About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Tuesday, December 11, 2007

"नशा....."

"नशा....."

मी मावळलेला एक पिंड..
जगण्याचा दंड....शब्दांनी धिंड...
काळजात सल, अपमानाचं ओझं...
धूसर नजरेचं जीवनही खुजं...
एकेकाळी उगवतीवर नाव...
आब, मान-मुज-याचे गाव,
शब्दालाही भाव...
पायाखाली जग थोटकं....
हात जोडुन पुढे सुखही खोटं...
बोलणारा पैसा, डोळ्यावर झापडं...
फाटकच मन पण उंची कापडं..
ना कशाचे भान, ना कोणाचा मान...
ना सख्खा मित्र, जीवन स्वैर बेभान...
हम्म्म.....
यशाची नशा.......नशाच शेवटी...
उतरली की दिसते........
छिन्न-विछिन्न शरीरावर
मांसरहीत कवटी...
जाताना घेऊन जाते दिलेले सर्व...
तेव्हा कळते संपलेय पर्व..

ती जाते उगवतीकडे
नवीन सूर्याच्या शोधात...
तोही कदाचित बहकणार
नशिल्या धुन्दिच्या ओघात......
कदाचित तो सूर्य तूच असशील.....
म्हणून फक्त सांगावेसे वाटले...
ठीक आहे, जायचे तर जा...
नाहीतरी मावळणार्‍याचे
इथे कोणी ऐकले?

रेणुका @ एक झोका.....11/12/2007......10.20a.m.

"सल......."

"सल......."

पुन्हा सल तो मनी जागला रे
जन्माधीच अंकुर कसा खुडला रे

विसरू कशी पाऊलखुणा तिच्या?
अशा नीच वृत्तीस ईश लाजला रे

नऊमासही देऊ शकले न तिजला
पसा हा कसा मायचा माजला रे

गर्भात नाकारूनी सोय-यांनी
उगम का नसे आपला शोधला रे

चौकट ही अशी पूर्ण कारवण्या..
माणूस का असा नादला रे?????
माणूस का असा नादला रे?????

रेणुका @एक झोका..चुके काळजाचा ठोका...17/10/2007...11.30A.m.

"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."


"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."

मधुधुंद गंध, बेधुंद हवा
मोरपिसी स्पर्श नवा....
सोड ना हात साजणा....
मंद कर ना रात दिवा....

कीणकिणतॉ बघ चुडा
चांदण्यांचा शेज सडा...
नजरेचे भलतेच इशारे
श्वासांचा आवाज चढा...

शाश्वतीचे वरदान असे
या क्षणांना चढलेय पिसे...
बेभान मदमस्त निशेत
देहभान सांग का नसे??..

काजळ अलवार विखुरले
स्वप्न समीप अवतरले.....
चढत्या भावनांचे काहूर
बाहुपाशात तुझ्या निवळले...
बाहुपाशात तुझ्या निवळले.....

रेणुका @ एक झोका...15/11/2007...11.40p.m

"कवितेत माझ्या...."

"कवितेत माझ्या...."

बोच, सल, वेदना ही कविता असते?
प्रेम, प्रणय, प्रेमभंग ही कविता असते?
शब्दांत शब्द, यमके ही कविता असते?
वृत्त, विचार, कल्पना ही कविता असते?
देव, भक्ति, उपासना ही कविता असते?
काहीतरी याही पलीकडचे लिहायचेय...
शब्दांपलीकडले,क्षितीजापलीकडले...
मृत्यू पलीकडले, नि भावनांपलीकडले...
शब्द? ते अदुजे करीन..
मृत्यू? अनुभव रेषेला छेद देऊन,
कल्पना शक्तीने वेध घेईन.....
भावना? निगरगट्ट करीन...
पण भावना होत नाहीत निगरगट्ट..
धरून ठेवतात अगदी घट्टच घट्ट...
होत नाहीत दूर त्यांचे मानावरचे वर्ख..
लावले जरी कितीही तर्क....
त्यांना आस्मानाचं गाव,
समुद्र गहिरा ठाव...
आस्थेला वाव......
सगळं कसं एकमेवाद्वितीय....
ना बंध....ना कडे वृत्तीय...
आकस्मीत, आंदोलने कदाचित असंघिक...
अभंग, अतुलनीय, अभेद्य अन् अलौकिक...
म्हणून वरचे सर्व असेलच कवितेत....
अद्वितीय नसेल कदाचित..
पण उत्स्फूर्त तर असेल.......
कवितेत माझ्या 'मन' ढगाळ असेल....
कारूण्य भेगाळ असेल...
प्रेम, वृत्त, भक्ति...ओतप्रोतही असेल...
पण मी त्यापासून अनभिज्ञ नसेल.....
कविता माझ्या वेदना बोलतील....
प्रेमाचे गुपित खोलतील....
उपासनाही करतील....
पण, शब्दांकीत राहून...
क्षितिजरेषेवर वाहून....
मृत्यू अलीकडचीच पाखरे
निघतील भाव-पर्जन्यात न्हाऊन....

रेणुका @एक झोका...27/11/2007.......12.30a.m.

"रेषा धूसर....एकच उत्तर...."

"रेषा धूसर....एकच उत्तर...."

एक आशा, एक निराशा...
रेषा धूसर....जिद्द उत्तर....

एक हार, एक जीत...
रेषा धूसर...आत्मविश्वास उत्तर...

एक मानव, एक राक्षस...
रेषा धूसर....क्षमा कर....

एक सार, एक प्रहार...
रेषा धूसर.... शांती उत्तर...

एक वाद, एक संवाद....
रेषा धूसर....विचार सारासार कर..

एक चूक , एक बरोबर...
रेषा धूसर....'मी पण' विसर...

एक आत्मा, एक शरीर...
रेषा धूसर....प्रभुनाम् जप कर....

एक जीवन,एक मृत्यू...
रेषा धूसर....क्षणाचे अंतर....

एक प्रश्न, एक उत्तर....रेषा धूसर....
'जीवन' हे एकच उत्तर.....

रेणुका@एक झोका....26/11/2007....10.00a.m.

"मनात एक विचार आला..."

"मनात एक विचार आला..."

मनात एक विचार आला...
आपल्या मनात
किती विचार असतात नाही?
कधी खोल तर कधी
अगदीच काहीच्या बाही...
मग यावरच खूप विचार केला...
विचार खूप खूप खोलवर गेला...
अगदी मनाच्या तळाशी...
सर्व विचारांच्या मुळाशी....
अन् मग विचार ते तरल झाले...
हळू हळू वर येऊ लागले.....
हरेक विचारांचे एक-एक
फुलपाखरू होऊ लागले....
काही वेळातच झाला...
असंख्य फुलपाखरांचा थवा...
हवा होता त्यांना...
आकाशापर्यंतचा मार्ग नवा...
आनंदी तर कधी दुःखी होत होते..
या फुलपाखरांना रंग होते......
कधी गुलाबी कधी करडा.....
आणि जातही होती....
तीही "सरडा"....

रेणुका@एक झोका....13/11/2007....11.15p.m.

"सांग मी कोण रे?....."

"सांग मी कोण रे?....."

सांग मी कोण रे?
छुमछननन तुझेच मी बोल रे...
सांग मी कोण रे?
रुनझुननन तुझेच मी गीत रे...

पायात गिरकी घेऊनी
क्षणात खाली बसेन मी...
बसूनी दोन्ही करांनी
पाऊस उधळेन रे....

गारवा मस्त लेवूनी
अवखळ सर होईन मी...
सरसरसर बरसूनी
विश्वात मुरेन रे...

धुंद मृदगंध होऊनी
सर्वत्र दरवळेन मी.....
क्षणात तुजसी मंत्रूनी
तुझ्यातून चोरेन रे....

बेबन्द घुंगरू होऊनी
छंकारत नाचेन मी...
लयबध्द करूनी तुला
सृष्टीसही नाचवेन रे...

सनसननन पवन होऊनी
हातून निसटेन मी.....
एक उसासा देऊनी
माझ्यातच रमेन रे...

घनघोर पुन्हा होऊनी
आकाशी भरेन मी...
अंत तुझा पाहूनी
कधीतरीच बरसेन रे...

निथळणारी जलधार मी
हळवी हूर हूर मी....
ओंजळीत पानांच्या
हसूनी थिरकेन रे....

रेणुका @एक झोका....29/11/2007.....10.30p.m.