
नि मन मारुन जगण्याचे पाठ इथेच पढवले जातात...

काही काळाने आम्हाला घराबाहेरही जायचे नसते...
कारण गिधाडांची नजर फक्त आपल्याकडेच असते....
तरीही कधीतरी कुणीतरी ठरते नराधमाचा बळी...
आणि त्या नंतरची तिची वरात न एकलेलीच बरी...

कसेही लग्न करा, तरी तडजोडी समोरच असतात...
आपल्यात नसलेल्या उणीवा, मग जाणवू लागतात...
मूल होत नसेल, चुक तिची नसेल, तरी कुठे सोडतात..
'वांझ' म्हणून तिला शेवटी जिवंतपणीच जाळतात...

विधवा बायकाना कुठेही जायची का असते बंदी..
नवर्‍या बरोबर सरणावर जायची मात्र पहिली संधी....
तेव्हा तिचे गुणगान खूप अभिमानाने गायले जाते...
ते एकायला ती मात्र देहाने मग जिवंतही नसते...

नवर्‍या आधी जर कधी मरण आले तिला...तर
'आहिवपणी' मरण आलं, असे लोक म्हणतात...
मेल्यानंतर तिच्या, दहाव्या आधीच स्माशाणात..
नवर्‍यासाठी लोक, स्वताच दुसरे स्थळ सुचवतात.....

केलेल्या कामाचे 'श्रेय' लवकर पदरी पडत नसते...
कामाच्या ठिकाणीही फक्त 'स्त्री' म्हणून पाहिले जाते...
शुभ प्रसंगी वा मरण दिनी दुय्यम स्थान च असते....
कापरासारखे अस्तित्व आमचे सर्वांसाठी असते....

अगदीच असे नाही,
खूप लोकानी.... आपल्या मूलीनाही घडवलेले आहे..
विदारक असले जरी वरचे, तरी एक 'सत्य'च आहे...
कमी न लेखता आम्हालाही तुम्हासारखे जगू द्या...
अस्तित्व स्वीकारा, नी एक श्वास मोकळा उरात भरून घेऊ द्या.....

"आमची नवी कहाणी......सर्व सामान्य ते झाशीची राणी"

"आमची नवी कहाणी......सर्व सामान्य ते झाशीची राणी"

माना किव्हा नका मानू, गर्भातून शिकलोय आम्ही लढायला....
आहे त्या परिस्थितीत बदल घडवून सामर्थ्याने जगायला....

विचार करू नका, आम्ही पुर्वी 'इतिहास' देखील घडवला आहे...
अग्णिपरीक्षा देऊन नि झाशी बनून किल्ला ही लढवला आहे...

राजकारणातही आम्ही आमची खास छाप सोडलेली आहे...
इंदिरा गांधी बनून देशासाठी आम्ही जीवदानही केले आहे....

सावित्री बनून एकेकाळी यमराजाचे मन ही बदलवले आहे...
तर सावित्री बनूनच कधी शिक्षणाचे मार्ग खुले केले आहेत....

आत्मविश्वासने आम्ही या जगाला तालावर डूलवले आहे...
लता तर कधी सुधा चंद्रन बनून सर्वाना थक्क केले आहे...

आक्रमकता नि विश्वास यांची आमच्यात कमी बिलकुल नाही...
किरण बेदी तर शांता शेळके बनून लढायला आम्ही भीत नाही...

खेळाच्या कोसोटीवर आम्ही नेटाने नेहमी खरे उतरत आहोत.....
उषा कधी सानिया मिर्झा बनून सर्वांवर भारी पडतच आहोत....

'विश्व सुंदरी' या जातीला तुम्ही स्वतः नक्कीच मानत असाल...
नतमस्तक त्यांच्यापुढे जग होताना तुम्ही नेहमी पहात असाल....

दुर्गा कधी तर रणचन्डी बनून आम्ही अस्तित्व पटवून दिले आहे...
मदर तेरेसा तर हेलन केलर बनून सामान्य लढा लढविला आहे...

कोणत्याही क्षेत्रात मुली, अजिबात मागे राहिलेल्या नाहीत....
वरदहस्त नसलेल्या मात्र 'काहीजणी' लढू शकलेल्या नाहीत...

म्हणून रीन्कु पाटील वा वासना शमवून आम्ही जळतोच आहोत....
नि फिनिक्स सारखे राखेतून पुन्हा पुन्हा जन्म घेतोच आहोत...

काळ बदलवून, हळू हळू नक्की बेड्या सैल करणार आहोत....
एकविसावे शतक जिद्दीने आता आम्ही घडवणारच आहोत...

"तुझ्याचसाठी....."

"तुझ्याचसाठी....."

प्रेम तुझे एक भुलावा....
नजरेचं मायाजाळ....
वचन नि स्पर्शही फसवा....
काळजावरचा घाव....

तुझसाठी काळीज पीळता....
प्रेम फक्त निथळे....
प्रेमास माझ्या तू
मात्र... न ओळखले...

वाटते तुलाही भेटावा चकवा....
मन मानत नाही...
प्रेम डोळ्यातून माझ्या...
कधीच आटत नाही...

घाव हा न मिटणारा...
पण तुझाच होता....
म्हणून प्रणापालिकडेही...
मी जपला होता....

तुझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम,
माझे वेड आहे.....
प्रत्येक गोष्टीत तुला शोधणे,
हद्द पार करणे आहे.....

तरीही हद्द पार करावी...
वाटते तुझ्यासाठी....
नि नशिबाशीही लढावेसे...
वाटते तुझ्याचसाठी.....

तू लक्ष नाही दिलेस की,
काळीज चिरते...
नि देवाच्या अस्तित्वाचे..
मग, कोडे पडते.....

" घन दाटूनी आले..."

" घन दाटूनी आले..."

दिसले मला, असेच एकदा फिरताना...
फक्त मदतीचा झाला एक 'बहाणा'...
नजर भिडली नि काळजात उतरली...
आपसूकच मानांनी जागा बदलली...

क्षणार्धात कळले, हे असे का व्हावे?
देवानेही निष्ठुरतेने का असे वागावे?
"भविष्य नाही नात्यास" हे जाणले..
आणि ते मग माघारी होते वळले...

मन काही केल्या मानत नव्हते..
डोकेही वेड्या सारखे ऐकतच नव्हते...
तगमग जीवाची खूप आता झाली...
डोळ्यांतून मात्र घन दाटले होते.....

संसाराचा तिला आखंड पदर होता...
कर्तव्याची त्यालाही किनार होती...
नजरेतुनच सोडली 'साथ क्षणाची'...
पुढे दुनियेची खोल पायवाट होती...

मी तिरहाईत, बघत होते ती सजा...
नियतीने चालवलेली त्यांची मजा...
माघारी तर वळले, 'घन' माझ्या डोळ्यांत...
दुःख त्यांचे, पण हसू नियतीच्या डोळ्यांत...

"डबक्यांचा सूर..."

"डबक्यांचा सूर..."

नेहमीचाच छंद माझा,
मनसोक्त सर्वत्र हिंडणे...
सावध नि डोके बांधून,
चप्पल घालून निघणे....

फिर फिर फिरणे अन्,
निसर्ग गाठ्ठीशी बांधणे...
पावसात रेनकोट घालून,
पाणी उडवत चालणे...

हलकेच वळणावर थांबणे,
आणि समाजात डोकावणे...
डबक्यात खेळनार्या पोरांना,
रागावुन जोरात हुसकावणे...

आज जरा जास्त डोकावले,
नि पोरांना जरा आडवले...
'घरात जागा नाही' एइकूण,
पाय जमिनींत धसत गेले...

'पावसाचे घर' होते त्यांचे,
आई-बपाच्या डोळ्यात पूर..
घरात काय अन् बाहेर काय,
डबक्यांनीच धरलाय 'सूर'...

आपण लोक पांढर पेशी,
रक्तही पांढर आपलं झालय...
छोट्या छोट्या लेकरांना त्या,
जगणं हि 'महाग' झालय...

आता अणवाणीपणे छंद जोपासते,
स्वेटर, रेनकोट माळ्यावर ठेवते....
त्या काजव्यांच्या डोळ्यांना भेटते....
घर शक्य नाही पण,जिद्द देऊन परतते....

"अश्रू तुझे.... माझ्या डोळ्यांतून वहातात..."

अश्रूंचे आणि स्त्रीयांचे जवळचे नाते असते असे म्हणतात... तसे माझेही आहे...प्रत्येक स्त्रीचे असतेच.... आणि "आईचे" तर नक्कीच असते.....

"अश्रू तुझे.... माझ्या डोळ्यांतून वहातात..."

अश्रू तुझे, अर्भकावस्थेतले...
दव बिंदुन्सारखे... क्षणात खुद्कन लोप पावनारे...

अश्रू तुझे, रडके असणारे...
तुलाच घडवणारे ...रिमझिम,धो-धो बरसणारे...

अश्रू तुझे, हसरे असणारे...
निखळ नि घुंगरासारखे.. घर दनानून सोडणारे....

अश्रू तुझे, हट्टी असणारे....
बूडबुड्या सारखे.. क्षणक्षणाला बदलत विरणारे....

अश्रू तुझे, प्रसंगी चिडणारे...
फुग्यासारखे.... फट्टधिशी 'हसून' फुटणारे...

अश्रू तुझे, खट्याळ असणारे,
लबाडासारखे.. .. दटावल्यास 'ब्रामांड' दाखवणारे...

अश्रू तुझे, लटकेही असणारे,
लक्ष वेधन्यासाठी... दुर्लक्षाल्यास आकांडतांडव करणारे...

अश्रू तुझे, कधी गोंधळलेलेही....
ऊन्ह-सावलीसारखे... तुलाच कधी कधी न उलघडणारे....

अश्रू तुझे, भित्रट हि असणारे,
हवे हवेसे वाटणारे ...नि कुशीचा आश्रय शोधणारे...

अश्रू तुझे, समजदारही कधी,
सागरासारखे... त्याची खोली न गाठता येणारे.....

अश्रू तुझे, विरहाचेही असणारे...
पुरासारखे... तुलाच तुझ्यात वहावत नेणारे...

अश्रू तुझे, अबोलही कधीतरी,
शांत नि निश्चल... माझ्यातल्या आईला सलनारे....

अश्रू तुझे, पश्चातापाचेही कधी,
मोत्यांसारखे.... जपून ठेवायला मी सांगणारे.....

अश्रू तुझे, गुंतागुंतीचे इतरांना जरी...
माझ्या कणा कणा त वसलेले.....
माझ्या हरेक क्षणात कोरलेले...
माझ्या कळजावर खोल गोंदलेले....
माझ्या डोळ्यांतून वाहणारे....

"आपून की कहाणी.... आपून की ही जुबानि...."

"आपून की कहाणी.... आपून की ही जुबानि...."

आपून क्या?... देख मत, पैचान कौन?
कुछ भी बोल, उमरावजान या चांदणी....
वैसे आपून का नाम तो है 'रातराणी'...
रातराणी बोले तो वहीच रात की राणी....

अब तक अकलमे तेरे बात नही पडी?
क्या? क्या बताऊ....... कहाणी मेरी?
अरे छोड, मत कर तू टाइम की खोटी...
'माल'देता क्या बोल? तो फिर मै तेरी...

वैसे रसीलीबाई बकति है कभी कभी....
बाढमे सब घरके लोग टपक गये ते.....
और बाढ आँखोमे समेटे,मै पडी थी...
उठाके लाया तो लाया भी ऐसी गली.....

सात-आठ साल की थी जब आयि थी....
नई दुनिया देखके, थोडा घाबराई थी....
भागी भी थी, दो चार बार जान बचाके....
'पेट'की डोर फिर यहा खिन्च लाई थी...

यहापे फिर भी अपनी मर्जी चलती है..,
बाहर तो, पुलीसभी नही छोडती है....
पेट और उमर वैसेभी जिणे नही देते....
लालटेन भी मजबुरी हममे धुंडती है....

आप लोग भी पेपर मे या फिलम मे देखके....
कुछ सोचके, या दुख जताके निकल जाते है...
आपून एक आँखसे हसके,दुसरेसे रोति है ....
'कहाणी' पे रोकडा उनको, उमरकैद हमारी है....

आप भी मेरी कही, उपरवाली सब बातोपे...
सिर हिलाने के सिवा क्या कर सकते हो?...
दुसरे दिन...... चोरी-चोरी, छुपके- छुपके
आपून की गलीमे तो आखिर दिखते हो.....

"आतलं 'वादळ' लेखणीतून,सहज, उतरत नाही....."

"आतलं 'वादळ' लेखणीतून,सहज, उतरत नाही....."

नशिबापुढे स्वप्नांचा चक्काचूर,
अगदी झालेला असतो....
विनाकारण गांजवलेले आपण,
हतबल झालेले असतो....

नियती, घुसमट आपली पाहून,
मग क्रूरपणे हसते....
नेहमीच घाव नवीन देऊन,
"नाच" अशी म्हणते.....

धरणीला ठाव मागता,
'काळीज' फक्त सीतेसाठीच फाटतं...
सामान्यांसाठी मात्र तिचं ते,
हृदयही मग गोठत...

जर आपण ओठांच्या भिंती,
उघडल्या नाहीत प्रचंड.....
आतच धगधगत राहील जळत्या,
शब्दांचे पेटलेले अग्नीकुंड....

तरी आतलं 'वादळ' लेखणीतून,
सहज उतरत नाही.....
डोळ्यांतून पूर वाहिल्याशिवाय,
ते कागदावर रचत नाही...

बोलून व्यक्त होत नसेल तर,
लिहून 'कवाडं' उघडावीत...
आणि 'अशी' आतल्या वादळास,
वाट मोकळी करावी....

कारण, वादळा पूर्वीची शांतता,
घातक ठरू शकते.... नि
अस्तित्वासकट आपल्याला,
उध्वस्त करू शकते.....

" 'भ्रष्टाचार'...विषय तसा हजारदा चघळलेला......."

" 'भ्रष्टाचार'...विषय तसा हजारदा चघळलेला......."

'भ्रष्टाचार'.....विषय तसा हजारदा चघळलेला...
एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडलेला.....

पगार पुरत नाही, असे म्हणून पैसे उकळायचे....
कधी वरखर्चासाठी म्हणून, पाकिटात टाकायचे.....

जोवर वेळ येत नाही, तोवर मात्र दुरून हसायचे...
आडल्यास, टेबलाखालून हळूच पैसे सरकवायचे....

'असेच चालायचे', किती दिवस म्हणावे लागेल?...
मुळावर आता प्रत्येकानेच घाव घालावा लागेल....

ही वेल फोफावण्याधी सर्वानी काहीतरी केले पाहिजे....
पाणी, शिव्या घालण्यापेक्षा, मुळे सैल केली पाहिजे....

गरिबांचे सुके नाही, पण पैसेवाल्यांचे ओले ही जळेल...
दुबळ्यांना वाली नाही, मोठ्यांचे खोटे नाणेही खणखनेल..

"तुझे 'प्रेम'.......... हे असे असेल का ??????"

"तुझे 'प्रेम'.......... हे असे असेल का ??????"

तुझे प्रेम..... काजवा बनून चमकेल का ?
जेव्हा मी दुःखाच्या अंधारात असेल......

तुझे प्रेम..... गारा होऊन बरसेल का ?
जेव्हा मी खूप रागात असेल.......

तुझे प्रेम..... मोगरा होऊन दरवळेल का ?
जेव्हा मी अशांत सागर असेल.....

तुझे प्रेम..... स्वप्न होऊन दिसेल का ?
जेव्हा मी गाढ झोपलेली असेल.....

तुझे प्रेम..... हास्य होऊन उमटेल का ?
जेव्हा मी निराश झालेली असेल....

तुझे प्रेम..... रडू होऊन एकदाच फुटेल का ?
जेव्हा की आज मी तुझी नाहीए....

"विसर न व्हावा, देवा तुझा विसर न व्हावा..."

"विसर न व्हावा, देवा तुझा विसर न व्हावा..."

नेहमी प्रमाणेच मी देवाकडे हात जोडले...
"भजन" गायचे न जाणो मनात कसे आले?...

"विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा...
विसर न व्हावा, देवा, तुझा विसर न व्हावा..."

नि त्याच वेळी तोही होता मस्त मूड मधे ...
"तथास्तु" म्हणून त्याने वरदान मला दिले...

त्या दिवसापासून लाइफ 'चेंज' थोडे झाले....
नि सरळ होणारे काम वाकड्यात शिरू लागले...

चालता चालताही मग पाऊल अडखळू लागले...
'त्याला' आवडणारी मी, दुर्लक्षित होऊ लागले..

आई शाप्पथ! काय सांगू तुम्हाला, काय झाले?
त्याचे ते वरदान हळू हळू शाप ठरू लागले...

देव मला आता, त्याचा कधी विसर पडू देईना....
नि अडचणी मला कधी उसंत मिळू देईनात....

एकदा मात्र चमत्काराने अपघातातून मी तारले...
त्याच्या फक्त स्मरणाने, मी मरता मरता वाचले...

गोळा बेरीज मांडली, नि माझ्या लक्षात आले....
की, मला त्याने दुःखाच्या आगीत होते झाळले...

दुःखाशिवाय आयुष्याचे.... रंग कळत नाहीत....
नि अडचणिशिवाय गोष्टींचे मोल कळत नाही...

घुंगुर वेलीना मानातल्या मूकपण आले होते...
आणि डोळ्यातले भाव आता सक्त झाले होते....

म्हणून म्हणावेसे वाटते.... खरच मला, तुझा देवा,
विसर पडू देऊ नको.... काय वाट्टेल ते होवो, पण तू मला विसरू नको....

(सारांश: कुंतिने देवाजवळ, त्याचा विसर न पडण्यासाठी कायम दुःख मागितले होते...त्या आशयावर ही कविता लिहिली आहे...)

Friday, August 10, 2007

आधुनिक....."चांदोमामा चांदोमामा भागलास का?......

आधुनिक....."चांदोमामा चांदोमामा भागलास का?...... "

चांदोमामाचे नवे गाणे एका माझ्या गीता नावाच्या मत्रिनिने संगितले.....कोणी बनवले माहीत नाही.....पण मला जाम आवडले म्हणून पोस्ट करत आहे....ज्याने बनवले त्याची मान्यता मिळाली असे समजून.......

चांदोमामा चांदोमामा भागलास का?
बिल्डिंगच्या मागे जाऊन लपलास का?

बिल्डींग ही आहे सात माजली....
मामाचा वाडा पाडून बांधली.....

बिल्डींगमधे मामाच्या येऊन जा...
पाव भाजी खाऊन जा...

पाव भाजीत पडली माशी...
चांदोमामा राहिला उपाशी.....

@ mahit nahi.....---------------------------------------- ---------------------------------------- ---------------------------------------- --------------
हे गाणे माझ्या 6 वर्षांच्या मुलाला खूपच आवडले. त्यानेही मग एक गाणे बनवले ते पुढे एकही शब्द न बदलता देत आहे......

चांदोमामा चांदोमामा भागलास का?
मोठ्ठ्या ग्रासच्या मागे जाऊन लपलास का?

ग्रास जवळच्या मामाच्या वाड्यात येऊन जा....
भाजी, चपाती, भात, आम्ही जे खातो ते खाऊन जा...
(पुढे त्याला जमेना...म्हणून आम्ही जे खातो ते खाऊन जा...)

आम्ही जे खातो , त्यात पडली माशी...
चांदोमामा राहिला उपाशी.....

@ आदी....

"विनोदी लिखाण दुधारी तलवार......."

"विनोदी लिखाण दुधारी तलवार......."

विनोदी लिखाण दुधारी तलवार.....
कधी फुलांच्या वेषात काटेरी हार....

कधी शाल जोडीत चपलांचा मार...
कधी मवाळ वाणीने केलेले प्रहार....

कधी हास्य मध्यमातून हाहाकार....
कधी राजकारण्यांचा पाहुनचार...

कधी पांढर पेश्यांचा समाचार....
कधी मुखवत्याचे रंग उडवनार....

कधी सत्यावरून पडदा सारणार....
दिलासा ज्यांची झाली असेल हार....

आभाळातल्याना जमिनीचा आधार....
कधी न पिताच 'नशा' चढवणार...

तर कधी चढलेल्यांची उतरवनार...
मधुर वा विषारी धारीने संहार....

कारण, ही एक दुधारी तलवार....

रेणुका@एक झोका... चुके काळजाचा ठोका.... 16/07/2007..... 12.40 a.m.

अनुभवलेलं जग- 5 "एक असतो भिकारी....

अनुभवलेलं जग- 5 "एक असतो भिकारी.... "

एक असतो भिकारी....
दारातच अडलेला...
काणकानात लाचारी...
नि माज चढलेला...

फनफनतच आतून....
भीक आणायची.....
नि रागरागातच..
त्यावर भिरकवायची...

एकदा वळून पाहिले...
फसफसलेलेही खायचा....
कडाकन्या ही तोडायाचा...
डोळ्यानेच माफही करायचा....

मग स्वतःला पहिले...
भिकारी 'मी', शहारले...
वृत्तीने, आणि कृतीने,
त्याहूनही, मनाने नि विचाराने...

'माज' माझाच उतरला....
माफी नि सद विचारांची...
मलाच, भीक घालून....
तो 'दानी' आशीर्वाद देऊन माघारी परतला....

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका...30/07/2007........12.25 a.m.

अनुभवलेलं जग-4... "प्रेमाचा खेळ...."

अनुभवलेलं जग-4... "प्रेमाचा खेळ...."

प्रेमाच्या नावाखाली चालतो इथे 'खेळ'....
प्रियकर नि प्रेयसीचा नसतो कधी मेळ....

महिन्याला एक नवी मैत्रीण शोधायची....
पुन्हा परत परत तीच कथा दोहरवायची...

जस्तं दिवस 'हे लफडं' चालू द्यायचं नसतं...
काळीज उपडं करून मोकळं व्हायचं असतं.....

माहित्येय, असं बोलायचं नसतं चारचौघात....
काळजी करू नका,गुपित राहील 'आपल्यात'....

जगासाठी आपलं हे वागणं 'विक्शिप्त' सगळं....
काय कळतय त्यांना यातलं सुख आगळं वेगळं.....

रेणुका@ एक झोका...चुके काळजाचा ठोका...22/07/2007....12.05 a.m.

अनुभवलेलं जग-3..."अनोळखी 'तो'..."

अनुभवलेलं जग-3..."अनोळखी 'तो'......

मी आणि माझा प्रवास, अखंड चालू असतो......
सरकारच्या कृपेने बर्‍याचदा उभ्यानेच असतो...
आम जनता अशीच, लटकत होरपळत असते...
लालदिव्यांच्या गाडीत आपलीच निघत असते....

असो !! हे विसारा.....तर मी सांगत असे होते...
कुणा अनोळखीला कधी 'जागा' द्याविशी वाटते...
'नाही' म्हणायची इथे अजिबात सोयच नसते....
कारण आम जनता आपल्याकडेच बघत असते....

नंतर याच्या डोळ्यांची पाखरं भोवतीने फिरतात...
काळजात धडकी भरते नि पाय माझे लटपटतात...
मी दोन स्टॉप आधी उतरण्याचा शहाणपणा करते...
तर.... साहेबांची स्वारी इथेही आपले 'दर्शन' देते....

आता काय करावे ?.......या विचारतच मी असते....
तर 'हाय' बोलून 'गाडीच्या' डोळ्यांत चमक दिसते...
मग मीही चमत्कारिकपणे "बोलो भैया" म्हणते....
क्षणात चेहर्यावरची 'आभा' त्याची धुळीत मिसळते...

"आपका रुमाल?" म्हणून स्वतःचा रुमाल दाखवणे...
मी 'नाही'( सुटले)म्हणून, आटोकडे बेफाम धाव घेते...
हे अनुभव 'असले', नेहमीचेच की हो असणार.....
सांगा ना, कुणा कुणाला मैत्रीला 'हो' म्हणणार?...

रेणुका @ एक झोका.... चुके काळजाचा ठोका....21/07/2007....7.00 a.m.

Wednesday, August 8, 2007

अनुभवलेलं जग-2..." व्यसनाची नशा ....."

अनुभवलेलं जग-2...

" व्यसनाची नशा ....."

ही कहाणी नहिये कोणाची, एक सत्य कथा...माझ्या एका नातेवाईकाची.....कृपया कोणी नाव विचारू नये....

संसार तिचा तुडुंब आनंदाचा...

वेलीवर तीन फुले गोजिरी....

प्रेमळ स्वभावाची 'ती' खाणी...

तोही होता एक 'राजा मानी'....



दिवसागणिक फुले उमलली...

व्यसनाची नशा त्याला चढली...

रोज पैसे नसण्याची नवी कहाणी...

अश्रूही आता, लाचार कर्जबाजारी....


देहरूपी अस्तित्वाने सर्व उरली...

तिची तत्वे मग चुलीत जळली...

थकला नजरेच्या प्रश्नांना तोही...

उत्तरादाखल आत्महत्या केली....


तिला मात्र तो मार्ग बंद होता....

काळजाच्या फुलांचा गंध होता....

घडवायचे होते, म्हणून पाय रोवले...

एका तपानंतरही 'त्याचे' कर्तव्य पार पाडले....


रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका...20/07/2007.....12.40 a.m

अनुभवलेलं जग-1, "सागर....."

अनुभवलेलं जग-1, "सागर....."


तव प्रेमाच्या अथांग सागारात,

उभी असते नेत्री 'आस' घेउन..


.लाटा जवळ धावतात नि मग,

आधार धरतीचा नाही लागत....


माघारी लाटा वळताना मात्र,

आभाळ ही नाही कवटाळत...


सामावून मला घेशिल की नाही ?

'आशा' डोळ्यांत जिवंत अजूनही....


म्हणून उभी मी त्याच सागरात,

घेऊन उरातला "सागर अशांत"....


तुझ्या डोळ्यातलं सुटेना कोडं...,

म्हणून,'बेट' मी, सागरात राहूनही कोरडं...


रेणुका @ एक झोका ....चुके काळजाचा ठोका19/07/2007 .... 3.35 p.m.