About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Tuesday, June 3, 2008

"पाठमोरा... "

होऊ साजणे, कसा पाठमोरा...
करूनी भावनांचा परिपाठ कोरा धृ

उसासे-वेदना ही मनाच्या कुपित...
जगावे कसे होऊनी अभिशापित...
वीर मी निहत्ता, दोष ना कुणाचा...
नियतीची सत्ता, रोष ना कुणाचा 1

कशी जीवघेणी जगाची ग रित
सोसावे कसे होऊनी आगतिक
पापण्यांत साचे,पाऊस आसवांचा
कोराडाच भासे, कोपरा मनाचा..2

चुकती ना घटती, अमीट लेख
चढते-उतरते, नशीबाचे आलेख
ती वाट ओली, दगा का आठवांचा...
तू दूर जाता, दगा का श्वासांचा 3

Renu@ek jhoka..20/11/2007....4.30 p.m.

"नियतीचे रिंगण..."

नियतीचे रिंगण...
परिस्थितीची छडी...
नि स्वप्नांचे इवलेस्से अंगण....
मात्र तिचे राज्य,
हाती सूत्र...
नि तिचेच गतिमान सत्र...
निर्विवाद साम्राज्य तिचे
यत्र तत्र नि सर्वत्र..

रेणू @ एक झोका...19/12/2007..9.50 a.m.

"शब्द......"

शब्द मन
शब्द रण
शब्द घन
शब्द सनसन पवन...

शब्द पूजा
शब्द अर्चा
शब्द साधना
शब्द शब्दफुलांची उपासना...

शब्द अतित
शब्द कथित
शब्द गतीत
शब्द शब्दाने व्यतित....

शब्द गंध
शब्द मंद
शब्द रंग
शब्द शब्दबध्द व्यासंग...

शब्द क्रूर
शब्द सूर
शब्द सूड?
शब्द शब्दांवरचे आसूड?....

शब्द खंत
शब्द तंत्र
शब्द मंत्र
'शब्द' 'शब्द' स्वतंत्र.....

शब्द रान
शब्द दान
शब्द मान
शब्द शब्दांचा प्राण....

शब्द क्रुध्द
शब्द लुब्ध
शब्द स्तब्ध
शब्द तरी नि: शब्द....

शब्द भक्ति
शब्द उक्ती
शब्द आसक्ती
शब्द शब्दांकीत विरक्ती....

शब्द वासना
शब्द बाजार
शब्द जुगार
शब्द भग्न ओसाड लाचार....

शब्द वार
शब्द धार
शब्द हार
शब्द शब्दवीन ओंकार...

रेणू.... 02/02/2008....10.21a.m.

"वेग-धुंद.....निरागस....."

खळाळणार्‍या झर्‍यासारखी....
वेग-धुंद.....निरागस.....
लाजणारी.....सतत हसणारी......
पावसात मनसोक्त भिजणारी....
.मुक्त अल्लड बागडणारी......
कायम रानोमाळी हिंडायची.....
फुलपाखरांमागे धावायची....
सांज-सावल्या विसरायची.....
श्वापद!
श्वापद होतं पाळतीवर....
नशीबचा फेरा फिरला...
एक आक्रोश हवेतच विरला...
स्वप्नं टराटरा फाटली....
अश्रूंची धार आटली....
श्वापद लावून गेलं
कायमचा बट्टा...
नि चटकपण.........

जीवघेण्या खेळाची.............

रेणू@ एक झोका....११/४/२००८....१२.१७p.m.

"नको......................."

एका उदास मनाची अवस्था....

"नको...."

आज रंग नको...
तरंग नको....
'व्यक्त' ओझे नको...
सशक्त खांदे नको...

शब्दांची धार नको...
अश्रूंची ढाल नको...
दैवाचे घाव नको....
त्यालाही वाव नको....

हवाय फक्त
एक प्रांत....
शांत-निवांत-
चीर् एकांत...

रेणू@ एक झोका...11/02/2008 1.45 a.m.

"जिद्दीचा संधीप्रकाश......"

भिरभिरते आत्मविश्वासाचे पंख...
आपल्या स्वप्नांचे आकाश.....
तडजोडी करून सुध्दा
साठवलेला जिद्दीचा संधीप्रकाश....
त्याच धुगधुगीत कुठेतरी
जिवंत असणारं आपलं अस्तित्व....
इतर गाजवत असतात
आपल्यावर स्वामित्व....
मग कधीतरी ही जिद्दच
त्या ज्योतीला देते हवा....
भिरभीरणार्‍या पंखांना मग
मिळते दिशा, नि मार्ग हवा....
आपण उडत असतो
उंच उंच आपल्याच नभात....
इतकं की,
गुदमरायला होतं....
वास्तवाचं भान आलं की
धड-धडायला होतं.....
आपल्या आकाशासाठी
आपण खूप काही गमावलेलं असतं....
कदाचित,...... क-दा-चि-त....
पायाखालची जमीन....

नि आता वेळ असते
अजून काहीतरी गमावण्याची

ओह नो, आपलं आकाशही....

.रेणू @ एक झोका....06/06/2008...11.51a.m.

"कर्तुत्वशून्य......"

कर्तुत्वशून्य....Its a fact!


एखाद्याला नेस्तनाबूत करायचं
अन् त्याला लढ म्हणायचं.....
उठत असता आधार ओढूनवर
कर्तुत्वशून्य म्हणायचं.....

हीच का रे रित तुझ्या जगाची?
अपेक्षा का नेमही त्यागाची?

वारावर वार.... प्रहार
असं संपवत जायचं...
जाळत जाळत परत
भरभरुनही द्यायचं....

हीच का रे रित तुझ्या जगाची?
जिथे कातडी जाळतात वाघाची....

सावरू लागताच परत पाडायचं
आत्मविश्वासाचं घर भुईसपाट करायचं....
आता कितीही क्षितिजं उभारलीस
तरी हवीत कोणाला?

तुझ्या असण्या-नसण्याने
फरक पडत नाही मनाला...

.रेणू @ एक झोका...15/02/2007......12.30p.m.